बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणा-या कामगारांची नोंद घेऊन त्यांना अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत 21 प्रकारचे काम करणा-या कामगारांना या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील 6 जिल्हयाची निवड करण्यात आली होती. दुस-या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्हयाची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हयाचा समावेश करण्यात आला असून या जिल्हयातील स्त्री, पुरुष सर्व कामगारांची नोंदणी करण्याकरीता विशेष नोंदणी अभियान 4 जुलै ते 3 ऑगष्ट 2018 या कालावधीत जिल्हयात राबविण्यात येत आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्हयात बहुउदेशीस समाज मंदीर व डॉ.कल्लुरवार हॉस्पीटल समाज भवन बल्लारपूर, मेजर स्टोर गेट दुर्गापूर, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी इमारत बंगाली कॅम्प चंद्रपूर व एकोरी वार्ड श्री.टॉकीज चौक चंद्रपूर या ठिकाणी नाव नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले. त्यामुळे जिल्हयातील सर्व विविध क्षेत्रात काम करणा-या कामगारांनी आपल्या नावांची नोंद करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त उ.सु.लोया यांनी केले आहे.
शासनाने 18 ऑगष्ट 2017 च्या अधिसुचनेव्दारे समावेश होणारे खालील कामगार यामध्ये समाविष्ट होणार आहेत. त्यामध्ये दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे, लादी किंवा स्टाईल कापणे, पॉलीश करणे, रंग, वारनीश लावणे, सुतारकाम करणे, गटार व नळ जोडणी, वायरींग, वितरण तावदान बसविने इत्यादी विद्युत कामे, अग्नीशमन यंत्रणा बसविने, दुरुस्ती करणे, वातानुकुलीत यंत्रणा बसविणे व दुरुस्ती करणे, उदवाहने, स्वयंचलीत जिणे बसविणे, सुरक्षा दरवाजे उपकरणे बसविणे, माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवासी निवारे किंवा बसस्थानक, सिंग्नल यंत्रणा इत्यादी 21 प्रकारचे बांधकाम करणा-या कामगारांची नोंद करण्यात येणार आहे.
या 21 प्रकारच्या कामात कार्यरत असलेल्या किंवा मागील वर्षात 90 दिवसापेक्षा अधिक दिवस काम केलेल्या कामगारांची नोंदणी 4 जुलै ते 3 ऑगष्ट 2018 कालवधीत जिल्हयातील प्रत्येक महापालिका, नगरपालिका, ग्राम पंचायत क्षेत्राच्या ठिकाणी तसेच प्रत्यक्षात कामगार काम करीत असलेल्या ठिकाणावर विशेष शिबीर आयोजित करुन नाव नोंदणी करणे व त्यांना ओळखपत्र वाटप करणे असा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या शिबीरामध्ये शासनाने नियुक्त केलेले नोंदणी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहून पात्र कामगारांची नोंदणी करणे व त्याच वेळी डाटाएन्ट्री करुन रेकार्ड तयार करणे अशी कामे करणार आहेत.
ज्या कामगारांची नाव नोंदणी झालेली आहे, अशा कामगारांना विविध प्रकारचे लाभ व कल्याणकारी योजना लागू करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गीक प्रसुतीसाठी 15 हजार व शस्त्रक्रीयेसाठी 20 हजार आर्थिक सहाय्य, 2 पाल्यास इयत्ता 1 ते 7 साठी प्रतीवर्षी 2500 रुपये तर 8 वी 10 वीसाठी प्रतीवर्षी 5 हजार एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य, 10 वी 12 वी मध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त झाल्यास 10 हजार प्रोत्साहनात्मक रक्कम, तर 11 वी 12 वीच्या शिक्षणासाठी प्रतीवर्षी 10 हजार एवढे शैक्षणिक सहाय्य, पदवीच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतीवर्षी 20 हजार रुपये, व्यवसायीक व वैद्यकीय शैक्षणिक साहित्यासाठी प्रती वर्षी 60 हजार तर शैक्षणिक सहाय्यासाठी 1 लाख रुपये देण्यात येणार आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी 20 हजार तर पदवीत्युतर शिक्षणासाठी 25 हजार रुपयाचे सहाय्य करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या विविध 19 बाबीवर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदनी पात्र कामगारांना लाभ देण्यात येत आहे.
त्यामुळे जिल्हयातील पात्र स्त्री, पुरुष कामगारांनी या महिनाभर सुरु असलेल्या अभियाना दरम्यान नियोजित केंद्रावर आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून स्वत:ची नोंदणी करुन कामगारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ स्वत: व आपल्या कुटुंबीयांना मिळवून देण्यासाठी शासनाच्या या महत्वाकांशी प्रकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूरचे सहायक कामगार आयुक्त उ.सु.लोया यांनी केले आहे.