चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कर्मवीर पुरस्काराचे वितरण
चंद्रपूर : अलीकडे माध्यम बदलत आहेत़ आता प्रत्येकांच्या हातात मोबाईलरुपी माध्यम आले आहे़ सोशलमीडियामुळे माध्यमांची कक्षा रुंदावली मात्र, या माध्यमात मुद्रित आणि इलेक्ट्रानिक माध्यमांचे महत्त्व आजही आहे़ लोकशाहीचे चार स्तंभ आहेत़ यातील तीन स्तंभाची विश्वार्हता धोक्यात आली आहे़ मात्र, वृत्तपत्र माध्यमाची विश्वार्हत आजही कायम आहे, असे ज्येष्ठ पत्रकार, विश्व मराठी संमेलनाचे पूर्वसंमेलनाध्यक्ष संजय आवटे यांनी व्यक्त केले़ चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते़
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या कर्मवीर पुरस्कारासह विविध स्पर्धा पुरस्काराचे वितरण रविवारी येथील सीडीसीसी बँकेच्या कन्नमवार सभागृहात करण्यात आले होते़ अध्यक्षस्थानी वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार होते़ यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ महेश्वर रेड्डी, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय तुमराम, कर्मवीरपुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार अरुण दिवाण, विजय बनपूरकर उपस्थित होते़
आवटे म्हणाले, पत्रकारांनी उजेडात बातम्या शोधू नये, तर अंधारात बातम्या शोधाव्यात़ अंधारात बातम्या शोधाव्यात़ म्हणजेच आजच्या समस्यांवर, समाजाच्या सुखदुखावर बातम्या शोधल्या पाहिजेत हीच खरी पत्रकारिता आहे़ पत्रकारांचा काय रोल हे पत्रकारांनी ओळखले पाहिजे़ पत्रकारांनी सर्वसामान्यांच्या सुखदु:खाची मांडणी करतानाच त्यांच्या आकांक्षा तेवढ्याच प्रकर्षाने मांडव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली़ माध्यमं बदलत राहणार, माध्यमांचा आशय बदलता कामा नये, असेही ते म्हणाले़
यावेळी अतिथीचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला़ तर अतिथींच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार अरुण दिवाण, विजय बनपूरकर यांना कर्मवीर पुरस्कार सन्मापूर्वक प्रदान करण्यात आला़ ग्रामीणवार्तासाठी दिला जाणारा पुरस्कार जितेंद्र सहारे, आशिष दरेकर, नीळकंठ ठाकरे, राजकुमार चुनारकर, प्रा़ धनराज खानोरकर यांना प्रदान करण्यात आला़ मानवी स्वारस्य अभिरुची कथा पुरस्कार चुन्नीलाल कुडवे, उत्कृष्ट वृत्तांकन टिव्ही पुरस्कार अन्वर शेख, शुभवार्ता पुरस्कार हितेश गोहोकार, हौशी वृत्त छायाचित्र पुरस्कार संदीप रायपुरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख राशी असे पुरस्काराचे स्वरुप आहे़
यावेळी स्पर्धेचे परीक्षक प्रशांत आर्वे, प्रा़ योगेश दुधपचारे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांचाही मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ कार्यक्र माचे प्रास्तविक संजय तुमराम, संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले़ तर जितेंद्र मशारकर यांनी आभार मानले़ कार्यक्रमाला ज्येष्ठ रिपाइं नेते व्ही़ डी़ मेश्राम, किशोर पोतनवार, प्रा़ सुरेश चोपणे, संजय वैद्य, बंडू लडके़ नंदा अल्लूरवार, प्रा़ विमल गाडेकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती़.