Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी ११, २०२१

नागपूर विद्यापीठात भटक्या विमुक्तांच्या सखोल अभ्यासासाठी अध्यासन व संशोधन केंद्राची स्थापना करा






📌 भटक्या विमुक्तांचे अभ्यासक व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांची मागणी

📌 राज्यपाल व कुलगुरूंना निवेदन सादर



नागपूर - राज्यातील भटक्या विमुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी व सखोल अभ्यासासाठी रातुम नागपूर विद्यापीठात कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अध्यासन व संशोधन केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी भटक्या विमुक्तांचे अभ्यासक व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी केली. या संदर्भात आज (ता १२) कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोशारी व कुलगुरू सुभाष चौधरी यांना निवेदन सादर करुन हि मागणी रेटून धरली.

भारतीय समाजातील एक अविभाज्य घटक असलेला भटका विमुक्त समुदाय ७० वर्षानंतरही विकासापासून कोसो दूर आहे. भटक्या विमुक्तांच्या भोवतालची भौतिक कुंपणे ३१ आॅगस्ट १९५२ रोजी काढून टाकली असली तरी, समाज मनातील कुंपणे काढून टाकण्यात इथला पुरोगामी, मानवतावादी विचार व शासन कमी पडले आहे. शिक्षणाचा अभाव, कमालीचे दारिद्रय, रोजगाराचा अभाव यासह अनेक समस्यांनी हा समाज गर्तेत सापडला आहे. भटक्या विमुक्तांचे प्रश्न, समस्या, ती सोडविण्यासाठी उपाययोजना या मुख्य भूमिकेवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून ठोस कार्य झाले पाहिजे. यासाठी रातुम नागपूर विद्यापीठात "कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अध्यासन व संशोधन केंद्र" स्थापन करण्यात यावे. यामाध्यमातून दादासाहेब कन्नमवार यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, मध्य प्रांतातील विकासाचे योगदान, विमुक्त भटक्या जमातीचा सामाजिक, आर्थिक विकास, भटक्या विमुक्त जमातीवर उपलब्ध साहित्याचे एकत्रिकरण, सरकारी आयोग, समित्या, अभ्यासगट यांचे अहवाल जतन - भाषांतर, नवीन साहित्य निर्मिती, भटक्या विमुक्तांच्या समकालीन प्रश्नांसंदर्भात संशोधन प्रकल्प राबविणे या सारख्या विषयावर कार्य करण्यात यावे अशी मागणी भटक्या विमुक्तांचे अभ्यासक व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी कुलगुरू श्री सुभाष चौधरी यांना दिलेल्या निवेदनातून केली. हा विषय अत्यंत महत्वाचा असून भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी अध्यासन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबत पुढाकार घेऊ, असे आश्वासन कुलगुरु श्री सुभाष चौधरी व प्रभारी कुलगुरू श्री संजय दुधे यांनी दिले.

यावेळी भटक्या विमुक्तांचे अभ्यासक व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव खिमेश बढिये, संघर्ष वाहिनीचे संघटक मुकुंद अडेवार, बेलदार समाज संघर्ष समितीचे सदस्य व रोटी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ रोहित माडेवार, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समितीचे सदस्य गजानन चंदावार, गोपीनाथ मुंडे विचारमंचचे अध्यक्ष शेषराव खार्डे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे उच्च माध्यमिक संघटक कमलेश सहारे, भटक्या विमुक्त कर्मचारी संघटनेचे दिनेश गेटमे, प्रा राम मुडे, नंदा भोयर, ढिवर समाज समिती सदस्य संजय भोयर यांच्यासह भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.