शिकारीच्या संशयावरून सात ग्रामस्थांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी २४ आणि २५ नोव्हेंबरला करंट लावून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथील वनपरिक्षेत्रातील पायली चिंचोली गावात घडली.बुधवारी शिकारीचा संशय आल्याने ८ ते ९ वन कर्मचारी थेट चिंचोली गावात पोहचले आणि संशयितांना ताब्यात घेत बेदम मारहाण केली. ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी मारहाणीसोबतच विजेचे शॉक दिल्याचा आरोप पीडित ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणानंतर संतप्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलिसात तक्रार दाखल केली,यावर कारवाई करत दोन वन कर्मचाऱ्यांवर ३२४,३२४,३४८, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काय घडले त्या दिवशी
गावात एका चितळाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. चौकशीसाठी वनविभागाने गावातील ईश्वर रामटेके, हनुमान आसूटकर, संदीप आसूटकर या तिघांना ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे चौकशीकरिता घेऊन गेले.तिघांना प्लास्टिकच्या दांड्याने बेदम मारहाण केली. चार्जिंग बॅटरीद्वारे हातापायाला शॉक दिला तर आकाश चांदेकर या ग्रामस्थाच्या गुप्तांगावर चार्जिंग मशीन ठेवली असाही आरोप केला गेलाय.हनुमान आसूटकरला चंद्रपूर येथील रामबाग नर्सरीत नेऊन बेदम मारहाण केली. तसेच संध्याकाळी संदीप व ईश्वर यांना तळपायाला करंट लावून दुखापत करण्यात आली. एवढ्यावरच चूप न बसता एक अधिकारी दोन्ही पाय त्याच्या मांडीवर ठेवून उभा राहिला. रात्री आठ वाजता त्यांना सोडून देण्यात आले.
त्यानंतर गुरुवारी पुन्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत त्यांना बोलावण्यात आले. आकाश चांदेकर, संदीप नेहारे, मंगेश आसूटकर, राकेश साव यांना बेदम मारहाण करून हातापायाला करंट लावण्यात आला. माणुसकीला काळिमा फासणारे वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी 'पीडितांसह गावकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे व दुर्गापूर पोलिसांना गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे.
याप्रकरणी भिमनवार व यादव या दोन वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु असून पुरावा नसतांना ग्रामस्थांना अशा प्रकारे बेदम मारहाण करून करंट लावल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.