Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर ०२, २०१५

५ हजार पोलिसांचा ताफा

हिवाळी अधिवेेशन

नागपूर, - ७ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून पोलिस बोलविण्यात आले असून ५ हजार पोलिस अधिकारी आणि शिपायांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे.
या बंदोबस्तासाठी बाहेरून २ अप्पर पोलिस आयुक्त, १५ पोलिस अधीक्षक, २९ सहायक पोलिस आयुक्त, ७५ पुरुष पोलिस निरीक्षक, १० महिला पोलिस निरीक्षक, ३०० फौजदार, ७० महिला फौजदार, २७०० पुरुष शिपाई आणि ५०० महिला शिपाई येणार आहेत. यांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे १२०० जवान, राज्य राखीव बलाच्या ६ कंपन्या, फोर्स वनची तुकडी राहणार आहे. याशिवाय शहरातील २ ते २५०० अधिकारी आणि शिपायांना तैनात करण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकार्‍यांची वीज मंडळ, केंद्रीय राखीव पोलिस बल, कृषिकुंज येथील विश्रामगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सहायक पोलिस आयुक्तांची अमरावती मार्गावरील निंबूवर्गीय वसतिगृह, सातपुडा, वेणा, ओराई प्रशिक्षण केंद्र येथे व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षकांची राष्ट्रीय अग्निशमन दलाच्या वसतिगृहात व्यवस्था केली आहे. बंदोबस्ताला आलेल्या महिलांना मानकापूर येथील क्रीडा संकुलात थांबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिपायांसाठी २७ मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत. प्रत्येक मंगल कार्यालयात ५० ते ७५ शिपायांना थांबविण्यात येणार आहे. बंदोबस्ताला येणार्‍या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४५० वाहनांची मागणी करण्यात आली असून अजूनपर्यंत वाहने मिळाली नाहीत. परंतु, दोन-तीन दिवसात ही वाहने मिळतील अशी आशा आहे.
पोलिस कर्मचार्‍यांना ४० रुपयात जेवण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही कंत्राटदारांशी बोलणी करून त्यांना जेवणाचे कंत्राट दिले आहेत. बंदोबस्ताला जाणार्‍या आणि बंदोबस्ताहून येणार्‍या कर्मचार्‍यांना हे कंत्राटदार जेवणाचे पाकिटे देणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी आणि शौचालयाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. थंडीचे दिवस असल्याने कर्मचार्‍यांना गादी, उशी, चादरी आणि ब्लँकेट देण्यात येणार आहेत. बंदोबस्ताला येणार्‍या कुणाही कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही शहरातील ५ मोर्चे पॉईंट ठेवण्यात आले आहेत. मोर्चेकर्‍यांनी काही गडबड करू नये यासाठी खाजगी गणवेशात पोलिसांना तैनात करून मोर्चेकर्‍यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय मोर्चास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात येणार आहेत.
मागील वर्षी शेवटच्या दिवसापर्यंत ९९ मोर्चे विधानभवनावर काढण्यात आले होते. आतापर्यंत १८ संघटनांनी मोर्चाची परवानगी मागितली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस आणि आदिवासींचे मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. याशिवाय अपंग, अंगणवाडी, विना अनुदानित शाळा, शिक्षक, मजदूर, झोपडपट्टीधारक, रॉकेल विक्रेते यांचेही मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.