Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर १४, २०२१

खिद्रापूर मंदिरातील "सप्तमातृका" किंवा सातआसरा

 खिद्रापूर मंदिरातील "सप्तमातृका" किंवा सातआसरा

खिद्रापूर मंदिर हे अदभुत शिल्प कलाकृतीचे  आहे.चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याने हे मंदिर बांधले असे दाखले मिळतात.चालुक्य राजांचे दैवत विष्णु,शंकर व सप्तमातृका या होत्या. या सर्व देवानां या मंदिरात स्थान देण्यात आले आहे.पैकी गाभाऱ्यात कोपेश्वर (शंकर)व धोपेश्वर (विष्णु)दिसतात तर सप्तमातृकाचे शिल्प हे गर्भगृहात आहे. 

खिद्रापूर मंदिरातील "सप्तमातृका" किंवा सातआसरा

बोलीभाषेत यांना "सातआसरा" म्हटले जाते.या अप्सरा नेहमी सातच्या संख्येने वावरतात म्हणून त्यांना सातआसरा किंवा सप्तमातृका म्हणतात. यांची वस्ती प्रामुख्याने जलाशयाच्या ठिकाणी असते.(खिद्रापूर मध्ये जवळच कृष्णा नदी आहे)त्यांना देवतेच्या मैत्रिणी असेही संबोधिले जाते.दक्षिण भारतात यांना काही ठिकाणी ग्रामदेवतचे स्थान देण्यात आले आहे.या कुमारिका असून त्याना "जलयोगिनी" असेही म्हटले आहे. 

स्त्रीचा जन्म अपत्य संभवासाठीच आहे,ही प्राकृतिक धारणा आहे. त्यामुळे जीवनाच्या समाजाच्या सर्व स्तरात स्त्रीची गर्भावस्था निरामय असावी,अपत्यजन्म निवेर्ध व्हावा आणि पुढे अपत्याचे जीवनही निरोगी रहावे हा हेतू असतो.त्यासाठी स्त्रीदेवतासंबंध सर्व व्रत-वैकल्यांचा, उपासनांचा, समजुतींचा नंतर दंतकथेचा विस्तार झालेला आढळतो.
 

सातआसरा ह्या क्षेत्रपाल शक्ती आहेत,किंवा स्थान देवता आहेत, ह्या अतिशय शक्तिशाली देवता आहेत,म्हणुन ह्यांची उपासना पध्दती असाव्यात.जगातील सर्वच संस्कृतींमध्ये शक्तीपूजा प्रकर्षांने दिसते. तिचे स्वरूप फक्त वेगवेगळे आहे. त्यांची नावे वेगवेगळी असतील, परंतु शक्ती,सामर्थ्य यांचे पूजन सर्वत्र लोकप्रिय असेच आहे. पुरातन काळापासून स्त्रीदेवतांची पूजाही सातत्य आणि वंशवृद्धी तसेच सामर्थ्यवृद्धी याकरिता आवर्जून केली जायची. 

प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता देवीरूपात असतेच असते. त्यांचे कुळधर्म, कुळाचार हे या देवतेशीच निगडित असतात.भारतात लक्ष्मी, दुर्गा, गौरी, पार्वती या रूपात या देवी पुजल्या जातात.तशीच ही "सप्तमातृका" चालुक्य राजांची कुलदेवता असावी. म्हणुन त्यांनी मंदिरात स्थान दिले आहे.  

पौराणिक कथेनुसार राजा दक्ष याने आपल्या यज्ञात आपलाच जावई शंकराला बोलावले नाही. शंकराच्या पत्नीला म्हणजेच सतीला हा अपमान सहन न झाल्यामुळे तिने त्या यज्ञातच उडी घेतली. परंतु तिचे शरीर जळाले नाही. उद्विग्न झालेल्या शंकराने ते शरीर पाठीवर टाकले आणि तो मार्गक्रमण करू लागला. त्या शरीराचे वेगवेगळे अवयव पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडत गेले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. त्या कथेनुसार तिचे शीर जिथे पडले ते स्थान आता पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात आहे. कराची पासुन २५० किमीवर मकरान टेकडय़ांच्या प्रदेशात हिंगोळ नदीच्या काठावर एका गुहेमध्ये नानीबीबी किंवा हिंगुळजादेवी हे हिंदूंचे पवित्र क्षेत्र वसलेले आहे. नंतर हिच हिंगलाजदेवी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या ठिकाणी आहे.तिला "गुड्डाई" म्हणतात

हा इतिहास सांगायचे कारण म्हणजे, दक्ष राजाचे गाव व सतीने जिथे अग्निकुंडात उडी घेतली ते स्थान खिद्रापूरच्या कृष्णा नदीपलीकडील "येडुर" हे गाव होय. 

