इरई नदीलगतच्या शहराच्या वस्तितील काटेरी बाभुळचे झुडुपे नष्ट करण्याची महागनरपालीके कडे मागणी
राज्याचे वनविभागाचे प्रधान सचिव, पिसीसीएफ, एनटीसीए चे महानिरीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना इको-प्रो चे निवेदन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
मागील दोन-तिन वर्षापासुन सिएसटिपीएस परिसरातील वेडी बाभुळचे कृत्रीम जंगलामुळे तसेच परिसरात उपलब्ध पाणी व मोकाट जनावरे यामुळे वाघांकरिता उत्तम अधिवास निर्माण झालेला असुन सदर परिसर वाघिणीने पिल्लांना जन्म देणे व संगोपन करण्याच्या दृष्टीने स्विकारलेला आहे. नैसर्गिक जंगल नसलेल्या औदयोगिक परिसरातील वाघांनी सदर अधिवास स्विकारणे, आणी तिथेच वावरणे ही बाब भविष्यात धोकादायक ठरेल यात शंका नाही. सध्यास्थितीत वाघांची मोठी झालेली छावे आता नागपुर रोड च्या उजव्या बाजुस, सिएसटीपीएस च्या संरक्षण भिंती लगत असलेल्या राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर तर आता पुढे इरई नदीच्या पात्रातुन प्रवास करित वडगांव, हवेली गार्डन, दाताळा-कोसाराच्या शेतशिवार लगत मानवी वस्ती पर्यत येउ लागलेली आहे.
मात्र शहरालगत किंवा शहरी भागात असलेला वाघांचा वावर ही ‘शहरी मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या’ दिशेने पडलेले पाउल आहे. यावर वेळीच उपाय योजना करण्याची मागणी इको-प्रोचे बंडु धोतरे, मानद वन्यजीव रक्षक यांनी केली आहे.
हप्ताभरापासुन इरई नदीकाठच्या वस्तीत वाघाचे अस्तित्व दिसल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वाघाच्या सभाव्य धोकापासुन सुरक्षितेकरिता वस्तिच्या सभोवताला इरई नदीच्या दिशेने भागातील काटेरी बाभळीचे झुडुप सदृष जंगलाची सफाई करणे, प्रखर प्रकाशव्यवस्थेसोबत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणीसह नागरीकांनी सुरक्षीतता बाळगण्याचे आवाहन इको-प्रो तर्फे करण्यात आले आहे.
सिटीपीएस मधिल वाघांच्या समस्येबाबत विविध स्तरावर झाल्या आहेत बैठका
मागील वर्षी मुंबई मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मा. वनमंत्री यांचे उपस्थितीत ‘राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या’ बैठकीत (5 डिसें 2018) सिटीपीएस औदयोगीक परिसरातील वाघांचा अधिवास आणी समस्येकडे वन्यजीव संल्लागार मंडळाचे सदस्य तसेच मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी लक्ष वेधले होते. यानुसार सदर विषयावर प्रधान सचिव वने यांनी सुध्दा याविषयावर स्वंतत्र बैठक घेत सविस्तर चर्चा करित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यानंतर चंद्रपूर येथे मा. जिल्हाधिकारी व मा. पोलीस अधिक्षकांनी वेळोवेळी सिएसटीपीएस व्यवस्थापन, वनविभागासोबत झालेल्या बैठकीत सुध्दा यावर उपाययोजना करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
मागील महिन्यात राष्ट्रवादी नगर मध्ये वाघांचे अस्तित्व दिसुन आल्यावर परत प्रशासनास निवेदन देण्यात आल्यानंतर लगेच, 23 नोव्हे 2019 मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य वनसंरक्षक व पोलीस अधिक्षक यांनी सिटीपीएस मध्ये बैठक घेत आवश्यक सुचना दिलेल्या होत्या, त्यांनतर 13 डिसेंबर ला राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सिटीपीएस तसेच लगतच्या राष्ट्रवादी नगर मानवी वसाहतीस भेट देत परिस्थतीची पाहणी करित संबधिताची बैठक घेतली या बैठकीस मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, विभागीय वनअधिकारी, सिटीपीएसचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वनविभाग व जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात आलेल्या सुचना व कार्याचा आढावा घेण्यात आला.
