Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट १८, २०१८

नागपुरात घर बांधकामाचा विचार करत असाल तर लागू होणार हा नियम

१२५ चौ. मी. पेक्षा अधिक बांधकामासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आवश्यक
जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांची माहिती : समितीचा घेतला आढावा

नागपूर/प्रतिनिधी: 

रेन वाटर हार्वेस्टिंग के लिए इमेज परिणाम
 घर बांधकाम जर १२५ चौ.मी. किंवा १५०० चौ.फूट पेक्षा अधिक असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. त्यानुसारच नकाशे मंजूर करण्यात येतील, अशी माहिती जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी दिली.
शनिवारी (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जलप्रदाय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, उपसभापती श्रद्धा पाठक, सदस्या जयश्री रारोकर, सदस्य हरिश ग्वालबंशी, संजय बुर्रेवार, कार्यकारी अभियंता (पेंच प्रकल्प) अनिरूद्ध चौगंजकर, प्रभारी कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) प्रदीप राजगिरे, उपअभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे उपसंचालक राजेश कालरा प्रामुख्याने उपस्थित होते.
भविष्यातील पाणी टंचाई रोखण्यासाठी आतापासून पाणी बचतीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक असल्याचा निर्णय जलप्रदाय समितीने घेतला आहे. यापुढे १२५ चौ.मी. पेक्षा जास्त घर बांधकाम असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग आवश्यक राहणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाकडून त्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. याबाबत समितीचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सभागृहाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
जलप्रदाय समितीच्या झोननिहाय आढावा बैठकीचा अहवाल तयार केला की नाही याचा आढावा सभापती पिंटू झलके यांनी घेतला. ज्या तक्रारी बैठकीमध्ये आढळल्या होत्या त्याचे निवारण केले की नाही, याचीही माहिती सभापतींनी घेतली. धरमपेठ व मंगळवारी झोनमधील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोणाच्या आदेशावरून बदलविण्यात आले, असा सवाल सदस्य हरिश ग्वालबंशी यांनी विचारला. त्यावर बोलताना सभापती पिंटू झलके म्हणाले, यानंतर ओसीडब्ल्यूने कोणताही निर्णय घेताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, असे निर्देश दिले. 
नालंदा नगरची पाण्याची टाकी पूर्ण झाली आहे. आता दक्षिण-पश्चिम नागपूरचा पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तातडीच्या पाणी पुरवठा उपाययोजनासंबंधीचा आढावा सभापती पिंटू झलके यांनी घेतला. शासकीय कार्यालयाच्या पाणी देयकाबाबत आढावा घेण्यात आला. पोलिस विभागाचे क्वॉर्टर्स, मुख्यालयाची देयके मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले. यावर बोलताना सभापती श्री.झलके यांनी मनपा आयुक्तांमार्फत सर्वांना पत्र पाठविण्यात यावे, असे सूचित केले.
शहरात सुरू करण्यात आलेल्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेचादेखिल आढावा सभापतींनी घेतला. सद्यस्थितीत १६ स्पॉट्स (कमांड एरिया) तयार झालेले आहे. आणखी काही स्पॉटस्‌ वाढवून पुढील कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
नागरिकांना मोठ्या प्रमाणावर देयके प्राप्त होत आहे. त्यासंबंधी काही उपाययोजना करता येईल का, यावर विचार करण्यात यावा, असे सभापतींनी सांगितले. मागील वर्षात पाण्याच्या देयकाची किती वसुली झाली याचादेखिल आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला. या वर्षी २०० कोटीची वसुली झालीच पाहिजे, असे सभापती श्री .झलके यांनी सांगितले. 
बैठकीला ओसीडब्ल्यूचे अधिकारी व कर्मचारी, मनपाचे डेलिगेट्स यांच्यासह जलप्रदाय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


शहरात विविध ठिकाणी ‘वॉटर एटीएम’ उभारणार 
नागपूर शहरातील विविध ठिकाणी वर्दळीच्या जागेवर ‘वॉटर एटीएम’ उभारण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये राबविण्यात येत आहे. यासाठी लक्ष्मीनगर झोनची निवड करण्यात आली आहे. दरांविषयी एक धोरण निश्चित करून पुढील कार्यवाहीसाठी पुढे पाठविण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता मनोज गणवीर यांनी दिली.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.