Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ०२, २०२०

समजा, आजच्या २ सप्टेंबर नंतर जर तुम्हाला कोणी उद्याची तारीख ३ सप्टेंबर न धरता १४ सप्टेंबर आहे असा हूकुम सोडला तर काय कराल ??

समजा, आजच्या २ सप्टेंबर नंतर जर तुम्हाला कोणी उद्याची तारीख ३ सप्टेंबर न धरता १४ सप्टेंबर आहे असा हूकुम सोडला तर काय कराल ??

फेसबुक लिंक https://bit.ly/3jHozzb
होय, हे म्हणजे डोक्याला ताप आहे पण हे इतिहासात खरोखर झालेले आहे. हे म्हणजे आपण २ सप्टेंबरला झोपलो आणि थेट १४ सप्टेंबरला जागे झालो की काय असे वाटण्याची शक्यता आहे. ब्रिटनने ग्रेगेरियन कॅलेंडर स्वीकारल्यानंतर, २ सप्टेंबर १७५२ नंतर थेट पुढील तारीख ३ सप्टेंबर १७५२ ऐवजी १४ सप्टेंबर १७५२ मानण्यात यावे असे ठरविण्यात आले होते. नक्की असे काय झाले होते की हा कायदा करण्यात आला ??*
ज्युलियस सीझर :
आज आपण ज्याला इंग्लिश कॅलेंडर म्हणून ओळखतो ते पूर्वी १० महिन्यांचे आणि ३०४ दिवसांचे होते. मार्च महिन्यापासून वर्ष सुरू व्हायचे. मार्च, एप्रिल, मे, जून झाले की पाचवा महिना क्विंटिलिस, सहावा सेस्क्विड, सातवा सप्टेंबर, आठवा ऑकटोबर, नववा नोव्हेंबर आणि दहावा डिसेंबर असायचा. त्याची कालगणना चंद्राच्या कलांशी जुळायची नाही म्हणून सर्वात पहिल्यांदा रोमन सम्राट ज्यूलियस सीझरने कालगणनेमध्ये अमूलाग्र बदल केले. ज्यूलियस सीझरने चांद्रऐवजी सौर कालगणना वापरण्यास सुरुवात केली;  मग ज्युलियस सीझरने ते कॅलेंडर १२ महिन्यांचे आणि ३५५ दिवसांचे केले. जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने वाढवले. तर क्विंटिलिसचे नाव ज्युलियस सीझरवरून जुलै केले आणि सेस्क्विडचे नाव एम्परर ऑगस्टस् वरून ऑगस्ट केले. ख्रिस्तपूर्व ४६ हे वर्ष त्यामुळे ४५५ दिवसांचे केले. ख्रिस्तपूर्व ४५ पासून वर्ष १२ महिन्यांचे गणले जाऊ लागले. या कालगणनेला ज्युलियन कॅलेंडर म्हणतात. तसेच प्रत्येक चवथे वर्ष ३६६ दिवसांचे म्हणजे लीप वर्ष म्हणून मानण्याची प्रथाही त्यानेच सुरू केली. पण ज्यूलियन वर्ष ३६५.२५ दिवसांचे असल्याने प्रत्यक्ष माध्य सौर वर्षापेक्षा ते ०.००७८ दिवसाने (११ मिनिटे १५ सेकंद) मोठे होते. यामुळे १२८ वर्षात ही तफावत १ दिवसाइतकी होते आणि ही तफावत अखंडपणे वाढत गेल्याने दीर्घकालानंतर त्रासदायक ठरेल, असे लक्षात आले.
२ सप्टेंबर नंतर जर तुम्हाला कोणी उद्याची तारीख ३ सप्टेंबर न धरता १४ सप्टेंबर आहे असा हूकुम सोडला तर काय कराल ??

सोळाव्या शतकात पोप ग्रेगरी तेरावे यांच्या पुढाकाराने कॅलेंडरमध्ये सुधारणा करण्याचे ठरले. या सुधारणेमुळे सांपातिक वर्ष व कॅलेंडर वर्ष यांतील फरक कमी होऊन कॅलेंडर वर्ष ३६५.२४२५ दिवसांचे झाले. त्या काळी वर्षारंभ २१ मार्चला (वसंतसंपाताच्या दिवशी) धरीत असत; परंतु या सुधारणा होईपर्यंत पडलेल्या फरकामुळे हा वर्षारंभ २१ मार्चऐवजी ११ मार्चला होणार होता; परंतु पोपनी एका आदेशान्वये सेंट फ्रॅन्सिस उत्सवानंतरचा दिवस म्हणजे ५ ऑक्टोबर १५८२ या दिवशी १५ ऑक्टोबर १५८२ हा दिवस मानावा, असे सांगितले. पोप ग्रेगरी तेरावे यांनी हे कॅलेंडर प्रचारात आणल्यामुळे त्यांचा सन्मानार्थ याला 'ग्रेगेरियन कॅलेंडर' हे नाव देण्यात आले आहे. या पद्धतीला न्यू स्टाइल, ख्रिस्ती वा इंग्रजी कालगणना असेही म्हणतात.
इटलीप्रमाणेच स्पेन, लक्सेंबर्ग, फ्रान्स व पोर्तुगाल यांनी १५८२ सालीच तर बेल्जियमसारख्या रोमन कॅथलिक राज्यांनी १५८३ साली व हंगेरीने १५८७ साली सुधारित ग्रेगरियन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात केली. डेन्मार्क तसेच डच व जर्मन प्रॉटेस्टंट देशांनी १६९९-१७०० साली हे कॅलेंडर स्वीकारले. ब्रिटन आणि त्याच्या वसाहतीत १७५१ साली हे कॅलेंडर कायदेशीर व सार्वजनिक बार्बींसाठी वापरण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत ज्यूलियन व ग्रेगरियन कॅलेंडरमधील वर्षांत १२ दिवसांची तफावत पडली होती. म्हणून २ सप्टेंबर १७५२ नंतरच्या दिवसाला ३ सप्टेंबर १७५२ ऐवजी १४ सप्टेंबर १७५२ मानण्यात यावे असे ठरविण्यात आले. या निर्णयामुळे लोकांचा गैरसमज होऊन ‘आमचे अकरा दिवस आम्हाला परत द्या’ या घोषणेसह आंदोलन झाले होते. तसेच याच वर्षापासून वर्षारंभ १५ मार्च ऐवजी १ जानेवारीला मानावा, असा कायदा करण्यात आला.
रशियात १९१७ साली तर ग्रीसमध्ये १९२३ साली हे कॅलेंडर प्रचारात आले. या कॅलेंडरनंतरही लहान प्रमाणात बदल करून ते सांपातिक वर्षाला अधिक जवळ आणण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. तथापि अजूनही ही दोन्ही वर्षे एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत. सध्या ग्रेगरियन वर्ष माध्य सौर वर्षापेक्षा २६.३ सेंकंदांनी मोठे आहे. त्यामुळे ३३२३ वर्षांत ते १ दिवसाने मोठे होईल. ही १ दिवसाची तफावत भरून काढण्यासाठी ४०००, ८००० इ. वर्षे ही लीप वर्षे न मानता सर्वसामान्य वर्षे मानावीत. मात्र ही सुधारणा केली, तरी वरील दोन्ही वर्षामध्ये २०,००० वर्षात १ दिवसाची चूक राहीलच.....✍🏻

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.