“शुंभ व निशुंभ ह्यांचा वध झाल्यानंतर शुंभाचा पुत्र दुर्गम मात्र त्यातून वाचला. त्याला कावळ्याचं रूप दिलं गेलं म्हणून तो वाचला असे नाही, तर त्याला पाहून ह्या सात सेनापतींचे मातृभाव जागृत झाले व म्हणून त्यांनी मातृत्वाच्या भावनेने शत्रूच्या बालकालाही जीवदान दिले. ह्या त्यांच्या कृत्याने प्रसन्न झालेल्या महासरस्वतीने त्यांना आशीर्वाद दिला की, ’जो मानव त्याच्या घरी बाळ जन्माला आल्यानंतर त्यांचे (म्हणजे त्या सात मातृकांचे) पूजन करेल, त्या बाळांच्या तुम्ही रक्षणकर्त्या बनाल.’ म्हणून घराघरात बाळ जन्माला आल्यानंतर ह्या सप्तमातृकांचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली.”

वेरुळच्या लेणींमधून या सप्तमातृकांची शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच खिद्रापूर मंदिरामध्ये एक सप्तमातृका पट पाहायला मिळतो. एका ओळीमध्ये बसलेल्या या मातृका आणि त्यांच्या पायाशी असलेली त्याची वाहने असे हे शिल्प आहे.डावीकडे वीरभद्रशिव मध्ये सप्तमातृका आणि शेवटी उजवीकडे गणेश दिसतात.वाहनावरून त्या मातृकांची ओळख पटते.

देवीमाहात्म्यानुसार मातृकांची संख्या आठ सांगितली असली तरी प्रत्यक्ष शिल्पांकनामध्ये यांची संख्या सातच दाखवली आहे. त्यामुळे त्यांचे सप्तमातृका असेच नाव प्रचलित आहे. आठ मातृकांची नावे पुढीलप्रमाणे –

१) माहेश्वरी – जी पंचमुखी आहे आणि वृषभावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात त्रिशूळ आहे.

२) वैष्णवी – जी गरुडावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात चक्र, गदा आणि पद्म आहे.

३) ब्रह्माणी – जी चार मुख असलेली आहे आणि हंसावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात कमंडलू व अक्षमाला आहे.

४) ऐन्द्री – जी इंद्राची शक्ती आहे आणि ऐरावतावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात वज्र आहे.

५) कौमारी – जी सहा मुख असलेली आहे आणि मोरावर आरूढ झालेली आहे.

६) नारसिंही – जिचे मुख सिंहीणीचे आहे. तिच्या हातात गदा व खडग् आहे.

७) वाराही – जिचे मुख वराहाचे आहे व जी पांढऱ्या रंगाच्या रेड्यावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातात चक्र, खडग्, तलवार व ढाल आहे.”काही ठिकाणी विनायकी व शिवदुती यांचा सामावेश आहे. 

खिद्रापूर मंदिर अभ्यास दौरयात प्रा.डॉ.माशाळकर सर व शंशाक चोथे सरानी आम्हा सर्वांना या सप्तमातृका व त्यांची वाहने यांची माहिती दिली. याचप्रमाणे खिद्रापूर  मंदिरांवर दिसणारी आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत पूरक असलेली अजून एक गोष्ट म्हणजे शिलालेख.मंदिर परिसरात १२ शिलालेख आहेत. ते मंदिर कोणी बांधले,कोणी देणगी दिली, जिर्णोद्धार केला या बाबी सरांनी आम्हा सर्वांना सांगितल्या.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.