सिटीपीएस परिसरात उपाययोजना त्वरीत करण्याची गरज
सिटिपीएस मधील वाघ समस्या संदर्भात प्रत्येक वेळेस विवीध स्तरावर झालेल्या बैठकीनुसार सुचना दिल्या जातात. नुकतेच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी एक समीती तयार करण्यात आली होती. त्यानुसार या परिसरात करावयाच्या उपाययोजनाचा आराखडा तयार करण्यात आला असुन यानुसार कार्यवाही सिटीपीएस व्यवस्थापनाकडुन युध्दपातळीवर करण्याची गरज आहे. सिटीपीएस चे परिसरातील सदर वाघांची समस्या आता शहरी वस्तीत दिसुन येत असल्याने येथील मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या दृष्टीने हया उपाययोजना महत्वाच्या आहे.
इरई नदिलगतच्या परिसरात वाघाचा वावर काटेरी झुडपामुळे
चंद्रपूर महाऔष्णीक विदयुत केंद्र परिसरात तसेच लगतच्या परिसरात मोठया प्रमाणात ‘काटेरी बाभुळ’ म्हणजे ‘प्रोसोपिस’ या प्रजातीच्या वनस्पतीचे कुत्रीम जंगल तयार झालेले आहे. दाटी-वाटीने वाढणारी ही वनस्पती यामुळे निर्माण होणारी जंगलसदृष अधिवास हा वन्यप्राणी यांच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहे. या संपुर्ण परिसरात मोकाट जनावरांची संख्या सुध्दा मोठया प्रमाणात असुन, येथे सतत वाहणारे नाले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी यांना योग्य लपण, खादय आणी पाणी यामुळे वन्यप्राणी करीता योग्य असा अधिवास निर्माण झालेला आहे. हिच परिस्थीती इरई नदीपात्रालगत असल्याने वाघाचा वावर नदीपात्रात असल्याने या मार्गाने पुढे आल्याने मानवी वस्तीत वाघाचा वावर दिसुन येत आहे.
यात वडगाव, हवेली गार्डन, जगन्नाथ बाबा मठ तर दुसÚया बाजुस दाताळा कोसारा कडील शेतशिवाराचा भाग आहे. नदी काठच्या मानवी वसाहतीतील काटेरी बाभळीचे जंगल सदृष झुडुप काढुन तिथे प्रखर प्रकाशव्यवस्था करण्याची गरज आहे. सोबतच या परिसरातील खुले प्लाॅटवरील झुडपे स्वच्छ करण्यास त्या-त्या प्लाॅट धारकास बंधनकारक करणे गरजेचे आहे. या परिसरातील मोकाट जनावरे व डुकरांच्या त्वरीत बंदोबस्त करण्याची गरज आहे, जेणेकरून या खादयाच्या मागे वस्तीत वाघाचा प्रवेश होणार नाही. याबाबत इको-प्रो ने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देत मागणी केलेली आहे.
मानव-वन्यप्राणी संघर्षापुर्वीच सदर वाघांचे ‘स्थांनातरण’ आवश्यक
सिटीपीएस परिसरात वाघांचा वावर आहेच. त्यासोबत प्रत्येक वर्षी एकामागुन एक मादी वाघ सदर परिसरात आपले बस्तान मांडुन पिल्लांना जन्म देण्याचा प्रकार लक्षात आलेला आहे, त्यांचे संगोपन करणे हे असेच सुरू राहीले तर अत्यंत धोक्याचे आहे. याकरिता वनविभाग व शासन पातळीवर या विषयाची गंभिरता लक्षात घेवुन या मानवी वस्तीतील वाघांचा वावर यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेता सदर वाघांचे एकत्र ‘स्थानांतरण’ हा पर्याय आहे. वाघांच्या स्थांनातरणाच्या प्रस्तावासंदर्भात स्थानिक वनविभाग सकारात्मक असुन शासनस्तरावर ही बाब गंभिरतेने घेण्याची गरज असुन सदर मागणी राज्याचे वनविभागाचे प्रधान सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महानिरीक्षक राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, मुख्यवनसंरक्षक व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना इको-प्रो चे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी केली आहे.