वर्धा, इरई, वैनगंगेला पूर : अनेक मार्ग बंद
चंद्रपूर (प्रतिनिधी) : दोन दिवस झालेल्या पावसामुळे जलप्रकल्प, गावतलाव तुडुंब भरले आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे एक मीटरने उघडण्यात आल्याने इरई नदीला पूर आला असून, चंद्रपूर शहरालगतची शेती आणि काठावरील वस्ती पाण्याखाली आली आहे.
यंदाच्या पावसाने जुलै महिन्याची सर्वसाधारण सरासरी ओलांडली असल्याने पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. इरई नदीच्या काठावरील दहा ते बारा गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे वर्धा, पैनगंगा, वैनगंगा, इरई, मूल, अंधारी या नद्यांसह मोठ्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे काठावरील अनेक गावातील घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली. वर्धा नदीला आलेल्या पूराचे पाणी राजुरा-बल्लारपूर मार्गावरील पूलावरून वाहत असल्याने चंद्रपूर-आसिङ्कबाद मार्ग बंद पडला. शिवाय कोठारीजवळील छोट्या पूलावरून पाणी वाहत असल्याने चंद्रपूर-अहेरी मार्ग बंद होता.
जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पाऊस कोसळल्याने मोठ्या प्रमाणात पेरण्या आटोपल्या असल्या, तरी अधिक पावसाने सुमारे सात हजार हेक्टरवर दुबार पेरण्या कराव्या लागणार आहे. मागील दोन महिन्यांत पावसाच्या खंडाचे दिवस खूपच कमी असल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.