Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट १८, २०१८

चंद्रपूरमध्ये आदिवासी मुलींच्या 360 क्षमतेच्या अद्यावत वसतिगृहाचे लोकार्पण

मुलींनो ! ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा : ना.सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर/प्रतिनिधी:
  पूर्वी ज्याच्याकडे ताकद होती, तो जगावर राज्य करायचा. त्यानंतर ज्याच्याकडे पैसा होता. तो जगावर राज्य करायचा. मात्र आता ज्याच्याकडे ज्ञान आहे. तोच जगावर राज्य करू शकतो. मुलींनो ज्ञानार्जनातून जगाचे नेतृत्व करा. चंद्रपूरचे नाव जगभर पोहोचवा, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींना वस्तीगृहाची अद्यावत इमारत लोकार्पित करताना केले. चंद्रपूरमध्ये 360 क्षमतेच्या अद्यावत वसतिगृहामध्ये आठवडयात मुली निवासी जाणार आहेत.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर चंद्रपूर येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक एक व दोनचे लोकार्पण विद्यार्थिनींच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले. सद्या खासगी जागेत राहणा-या मुलींना उदघाटन करताना नव्या वसतीगृहात राहण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. या लोकार्पण सोहळ्याला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे आदी उपस्थित होते.
  जगावर सद्या राज्य ज्ञानाचे आहे. ज्ञान मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. भारतामध्ये विशेषत महाराष्ट्रात मुलींनी गुणवत्ता क्षेत्रात भरारी मारली आहे. डॉक्टर मुली आणि कंपाउंडर मुले अशी स्थिती अनेक ठिकाणी झाली आहे. महाराष्ट्रामध्ये मुलींच्या गुणवत्तेतील भरारीने मुलांपेक्षा जास्त मुलींच्या वसतिगृहांची आवश्यकता झाली आहे. कोणत्याही क्षेत्रात मुलींचे अस्तित्व ठळकपणे उमटत आहेत. त्यामुळे 360 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे केवळ स्वतःसाठी न वापरता हा देश, हा समाज जगाचं नेतृत्व करणारा झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आदिवासी मुली कुठेही कमी नाहीत हजारो वर्षांपूर्वी एकलव्यानेही बाब सिद्ध केली होती. ही एकलव्याची भूमी आहे. त्यामुळे चंद्रपूरची गुणवत्ता जागतिक पातळीवर उमटेल अशा पद्धतीने अभ्यास करा, असे आवाहनही त्यांनी केले. आदिवासी मुलामुलींना शिक्षण व शैक्षणिक क्षेत्रासोबतच आता औद्योगिक व व्यापारी क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. चंद्रपूरमध्ये लवकरच कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. यामुळे या भागातील सर्व घटकातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील संबोधित केले. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आदिवासी समूहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे विविध क्षेत्रात कार्य गेल्या काही वर्षात घडत असून त्याचे दृश्य परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुषमा साखरवाडे यांनी 18 महिन्यात पूर्ण करण्यात आलेली ही इमारत अभ्यासाला पूरक अशा सर्व सोयीसुविधांनी युक्त असल्याचे सांगितले.


भाऊंनी 72 तासात पुस्तके विद्यार्थिनींना पुरविली : या कार्यक्रमाचे संचालन करणारे सहायक अधीक्षक अभियंता मनोज जुनोनकर यांनी संचालन करताना नव्या इमारतीमध्ये अद्यावत अभ्यासिकेची देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्मिती केली आहे. याठिकाणी फर्निचर व आवश्यक सुविधा देखील केल्या आहेत. मात्र पुस्तके नाहीत. पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षात पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके देण्याची परंपरा लावली आहे. त्यामुळे नवी नाहीतर भाऊंकडे जमा झालेली चांगली पुस्तके या मुलींना वाचायला मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात मुलींना अभ्यासाची आणि सामान्य ज्ञानाची पुस्तके देण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर 72 तासातच नव्या वसतीगृहात मुली जाण्यापूर्वीच सध्या राहत असलेल्या त्यांच्या वसतिगृहावर आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, विशेष कार्याधिकारी डॉ.विजय इंगोले, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुहास अलमस्त, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे सचिव दत्तप्रसन्न महादनी, राज चंदेल यांनी सध्या मुलीच्या खाजगी ठिकाणी वसतिगृहामध्ये राहतात. त्या ठिकाणी ही पुस्तके पोहोचू न दिली. आदिवासी वस्तीगृहातील मुलींनी या पुस्तकांसाठी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.