Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नागपूर.मनपा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नागपूर.मनपा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ऑक्टोबर ०९, २०१८

४ नोव्हेंबरला धावणार नागपुरकर

४ नोव्हेंबरला धावणार नागपुरकर

आयुर्वेद अनुसंधान संस्थान आणि मनपाचे आयोजन
 पाच हजारांवर नागरिकांचा राहणार सहभाग
नागपूर/प्रातिनिधी:
केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्ली द्वारा संचालित क्षेत्रिय आयुर्वेदीय मातृ व शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थान आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने तिसऱ्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता कस्तुरचंद पार्क येथून ‘हेल्थ रन’ (आयुर्वेदा दौड स्वास्थ की ओर) चे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील तयारीचा आढावा मंगळवारी (ता. ९) महापौर नंदा जिचकार यांनी घेतला. 
नागपूर महानगरपालिका मुख्यालय सिव्हील लाईन येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, भाजपच्या मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, वैद्यकीय अधिकारी (मे.) डॉ. विजय जोशी, आयोजक डॉ. आर. गोविंद रेड्डी, डॉ. सविता शर्मा, डॉ. राजेश गुरु, डॉ. मितेश रामभिया उपस्थित होते. 
प्रारंभी डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी ‘हेल्थ रन’ आयोजनासंदर्भातील संपूर्ण माहिती दिली. आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली असून ‘सार्वजनिक आरोग्यात आयुष’ (AYUSH in public health) ह्या संकल्पनेवर ही दौड राहील. सुमारे पाच हजारांवर नागरिक यामध्ये सहभागी होतील. संपूर्ण नोंदणी ऑनलाईन असून पाच किलोमीटर आणि आठ किलोमीटर दौडचे यात आयोजन असेल, असेही त्यांनी सांगितले. 

यासंदर्भात बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी नागपूर महानगरपालिकेचा अगदी जवळचा संबंध आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी नागपूर महानगरपालिका सदैव प्रयत्नरत असते. त्याबाबत जनजागृतीही करीत असते. नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारे स्वच्छता अभियान हे लोकसहभागानेच राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आयोजित ‘हेल्थ रन’मध्ये नागपूर महानगरपालिका स्वत: आयोजक म्हणून भूमिका निभावत आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांतील विद्यार्थीही सहभागी होतील. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा आयोजनाच्या यशस्वीतेकरिता कार्यरत असेल. यामध्ये शहरातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्याबाबतचा संदेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
बैठकीला कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, डॉ. मिनाक्षई सिंग, डॉ. देवराव दांडेकर, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. शीतल मालखंडाले, डॉ. उमेश मोवाडे आदी उपस्थित होते.

