Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर २३, २०१९

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील 71 उमेदवारांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

विधानसभा निवडणुक निकाल २०१९ साठी इमेज परिणाम
24 ऑक्टोबरच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात 21 ऑक्टोबर ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे या निवडणुकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील 71 उमेदवारांनी सहभाग घेतला होता या सर्व उमेदवारांचे उद्या भवितव्य ठरणार असून 24 ऑक्टोबर 2019 रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.

जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राच्या स्ट्रॉंग रूमवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मतमोजणीसाठी प्रशिक्षित कर्मचारीवर्ग नियुक्त केला गेला आहे. या मतमोजणीसाठी 354 अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे. यामध्ये 6 विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीसाठी 84 मतमोजणी टेबल, 84 मतमोजणी निरीक्षक, 24 आरक्षित मतमोजणी निरीक्षक असे एकूण 108 मतमोजणी निरीक्षक निरीक्षकांची नेमणूक केली गेली आहे. तसेच एकूण 108 मतमोजणी सहाय्यक नियुक्त केले गेले आहे. सोबतच मतमोजणी मध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याकरिता 138 अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले गेले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 76 हजार 351 मतदार आहेत. त्यामध्ये 9 लाख 62 हजार 378 पुरुष मतदार तर 9 लाख 13 हजार 951 स्त्री मतदारांचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 22 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 64.48 टक्के मतदान झाले. यामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघात 70.95 टक्के मतदान झाले. तर बल्लारपूर क्षेत्रात 62.26 टक्के, सोबतच ब्रह्मपुरी क्षेत्रात 71.10 टक्के आणि वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये 62.38 मतदान नोंदवले गेले. विशेष चिमुर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 74.63 टक्के मतदान झाले सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 51.02 टक्के मतदान झाले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात 66.27 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघातून 70.83 टक्के मतदान, चंद्रपूर मतदारसंघात 54.07 टक्के, बल्लारपूर मतदारसंघात 63.18 टक्के, ब्रह्मपुरी मतदारसंघात 74.87 टक्के, चिमूर मतदारसंघात 74.55 टक्के तर वरोरा विधानसभा मतदारसंघात 64.81 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत 63.86 टक्के मतदान झाले होते.

या ठिकाणी होणार मतमोजणी
सर्व विधानसभा क्षेत्राच्या स्ट्रॉंग रूम परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राची मतमोजणी उपविभागीय कार्यालय चंद्रपूर येथे होणार आहे. तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्राची मतमोजणी प्रशासकीय भवन, मुल येथे मतमोजणी पार पडणार आहे. वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती मोहबाळा रोड येथे होणार आहे. तर चिमूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह तहसील कार्यालय परिसरात पार पडणार आहे. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे होणार आहे. तर राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय परिसरात पार पाडण्यात येणार आहे. 

या उमेदवारांचे ठरणार भवितव्य
राजुरा मतदारसंघातील 12 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. यामध्ये अपक्ष म्हणून जयराम चरडे, रेशमा चव्हाण, शामराव सलाम, संतोष येवले, अनिल सिडाम, तसेच इंडियन नॅशनल काँग्रेस कडून सुभाष धोटे, स्वतंत्र भारत पक्षाकडून वामनराव चटप, बहुजन समाज पार्टी कडून भानुदास जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून गोदरू जुमनाके, भारतीय जनता पार्टी कडून ॲड. संजय धोटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून महालिंग कंठाळे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून प्रवीण निमगडे हे उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत उतरले होते.

चंद्रपूर मतदारसंघातून 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. यामध्ये अपक्ष म्हणून संदीप पेटकर, तथागत पेटकर, किशोर जोरगेवार, मंदिप गोरडवार, तसेच भारतीय जनता पार्टी कडून नानाजी शामकुळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून बबन रामटेके, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया कडून नामदेव गेडाम, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून महेश मेंढे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून अमृता गोगुलवार, बहुजन वंचित आघाडी कडून अनिरुद्ध वनकर, बहुजन समाज पार्टी कडून सुबोध चूनारकर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी कडून ज्योतीदास रामटेके या उमेदवारांचे भवितव्य उद्याच्या मतमोजणीनंतर कळणार आहे. 

बल्लारपूर मतदारसंघातील एकूण 13 उमेदवाराचे भविष्य माहिती पडणार असून यामध्ये अपक्ष म्हणून बंडू वाकडे, अशोक तुमराम, सागर राऊत, तारा काळे,अनेकश्वर मेश्राम, तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून मनोज आत्राम, बहुजन समाज पार्टी कडून सरफराज शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून अरुण कांबळे, इंडियन नॅशनल काँग्रेस कडून डॉ. विश्वास झाडे, आम आदमी पार्टीकडून ताहेर हुसेन, भारतीय जनता पक्षाकडून सुधीर मुनगंटीवार, वंचित बहुजन आघाडी कडून राजू झोडे, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया कडून सचिन टेंभुर्णे या उमेदवारांचा समावेश आहे. 

ब्रह्मपुरी मतदारसंघातून एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये अपक्ष म्हणून प्रणव सोमनकर, विश्वनाथ श्रीरामे, अजय पांडव, विनय बांबोडे, इंडियन नॅशनल काँग्रेस कडून विजय वडेट्टीवार, आम आदमी पार्टीकडून ॲड. पारोमिता गोस्वामी, शिवसेना पक्षाकडून संदीप गड्डमवार, बहुजन वंचित आघाडी कडून चंद्रलाल मेश्राम, बहुजन समाज पार्टी कडून मुकुंदा मेश्राम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद झोडगे, संभाजी ब्रिगेड पार्टीकडून जगदीश पीलारे या उमेदवाराचे भवितव्य उद्या कळेल. 

चिमूर मतदारसंघातून 10 उमेदवार निवडणुकीत सहभाग असून यामध्ये अपक्ष म्हणून कैलास बोरकर, अजय पिसे, धनराज मुंगले, हरिदास बारेकर, तसेच अखिल भारतीय मानवता पक्षाकडून वनिता राऊत, इंडियन नॅशनल काँग्रेस कडून सतीश वाजुरकर, बहुजन वंचित आघाडी कडून अरविंद सांदेकर, बहुजन समाज पार्टी कडून सुभाष पेटकर, भारतीय जनता पार्टी कडून किर्तिकुमार भांगडीया, भारतीय शेतकरी कामगार पक्ष कडून प्रकाश नान्हे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उतरले आहेत.

वरोरा विधानसभा मतदारसंघातून एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. यात अपक्ष म्हणून डॉ. विजय देवतळे, प्रवीण गायकवाड, अशोकराव घोडमारे, प्रवीण सुराणा, इंडियन नॅशनल काँग्रेस कडून प्रतिभा धानोरकर, वंचित बहुजन आघाडी कडून अमोल बावणे, संभाजी ब्रिगेड कडून उत्तम ईश्वर इंगोले, बहुजन समाज पार्टी कडून प्रशांत भडगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून रमेश राजूरकर, बहुजन विकास आघाडीकडून अशरफ खान, शिवसेना पक्षाकडून संजय देवतळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून भास्कर डेकाटे, गोंडवाना गणतंत्र पार्टी कडून रमेश मेश्राम या उमेदवाराचे भविष्य मतमोजणीनंतर माहिती होणार आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.