Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १९, २०१८

स्क्रब टायफस,मलेरिया,डेंगू,सारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करा :मुनगंटीवार

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक; मोहीम राबविण्याचे निर्देश
चंद्रपूर /प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध इस्पितळात व सरकारी रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यू व अन्य किटकजन्य आजार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला सोबत घेऊन या आजारावर नियंत्रण मिळविणारी मोहीम सक्रियतेने राबवावी, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. मुंबईवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलतांना त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये किटकजन्य आजार नियंत्रण करणे गरजेचे असल्याचे वातावरण तयार झाले असून काही लोकांना डेंगू सदृश्य आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय हिवताप लागण झालेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यामधील वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरी भागांमध्ये यासंदर्भातील उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी आजच्या बैठकीत केले. आजार पसरू नये यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, आजार ज्यांना झाला असेल त्यांच्यावर उपचार करणाऱ्या उपाययोजना आणि आजार होऊ नये यासाठी सार्वत्रिक स्वरूपात करायच्या प्रसिद्धी मोहिमेला आखण्याचे आवाहन ना.मुनगंटीवार यांनी आजच्या बैठकीत केले.
जिल्हाधिकार्‍यांनी घेतली बैठक
पालक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संबोधनापूर्वी जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील किटकजन्य आजाराबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. पावसाळा संपण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये मलेरिया, डेंग्यू आणि स्क्रब टायपस या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण औषधोपचार मिळाला नाही असा असता कामा नये, असे त्यांनी या यंत्रणेला बजावले. तसेच गरिबातील गरीब केवळ पैसे नाहीत म्हणून कुठल्याही औषध उपचाराअभावी गंभीर होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील जनतेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा लाभ घ्यावा. जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये मलेरिया, डेंगू व अन्य आजाराबाबत इलाज करणारा प्रशिक्षित वर्ग असून सर्व सुविधा जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात देण्याइतपत पैसे नाही म्हणून कोणीही उपचाराविना राहू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात यासंदर्भात मोफत सर्व सुविधा उपलब्ध केल्या असून जनतेने यासाठी या सुविधांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी जिल्ह्यांमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकून गुनिया,, स्क्रब टायफस आदी आजाराबाबत जिल्हाभरात खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या रुग्ण संख्येच्या माहिती घेतली. कीटकजन्य शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आलेल्या गावांची संख्या व त्याबाबतच्या अहवाल याबद्दलही चौकशी केली. या आजारासाठी आवश्यक असणाऱ्या प्रतिबंधित उपाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना जागरुक करावे व गरज पडल्यास अस्वच्छता ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

शासकीय यंत्रणा एकीकडे उपाय योजना करीत असताना नागरिकांनी देखील आपले स्वच्छतेचे कर्तव्य निष्ठेने पार पडणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले. डास मारण्यावर उपायोजना, गप्पी मासे पैदास केंद्रामध्ये वाढ करणे, मच्छरदाणीचा मोठ्या संख्येने वापर करणे, स्वच्छता मोहिमेची आखणी करणे, शिक्षकांची व पंचायतराज सदस्यांची कार्यशाळा घेणे, प्रसिद्धी साहित्य वाटप करणे आदी उपाययोजना करण्याबाबत आरोग्य यंत्रणेला सांगितले
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साठे, जिल्हा हिवताप हत्तीरोग अधिकारी डॉ.अनिल कुकडपवार, महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अंजली आंबटकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, पालकमंत्र्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय इंगोले या सहा आरोग्य यंत्रणेतील अनेक अधिकारी उपस्थित होते.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.