मंगळवार, ऑक्टोबर ०२, २०१८

नागपूर मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला कार्यालय परिसर

नागपूर मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केला कार्यालय परिसर

गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत उपक्रम : आतील परिसराचीही स्वच्छता
नागपूर/प्रतिनिधी:
 दैनंदिन कामातून उसंत घेत मंगळवारी (ता. २) नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनपाच्या सिव्हील लाईन मुख्यालयाचा परिसर हातात झाडू, फावडे घेऊन स्वच्छ केला. बाह्य परिसरासोबतच इमारतीच्या आतील कार्यालयातही कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करून नवा आदर्श नागपूरकरांसमोर ठेवला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून आज सकाळी ८ वाजता मनपा सिव्हील लाईन मुख्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी कार्यालयात हजर झाले. ‘स्वच्छता ही सेवा’ ह्या राष्ट्रव्यापी उपक्रमाच्या समारोपाच्या निमित्ताने सर्वच कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेतला. विविध विभागाच्या विभागप्रमुखांच्या नेतृत्वात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेचे नेतृत्व सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांनी केले. प्रत्येक विभागाची टीम तयार करण्यात आली. या टीमला सिव्हील लाईन मुख्यालय परिसराचा एक-एक भाग स्वच्छतेकरिता देण्यात आला. मुख्यालयाबाहेरील फुटपाथ स्वच्छतेचीही जबाबदारी एका टीमला देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीसमोरील आणि बाजूचा परिसर, मनपा मुख्यालयाच्या जुन्या इमारतीसमोरील परिसर, आरोग्य विभाग आणि उद्यान विभाग, नागरी सुविधा केंद्र असलेल्या दोन्ही इमारतींचा परिसर, अग्निशमन विभाग इमारतीसमोरील परिसर, पार्किंग, उद्यान आदी ठिकाणी प्रारंभी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या-त्यांच्या विभागात स्वच्छता मोहीम राबविली.
सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या स्वच्छता मोहिमेत कार्यकारी अभियंता सर्वश्री संजय जयस्वाल, राजेश भूतकर, गिरीश वासनिक, अविनाश बाराहाते, अमीन अख्तर, आसाराम बोदिले, अनिलकुमार नागदिवे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. आतिक खान, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, कारखाना विभागाचे योगेश लुंगे, निगम अधीक्षक मदन सुभेदार, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक आयुक्त विजय हुमणे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, दिलीप तांदळे, कामगार नेते राजेश हाथीबेड, डोमाजी भडंग, दिलीप देवगडे, आर.जी. खोत, गौतम गेडाम, शेषपाल हजारे यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.


गांधीजींच्या तैलचित्राला मालार्पण
तत्त्पूर्वी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन केंद्रीय कार्यालयातील महापौर कक्षात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

झोन कार्यालय आणि प्रभागातही स्वच्छता अभियान
महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत दहाही झोन कार्यालयात आणि विविध प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सर्व झोन सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही यामध्ये सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी मनपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सतरंजीपुरा झोनमध्ये उपमहापौर दीपराज पार्डीकर, सभापती यशश्री नंदनवार, नगरसेविका अभिरुची राजगिरे, मनिषा कोठे, शकुंतला पारवे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, झोन सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, मंगळवारी झोनमध्ये सभापती संगीता गिऱ्हे, कर व कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, झोन सहायक आयुक्त हरिश राऊत, आसीनगर झोनमध्ये झोन सभापती वंदना चांदेकर, आमदार डॉ. मिलिंद माने, झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, लकडगंज झोनमध्ये झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेविका कांता रारोकर, जयश्री रारोकर, वैशाली रोहणकर, झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव यांच्यासह आपुलकी वस्ती सुधार संस्था, स्वरांजली वस्ती सुधार संस्था, गजानन बचत गट या स्वयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. 

नेहरूनगर झोनअंतर्गत ताजबाग परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये झोन सभापती रिता मुळे, क्रीडा सभापती नागेश सहारे, नगरसेविका स्नेहल बिहारे, ताजबाग ट्रस्टचे प्रशासक कुबडे, माजी नगरसेवक अमान, झोन सहायक आयुक्त राजेश कराडे सहभागी झाले होते. धंतोली झोनअंतर्गत विविध प्रभागात तीन ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सभापती विशाखा बांते, नगरसेविका हर्षला साबळे, सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्यासह अन्य नगरसेवक मोहिमेत सहभागी झाले होते. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत कामागार कॉलनी येथे सहायक आयुक्त सुवर्णा दखने यांच्या नेतृत्वात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व अधिकारी, कर्मचारी, झोनल अधिकारी, आरोग्य निरीक्षक यामध्ये सहभागी झाले होते. अन्य झोनमध्येही संबंधित झोन सभापती, प्रभागातील नगरसेवक व सहायक आयुक्त सहभागी झाले होते. 

सोमवार, ऑक्टोबर ०१, २०१८

भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठविणार!

भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठविणार!

