नागपूर, दिनांक २६ जून २०२१- वापरलेल्या वीजेच्या देयकापोटी आलेल्या रकमेचा भरणा न करता महावितरण कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन वीज ग्राहकांच्या विरोधात वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दि.२६ जून रोजी खरबी वितरण केंद्र येथील सहायक अभियंता हरीश मुंगसे आपले सहकारी तंत्रज्ञ असिफ शेख, तंत्रज्ञ श्रीमती खोडे, उच्चस्तर लिपीक श्रीमती काकडे यांचे सोबत बाबा ताज नगर, शारदा सोसायटी परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकाकडून वीज बिल वसुली करत होते. थकबाकीदार वीज ग्राहक ग्राहक शब्बीर शेख व शहजाद अली यांचे कडे गेले असता दोन्ही वीज ग्राहकांनी यांनी मागील १८ महिन्या पासून बिल भरले नव्हते. या थकबाकीदार वीज ग्राहकाकडे अनुक्रमे २७,००० आणि ३१,००० रूपयांची थकबाकी होती.महावितरण कडून थकबाकी भरण्याची विनंती केली असता थकबाकीदार ग्राहकांनी सहकार्य करण्यास नकार दिला. अखेर नाईलाजाने महावितरणच्या जनमित्रांनी थकबाकीदार वीज ग्राहक शब्बीर शेख व शहजाद अली
दोघांचा वीज पुरावाठा कापला.थकबाकी साठी वीज पुरवठा खंडित केला म्हणून दोघांनी परिसरातील लोकांना जमा करून महावितरणच्या पथकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून व मारण्याची धमकी दिली.महावितरणच्या लिपीक श्रीमती खोडे यांचा मोबाईल हिसकला. सदर बाबत तातडीने पोलीस यांना सूचना देण्यात आली, त्यांनी आरोपीना उचलून वाठोडा पोलीस स्टेशन मधे आणले. दोन्ही आरोपी वर कलम ५०४,५०६, प्रतिबंधक कायदा कलम १०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल करतेवेळी महावितरणच्या काँग्रेस नगर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, उपकार्यकारी अभियंते संजय मते उपस्थित होते.या प्रकरणी वाठोडा पोलीस अधिक तपास करीत आहे.