Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर १८, २०१८

चंद्रपूरची मुले मिळविणार भारतासाठी ऑलिम्पिक पदक

2024 मध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणारे 
चंद्रपूरची मुले मिशन शक्ती मधून पुढे येतील :ना. मुनगंटीवार
राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचा चंद्रपुरात समारोप
चंद्रपूर /प्रतिनिधी:
मिशन शक्ती मधून 2024 मध्ये चंद्रपूरची मुले ऑलिम्पिक पदकासाठी सज्ज व्हावीत, यासाठी जिल्हाभरात क्रीडा संकुल अद्ययावत करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी औद्योगिक घराण्यांची मदत घेतली जाणार आहे. ख्यातनाम चित्रपट अभिनेते आमिर खान यांच्या हस्ते मिशन शक्ती ची सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय स्पर्धेतील महाराष्ट्रातील विजेत्यांना मुनगंटीवार यांनी पुरस्कार प्रदान केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत या समारोपीय सत्राचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले व मुली 17 वर्षाखालील मुले व मुली व 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धा व क्रीडा प्रबोधिनीचे वर्चस्व कायम राहिले. सर्व विभागांना संमिश्र यश देणाऱ्या हा स्पर्धा गेल्या चार दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी जिल्हा क्रीडाधिकारी अनंत बोबडे व त्यांच्या चमूचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्वागत केले.
महाराष्ट्राच्या सर्वदूर भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी शुभेच्छा देताना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई पुण्यापासून ते अमरावती नाशिकच्या सर्व विद्यार्थ्यांनी ताडोबाचे वाघ बघून जावे यासाठी त्यांची व्यवस्था करत असल्याची गोड बातमी या भाषणादरम्यान दिली. सध्या आयोजित होत असलेल्या चंद्रपूर येथे काही दिवसानंतर ऑलंपिकपटू सोबत तुमच्या मुलाखती होतील,असे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी मिशन शक्ती संदर्भात माहिती दिली. मिशन शक्ती अंतर्गत सहा निवडक ऑलिम्पिकच्या क्रीडा प्रकारामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व स्तरातील गुणवान खेळाडूंची निवड करून त्यांना 2024 च्या ऑलम्पिक साठी सिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरात सर्व तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत क्रीडा संकुल तयार होत आहे. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी रिलायन्स या उद्योग घराण्याने मदत देण्याची मान्यता दिली आहे. तर लगान व दंगल या सिनेमातून क्रीडा प्रकाराला वाव देणाऱ्या अमीर खान यांनी मिशन शक्ती ही संकल्पना उचलून धरली असून त्यांच्या हस्ते मिशन शक्तीची सुरुवात चंद्रपूर मध्ये लवकरच करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला आतापर्यंत केवळ 28 मेडल ऑलिम्पिकमध्ये मिळाले असून आता क्रीडा क्षेत्रामध्ये काटक, गुणवान अशा सर्व स्तरातील ग्रामीण भागातील मुलांना योग्य संधी देऊन ऑलिम्पिक मेडलची संख्या वाढवण्याची मनीषा असल्याचे त्यांनी सांगितले. मिशन शौर्य अंतर्गत सतरा -अठरा वर्षाचे आदिवासी विद्यार्थी एवरेस्ट सर करू शकले. त्यामुळे योग्य ट्रेनिंग दिल्यास चंद्रपूर-गडचिरोली भागातील तरुण क्रीडा प्रकारात चमक दाखवू शकतात, अशी शाश्वती आपणास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महापौर अंजलीताई घोटेकर यांनी देखील खेळाडूंशी संवाद साधला. तत्पूर्वी चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर राजेश नायडू, कुंदन नायडू, प्राध्यापक वसंतराव अकुलकर आदींची उपस्थिती होती. 
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विभागवार विजेत्यांची नावे गटानुसार पुढीलप्रमाणे आहे
या क्रीडा स्पर्धेचे प्रथम, व्दितीय व तृतिय क्रमांकाचे विजय संघ पुढील प्रमाणे- 14 वर्ष वयोगटातील मुले प्रथम बक्षिस क्रीडा प्रबोधिनी, व्दितीय पुणे व तृतिय नाशिक, 14 वर्षाखालील मुली प्रथम क्रीडा प्रबोधिनी, व्दितीय मुंबई व तृतिय अमरावती, 17 वर्षे वयोगटातील मुले प्रथम मुंबई, व्दितीय क्रीडा प्रबोधिनी व तृतिय नाशिक, 17 वर्षाखालील मुली प्रथम मुंबई, व्दितीय क्रीडा प्रबोधिनी व तृतिय नागपूर, 19 वर्षे वयोगटातील मुले प्रथम क्रीडा प्रबोधिनी, व्दितीय मुंबई व तृतिय कोल्हापूर आणि 19 वर्षाखालील मुली प्रथम मुंबई, व्दितीय पुणे व तृतिय कोल्हापूर या संघानी पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये 17 वर्ष वयोगटात नाशिक, क्रीडा प्रबोधिनी नागपूर, औरगांबाद, 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात मुंबई, लातूर, 14 वर्ष मुलांच्या गटात कोल्हापूर, क्रीडा प्रबोधिनी पुणे, अमरावती, नागपूर, 14 वर्ष मुलींच्या गटात पुणे, क्रीडा प्रबोधिनी मुंबई व अमरावती संघानी प्रावीण्या प्राप्त केलेले आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.