धोबी समाजच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची मागणी 
नागपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्रात धोबी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा, यावर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या भांडे समितीचा अहवाल लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोबी समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. 
आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्यासह समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश मुख्य संघटक संजय भिलकर व मनीष वानखेड़े यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याना भेटले. सी. पी. एंड बेरार मध्ये मध्यप्रदेश ची राजधानी नागपूर असताना बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यातील धोबी समाज बांधवांना अनुसूचित जातीअंतर्गत आरक्षणाचा लाभ मिळत होता. सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर धोबी समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले. या समाजाला ओबीसीचा दर्जा देण्यात आला. यामुळे समाजाला अनुसूचित जाती अंतर्गत मिळणाऱ्या सवलती मिळणे बंद झाले.१९७६ च्या अनुसूचित जाती दुरुस्ती विधेयकानुसार धोबी समाजासाठी क्षेत्राचे बंधन शिथिल करून महाराष्ट्रात धोबी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा मिळायला हवा होता.यासाठी २७ मार्च २००१ रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. परिणामी ५ सप्टेंबर २००१ रोजी तत्कालीन आमदार डॉ. दशरथ भांडे यांच्या अध्यक्षतेत धोबी समाज पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली. २६ फेब्रुवारी २००२ रोजी समितीने राज्य शासनाकडे अहवाल सुपूर्द केला. शिफारशीसह हा अहवाल राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवायला हवा होता.मात्र त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन समितीचाही अहवाल तयार करण्यात आला, ज्यात धोबी समाजाला अस्पृश्याचे निकष लागू होत नसल्याचे नोंदविले आहे. यासंदर्भात समाज बांधवानी सन २००६ आणि २०१७ मध्ये विधिमंडळावर मोर्चा काढून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही निर्णय झाला नाही. अखेर आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या पुढाकाराने समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व म्हणणे मांडले.समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे, प्रतिभा गवळी यांच्या मार्गदर्शनात शिष्टमंडळात विजय देसाई, प्रमोद चांदुरकर, संजय वाल्हे, अरुण मोतीकर, सुरेश तिड़के यांचा समावेश होता.

शनिवार, सप्टेंबर २९, २०१८

‘सर्जिकल स्ट्राईक’ येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी बाब : महापौर नंदा जिचकार

‘सर्जिकल स्ट्राईक’ येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी बाब : महापौर नंदा जिचकार

अंबाझरी उद्यानात ‘पराक्रम पर्व’ साजरे 
नागपूर/प्रतिनिधी:

 देशातील वाढते आतंकवादी हल्ले, परकीय राष्ट्रांमधून होणारी घुसखोरी या सर्व कारवायांसाठी सर्जिकल स्ट्राईक हे चोख उत्तर ठरले. भारतीय सैन्याच्या या पराक्रमामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावली. सर्जिकल स्ट्राईक ही येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारी बाब आहे, असे गौरवोद्‌गार महापौर नंदा जिचकार यांनी काढले. 
पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्यामार्फत करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शहरातील अंबाझरी उद्यानात ‘पराक्रम पर्व’ साजरा करण्यात आला. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, विजय होले, रवि हलकंदर, गुंडूभाऊ मसुरकर, मनिष गेडाम, विनोद चवरे, संगीता चंद्रायण, कविता देशमुख, रश्मी नसीने, योगिता धार्मिक, अनुसया गुप्ता आदी उपस्थित होते. 

२९ सप्टेंबर २०१६ ला दोन वर्षापूर्वी भारतीय सैन्याने आपल्या देशात घुसखोरी करून देशात आतंकवादी कारवाया करीत देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांचे तोंड बंद केले. सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याने केलेली ही कामगिरी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. सैन्याच्या या पराक्रमामुळे अनेक तरुणांच्या मनात देशरक्षणाची बिजे रोवली गेली. देशाच्या भवितव्याची धुरा असणाऱ्या तरुणाईने आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगावा व आपल्या कार्यामुळे देशाचे नाव लौकीक होईल, असेच कार्य करावे, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. 

