नाणेघाटात परिसरात तरुणीचा पाय घसरून मृत्यू
जुन्नर /आनंद कांबळे
ऐतिहासिक नाणेघाट (ता. जुन्नर) जवळील जीवधन किल्ला पाहून खाली उतरत असताना दिल्ली येथील पर्यटक तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ४) घडली आहे. या सर्व परिसरात पर्यटनाला बंदी असूनही अतिउत्साही पर्यटक पोलीस यंत्रणेला झुगारून किंवा दंड भरून येथे येत आहेत. या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जीवधन गडावरून उतरताना निसरड्या झालेल्या पायरीवरून ही तरुणी शेजारील दरीत पडली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणीस सहकाऱ्यांनी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचे घोषित केले.
या दुर्घटनेतील मृत तरुणीचे नाव रुचिका सेठ (वय ३० रा. दिल्ली) असल्याची माहिती
जुन्नर पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. सदर तरुणी दिल्लीहून ठाणे येथे आली होती. मुंबईहुन इतर तिघांसह ही तरुणी मोटारसायकलने नाणेघाट येथे मुक्कामास आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हे चौघे जीवधन किल्ल्यावर गेले होते. मागील आठवड्यात याच परिसरात पोलिसांना अरेरावीची भाषा वापरणाऱ्या पुणे येथील अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाची जोखीम घेऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले आहे.
Seeing the fort, the young woman slipped and died while descending