केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात स्वदेशी ईंधन सेल्स विकसित करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन अवलंबण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, भारत आज या क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या स्थितीत आहे. त्यांनी शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना ही हायड्रोजन-आधारित उर्जा वापरण्याचे आवाहन केले, जी किफायतशीर आहे आणि देशात सहज उपलब्ध आहे. त्यांनी सौर उर्जेच्या कमी खर्चाकडे लक्ष वेधले ज्यामुळे इतर प्रकारच्या इंधनांना प्रोत्साहन मिळू शकेल.
काल संध्याकाळी सरकारी संस्था आणि संशोधन संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात त्यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर सुमारे 81 टक्के लि-आयन बॅटरीचे सुटे भाग उपलब्ध असून कमी किमतीत मूल्यवर्धन करण्याची आणि परिणामी मोठया प्रमाणावर रोजगार निर्मितीची भारताला चांगली संधी आहे. लि-आयन, मेटल-आयन, सोडियम सल्फर, हायड्रोजन, आयरन सल्फर, पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन सेल सिस्टम, झिंकजेल सारख्या विविध तंत्रज्ञानासाठी केलेल्या सादरीकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गडकरी म्हणाले, आर्थिक व्यवहार्यता हा कोणत्याही यशस्वी तंत्रज्ञानाचा आधार आहे.
लिथियम-आयन बॅटरीच्या क्षेत्रातही चीनसारख्या देशांचे वर्चस्व असूनही त्या क्षेत्रात मोठा वाव आहे असे ते म्हणाले, या क्षेत्रामध्ये अजूनही 49 टक्के वाव आहे , त्यामुळे भारतातील खाण कंपन्या जागतिक स्तरावर सुटे भाग मिळवण्याचा विचार करू शकतात आणि संधीचा उपयोग करू शकतात असे ते म्हणले. गडकरी यांनी ऑटोमोबाईल उद्योगाच्या वाढीकडे लक्ष वेधले ज्याची उलाढाल सध्या साडेचार लाख कोटी रुपयांची आहे आणि लवकरच ती 10 लाख कोटी रुपयांवर पोहचणार आहे. नवीन वाहन स्क्रॅपिंग धोरणाअंतर्गत सुरुवातीला एक कोटी वाहने मोडीत काढली जातील, ज्यामुळे स्वस्त अॅल्युमिनियम, तांबे, रबर, स्टील आणि इतर उत्पादने उपलब्ध होतील. आणि यामध्ये बॅटरीच्या सुट्या भागांची किंमत कमी करण्याची क्षमता असेल असे ते म्हणले. .
त्यांनी उत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, पुढच्या पिढीच्या बॅटरीमुळे केवळ भारतातील वाहनांचे प्रदूषणच कमी होणार नाही तर भारताला इलेक्ट्रिक वाहनांचा जागतिक पुरवठादार देखील बनवेल.