देशाच्या सीमेवर शत्रुकडून येणारी गोळी झेलून त्याला प्रत्युत्तर देण्यास तत्पर असणाऱ्या सैन्यामुळे आपण घरामध्ये सुखाने राहू शकतो. भारतीय सैनिक हेच देशातील खरे हिरो आहेत. तिरंग्याच्या सन्मानासाठी प्राण पणाला लावणाऱ्या आपल्या सैन्यांचा प्रत्येकाने आदर राखावा, असेही महापौर नंदा जिचकार यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमाला अंबाझरी परिसरातील नागरिकांसह, उद्यानातील कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

डेंग्यूच्या नावावर पैसे उखळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा

डेंग्यूच्या नावावर पैसे उखळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा

आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांचे निर्देश : सतरंजीपुरा व लकडगंज झोनमध्ये आढावा बैठक 
नागपूर/प्रतिनिधी:
डेंग्यूमुळे नागरिकांच्या मनात भीती असून साधारण तापाच्या उपचारासाठी खासगी दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांना डेंग्यूची भीती दाखवून रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले. 
आरोग्य समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत शुक्रवारी (ता. २८) सतरंजीपुरा व लकडगंज झोन कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांच्यासह सतरंजीपुरा झोनच्या सभापती यशश्री नंदनवार, नगरसेवक संजय महाजन, संजय चावरे, नगरसेविका अभिरुची राजगिरे, शकुंतला पारवे, वंदना चांदेकर, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, लकडगंज झोनमध्ये नगरसेवक प्रदीप पोहाणे, अनिल गेंडरे, नगरसेविका मनिषा धावडे, सरिता कावरे, जयश्री रारोकर, झोनचे आरोग्य अधिकारी डॉ. मोवाडे उपस्थित होते. 
खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या भीतीचा प्रचार केला जात आहे. रुग्णांकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्यासाठीचा हा खासगी रुग्णालयांचा फंडा आहे. साधारण तापासाठी तपासणीकरिता खासगी रुग्णालयात रुग्ण गेल्यास त्याला डेंग्यूचे लक्षण असल्याचे सांगून भरती केले जाते. त्यानंतर महागड्या चाचण्या करून रुग्णांची आर्थिकदृष्ट्या लूट केली जाते. मात्र खासगी रुग्णालयांमधून ज्या प्रकारे भीतीचा प्रचार केला जात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा खासगी रुग्णालयांकडून डेंग्यूबाबत महानगरपालिकेला अहवालही सादर केला जात नाही. या खासगी रुग्णालयांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात यावे व डेंग्यूच्या नावावर नागरिकांची लूबाडणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावे, असे यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले. 

बैठकीमध्ये आरोग्य सभापती मनोज चापले यांनी सतरंजीपुरा व लकडगंज झोनमधील डेंग्यूच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. फवारणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात यावे व फवारणी आधी नगरसेवकांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेवरून ठराविक भागांमध्ये फवारणी करण्यात यावी. डेंग्यूमुळे शहरात निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा घेत काही जण राजकारण करीत आहेत. मात्र या रोगावर मात करण्यासाठी राजकारणापेक्षा जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही सभापती मनोज चापले म्हणाले. 
परिसरात अस्वच्छता, घरी, छपरावरील टायर, ड्रम आदी साधनांमध्ये साचणारे पाणी व परिसरात असणारा कचरा यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास वाढते. हे सर्व आपल्याच निष्काळजीपणामुळे होते. डेंग्यूवर मात करण्यासाठी प्रत्येकाने निष्काळजीपणा सोडून स्वच्छता ही आपली जबाबदारी असल्याचे निश्चित करणे आवश्यक आहे. डेंग्यूबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेउन जनजागृती करणारे पत्रक छापून आपापल्या प्रभागात घरोघरी वितरीत करावे. याशिवाय झोनमधील मनपासह, शासकीय व खासगी अशा सर्व शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत. चिमुकल्या मुलांमार्फत होणारा प्रचार हा प्रभावी ठरत असल्याने शाळांमध्ये जनजागृतीवर भर द्या, असेही सभापती मनोज चापले यांनी यावेळी निर्दशित केले.