विशेष लेख
सारं काही थांबलेलं आहे.आणखी किती काळ ऐकाच ठिकाणी पाय रोवून बसावे लागेल, याचाही काही नेम नाही. संकट इतकं मोठं आहे की, सर्वाना कवेत घेण्याची क्षमता कोरोनात आहे. कोरोनाने स्वतःची वीण घट्ट केली आहे. ही वीण तशी माणसानेही माणसासाठी आणखी घट्ट करावी, जेणेकरून या कोरोना काळात जगण्याची उमेद मिळेल, हीच अपेक्षा.- मंगेश दाढे
सर्व काही हातातून गेल्याचा भास अनेकांना कोरोनाने करून दिलाय. हा उद्रेकच इतका भयंकर आहे की, जीवनाची घट्ट बसलेली वीण कधी-कधी सैल झाली की काय? असं वाटते. पण, एक मात्र नक्की हा माणूस आहे कुठूनही आणि कोणत्याही वयातून उभारी घेऊ शकतो. याचे अनेक दाखले देता येतील, की आभाळ फाटलं तरी त्याला 'शिवण्याची' किमया हा माणूसच करू शकतो. कोरोनात घरात बसून नैराश्य आलय. कोणी बाहेर पडतही असेल तरी चैतन्यमय वातावरणाचा सर्वत्र अभाव दिसतोय. अशा संकटाच्या काळात विविध उदाहरणं देऊन आपल्याला सकारात्मक जगात घेऊन जाण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न होतात. पण, ढासळ्यावर पुन्हा उभे राहणे वाटते तितके सहज शक्य नाही. मात्र, ढासळणारच नाही तर पडण्याची मज्जा कशी येणार? आणि पडलेच नाही तर उभे कसे होता येईल? त्यामुळे म्हणतात ना, 'संकट संधी घेऊन येतात'. ही बाब हेरून यातून उभारी घेता येऊ शकते. समुद्र किनाऱ्यावरील तप्त वाळूमध्येही एखादे फुल तग धरून असते. मात्र, माणसाचे जीवन या फुलासारखे आहे आणि नाही पण. प्रतिकूल परिस्थिती जीवनात येतेच. परंतु, कोरोना सारखी नसते, हे देखील तेवढेच सत्य आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी फक्त आणि फक्त सढळ मदत करणारी आपली माणसं असणं आवश्यक आहे. मदत म्हणजे आर्थिकच नव्हे तर शब्दांची किंवा नात्याची. 'चांगली दिशा दाखविनारी माणसं पेरा',असे बोलले जाते. माणुसकी आहे तोपर्यंत कोरोनाच काय तर कोणतेही संकट कोसळेल. पण, माणुसकी ओशाळते तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यातच संकटकाळात कुणाच्या परिस्थितीतून स्वतःचा फायदा करून घेण्याचा काही जणांचा मानस असतो. फायदा घेण्याची मानसिकता बाळगणाऱ्यासाठी तर माणुसकीच्या मजबूत भिंतीलाही तडा जाऊ शकतो. म्हणून माणुसकीचा दिवा नेहमी तेवत ठेवा. कोरोनात शक्य झालंय तरी लवकर उभारी घेता येणार नाही. मनाप्रमाणे जगण्याचे दिवस आता कोरोनाने भुर्रर्र केलेय. म्हणजे असे नाही की, मनाप्रमाणे आणि वाट्टेल तसे जीवन जगता येणार नाही, ते पन क्षण येतीलच. हळूहळू परिस्थिती सावरू लागल्यावर आपण उज्ज्वल भविष्याचे एक-एक दार उघडू आणि पुन्हा जोमाने भरारी घेऊ... !
-मंगेश दाढे
mangeshdadhe@gmail.com