Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २३, २०२१

जुन्नरी कट्टा | नाणेघाट लेणी वाचन #Naneghat

जुन्नर /आनंद कांबळे 

 जुन्नरी  कट्ट्यावरील सदस्यांसाठी ज् नाणेघाट लेणी वाचन  उपक्रम आज नानेघाट येथे संपन्न झाला.  आमच्यासाठी संस्मरणीय आणि अभिमानास्पद असा होता.जुन्नर शहराला लाभलेला प्रदीर्घ इतिहास फक्त माहीत होता परंतु गुरुवर्य खोत सर यांनी तो इतिहास आमच्यासमोर साक्षात उभा केला. 



नाणेघाट खूपदा पाहिला परंतु तो वाचला कधीच नव्हता.वाचन म्हणजे काय तर तेथे असणाऱ्या प्रत्येक ऐतिहासिक ठेव्याबद्दल असणारी माहिती सांगणे .असेच आमचे आजचे लेणी वाचन खोत सर यांनी केले.

त्याचबरोबर सुभाष कुचिक सर यांनीही  या भागात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी याबद्दल आम्हाला माहिती दिली .

लेणी वाचन ची सुरुवात घाटाच्या मध्यावर असलेल्या पाणपोडीपासून  झाली. महाराष्ट्रातील पहिले ज्ञात सम्राट म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या सातवाहन राजांच्या कालखंडात म्हणजे साधारण २२०० ते २३००  वर्षा पासून ज्ञात असलेल्या कदापि त्या आधीही महाराष्ट्राचा  रोमन ,ग्रीक या देशांशी व्यापार होत असे.आत्ता असणारी कल्याण,चौल,नालासोपारा म्हणजेच त्या काळातील कलियान, शुर्पारक ,चेऊल या बंदरांमधून दागिने ,मुर्त्या व इतर अनेक वस्तू वैशाखरे गावापर्यंत आणल्या जात तेथून वरती घाट चढताना व्यापारी लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून या पाणपोड्या तयार केल्या गेल्या.

 व्यापाऱ्यांना सार्थवाह म्हटले जाई. त्याचप्रमाणे भारतातून रेशीम वस्त्रे .मसाल्याचे पदार्थ निर्यात केले जात.ह्या मार्गाला आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग म्हणून पाहिले जात असे.पायऱ्यांची रचना देखील बैल किंवा खेचर असे प्राणी सामान घेऊन वर चढू शकतील अशी आहे.  घाटाच्या तोंडाशी एक रांजण आहे त्या रांजनामध्ये येणाऱ्या मालावर आकारण्यात आलेला कर जमा होत असे . तीन प्रहरामध्ये  रांजण भरला जात असे.त्यावरून आपण किती मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असेल याची कल्पना करू शकतो.येथून पुढे आलेला माल प्रतिष्ठान म्हणजेच आत्ताचे पैठण सातवाहनांची राजधानी येथे पाठविला जात असे. 

त्याच बरोबर नाशिक कराड कोल्हापूर येथे हि माल पाठविला जाई. 

घाटात असणाऱ्या शीला लेखाबद्दल खोत सरांनी जी माहिती सांगितली ती खूपच मौल्यवान अशी होती.

 महाराष्ट्राला किती प्राचीन इतिहास लाभला आहे हे यातून समजते. हा शिलालेख ब्राम्ही लिपी मध्ये असून तो लेख सिमुक सातवाहन याचा मुलगा सिरी सातकर्णि याची पत्नी नागणिका हिच्या राजवटीमध्ये कोरलेला आहे. पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला प्रत्येकी दहा ओळींचे शिलालेख आहेत. त्यामध्ये पहिल्या ओळी मध्ये निसर्ग देवी देवता यांचा उल्लेख आढळतो.


 प्रमाणे विविध अठरा प्रकारचे यज्ञ केले गेले याचाही उल्लेख आढळतो .या यज्ञांमध्ये प्रामुख्याने दोनदा केलेला अश्वमेघ यज्ञ एकदा केलेला राजसूय यज्ञ व त्याचबरोबर इतर पंधरा प्रकारचे यज्ञ यांची नावे आहेत. 


यज्ञामध्ये केलेला दानाचा उल्लेख आढळतो  .५१४०१ कार्षापण म्हणजे  त्या काळातील चलनी नाणे,२१०००ते २७००० गाई, दोन रथ, जमिनी आणि गावे त्याच बरोबर यज्ञासाठी जे पुरोहित होते त्यांना दिलेले दान याचाही उल्लेख आहे.


 जगातील पहिली सम्राज्ञी म्हणून राणी नागनिका तिच्याकडे पाहिले जाते.


लेण्यांमध्ये अगदी समोरच असणाऱ्या भिंतीवर  ब्राह्मी लिपीत काही नावे आहेत ती नावे म्हणजे तिथे असणाऱ्या आठ जे पुतळे होते त्यांची नावे आहेत परंतु काळाच्या ओघात तेथे फक्त अवशेष पाहायला मिळतात. या मध्ये सिमुक सातवाहन नागणिका आणि सिरी सातकर्णि ,भायल आणि इतर पुतळे होते .


परंतु हा इतिहास कालौघात नष्ट झाला आणि आपण एका महान साम्राज्याचा अमूल्य ठेवा पाहण्यास मुकलो याची हळहळ वाटली. तेथील शिलालेख देखील बराचसा नष्ट होत चालला आहे. जर आपल्या इतिहासाची आपणच काळजी घेतली नाही त्याचे संवर्धन केले नाही तर आपण खूप मोठी चूक करत आहोत. 


त्यामुळे  हा ठेवा जतन करून ठेवणे आपले कर्तव्य आहे.यानंतर राजा शिवछत्रती हा ग्रंथ आपल्याला  दिलेले स्वर्गीय  बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहून आजचा कट्टा संपन्न झाला.


 हा अमूल्य आणि  प्राचीन ठेवा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असणार आहे. नेहमीप्रमाणे आम्ही नाणेघाटात जाऊन आलो असं म्हणणार नाही तर नाणेघाटात जाऊन आम्ही आपला साधारण अडीच हजार ते तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास मनात घेऊन आलो आहोत. आणि हा सर्व ठेवा आमच्या  समोर उलगडणार्‍या  विनायक खोत सर यांचे   आभार मानले.

 त्याचबरोबर जैवविविधतेची माहिती देणाऱ्या सुभाष कुचिक सर यांचेही जुन्नरी कट्ट्याच्या वतीने आभार मानले. सोबत सुभाष कुचिक (जैवविविधता तज्ञ), अोंकार ढाके , मोहन रासने , सागर हगवणे,ऋषिकेश ढुमणे , चंदा शेळके मॅडम , अर्चना पवार मॅडम  यांच्यासमवेत ३७ सदस्यांनी यात सहभाग घेतला


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.