Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १८, २०१९

परिवहन विभागाचे प्रस्तावित अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सुपूर्द


नागपूर, ता. १८ : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचे वार्षिक प्रस्तावित अंदाजपत्रक मंगळवारी (ता.१८) स्थायी समितीकडे मंजुरीकरिता सुपूर्द करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये मंगळवारी (ता.१८) स्थायी समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्याकडे प्रस्तावित अंदाजपत्रक सादर केला.

यावेळी स्थायी समिती सदस्या वर्षा ठाकरे, श्रद्धा पाठक, वैशाली रोहणकर, गार्गी चोपरा, निरंजना पाटील, वंदना भगत, सदस्य संजय बुर्रेवार, दिनेश यादव, विजय चुटेले, लखन येरावार, परिवहन समिती सदस्या अर्चना पाठक, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, निगम सचिव हरीश दुबे यांच्यासहविविध विभागांचे अधिकारी, सर्व झोनचे सहायक आयुक्त व परिवहन विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


परिवहन समितीचे प्रस्तावित अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करताना परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे म्हणाले, २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प ‘ब’चे उत्पन्न २७७.८४ कोटी रुपये एवढे अपेक्षित असून सुरूवातीची शिल्लक रक्कम ७२ लक्ष अपेक्षित धरून एकूण उत्पन्न २७८.५६ कोटी हे अपेक्षित उत्पन्न गृहीत धरता या आर्थिक वर्षात २७८.४१ कोटी खर्च होईल. त्यामुळे मार्च २०२० अखेरची अपेक्षित शिल्लक १५.२५ लक्ष एवढी राहिल.


शहरातील नागरिकांना आदर्श व सक्षम बस सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजित धोरणानुसार यंदा २३६ बस, १५० मिडी व ४५ मिनी बस अशा डिझेलवर संचालित एकूण ४३१ बसेस कार्यान्वित करण्यात येणार असून लवकरच ४५ नवीन मिनी बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या मिनी बसेससाठी अर्थसंकल्पात ५.६० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दिव्यांग प्रवाशांना शहरबस मध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली असून आता दिव्यांगांचा आपली बसमधून प्रवास मोफत राहणार आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तेजस्विनी योजनेंतर्गत महिलांसाठी इलेक्ट्रीकवर संचालित पाच मिडी बसेस संचालित करण्याचा मनपाचा मानस आहे. या इलेक्ट्रीक बस प्रकल्पांतर्गत चार्जिंग स्टेशन निर्माण करुन सौर उर्जेद्वारे विद्युत निर्मिती करण्यात येणार आहे व त्याद्वारे वीज निर्मितीचा वापर इलेक्ट्रीक बस चार्ज करण्याकरीता करण्यात येईल. सौर उर्जेद्वारे विद्युत निर्मितीसाठी अर्थसंकल्पात तीन कोटीची तरतूद करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यावरणपूरक, प्रदुषणमुक्त हरीत प्रवासाकडे वाटचालीच्या धोरणाला सहकार्य दर्शवित मनपाच्या सेवेतील महापौरांपासून ते सर्व पदाधिकारी व अधिका-यांना प्राप्त वाहने सी.एन.जी.मध्ये परिवर्तीत करण्याचा मानसही परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे मनपाच्या सेवेतील जुन्या डिझेल बसेसचे सी.एन.जी.मध्ये बसेसचे लोकार्पणही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याशिवाय यंदाच्या अंदाजपत्रकात शहराकरीता जादा बसडेपो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २०१९-२०मध्ये वाठोडा येथे मनपाच्या १०.८० एकर जागेवर डिझेल बस ऑपरेटर करीता जागा विकसीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोराडी मंदिर देवस्थानाजवळ २० हजार वर्ग मीटर जागेमध्ये नागपूर सुधार प्रन्यास/एन.एम.आर.डी.ए. यांच्यातर्फे नवीन बसडेपो विकसीत करण्यात येणार आहे, असेही परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी सांगितले.



‘चलो ॲप’मुळे होणार स्मार्ट प्रवास
शहरात सेवा देणा-या शहर बसेस, त्यांचे वेळापत्रक, प्रत्येक बसची मार्गनिहाय, थांब्यानुसार, वेळेनुसार विशिष्ट माहिती, प्रत्येक थांब्याला लागणारे भाडे याची सविस्तर माहिती प्रवाशांना मिळावी यासाठी आधुनिक जी.पी.एस. ट्रॅकवर आधारित नि:शुल्क ‘चलो ॲप’ लवकरच नागपुरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. याच ॲपवरून मोबाईलवर ई-तिकीट सेवा सुरु करण्याचाही मनपाचा मानस आहे. एकूणच आपली बसचा प्रवास आता स्मार्ट होणार आहे. याशिवाय शहरातील नागरिकांना माफक दरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहर बस थांब्याजवळ वॉटर एटीएम ची उभारणी करण्याचाही मनपाचा मानस आहे. नंदनवन येथील के.डी.के. महाविद्यालयाजवळ अशा वॉटर एटीएमची उभारणी करण्यात आली आहे. असेच एटीएम शहरात गर्दीच्या व आवश्यक ठिकाणी उभारणीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे.



’कॉमन मोबिलिटी कार्ड’ने होणार शहर बस आणि मेट्रोचा प्रवास ‘कॉमन’
शहरात मेट्रो रेल्वेचे संचालन लवकरच विस्तृत प्रमाणात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना शहर बस आणि मेट्रो असे दोन्ही वाहतुकीचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. दोन्ही माध्यमाद्वारे प्रवास करणा-या नागरिकांसाठी ‘कॉमन मोबिलीटी कार्ड’ या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या कार्डमुळे शहरातील प्रवाशांचा शहर बस आणि मेट्रोचा प्रवास सुकर होईल.

स्वच्छ भारत योजनेंतर्गत प्रायोगिक तत्वावर शहरातील प्रमुख बस थांब्यालगत वापरात नसलेल्या भंगार बसेसच्या माध्यमातून ई-टॉयलेटची निर्मिती करण्यात येणार आहे. याद्वारे महिला व पुरूषांसाठी वेगवेगळे ‘बायोबस टॉयलेट’ तयार करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


नवीन बसस्थानकापासून मिळणार सुमारे ५० लाख उत्पन्न
बी.ओ.टी. म्हणजे बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर मे. साईन इंडिया पोस्ट इंडिया प्रा.लि. कंपनीमार्फत शहरात बस स्थानक उभारण्यात येत आहेत. उभारण्यात आलेल्या शहर बस थांब्याच्या देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीची असून याव्यतिरिक्त त्यांच्याकडून मपपाला २५ लक्ष वार्षिक रॉयल्टी देण्यात येत आहे. शहरात विविध ठिकाणी बस स्थानक बदलविणे, नवीन डिझाईनचे बस स्थानक लावण्याचे काम देखील सुरू आहे. आतापर्यंत १०० नवीन बस स्थानकची निर्मिती करण्यात आली असून उर्वरित कार्य सुरू आहे. सदर काम पुढील वर्षात पूर्ण होणार असून २०२१-२२ पासून रॉयल्टीच्या माध्यमातून ५० लाखापेक्षा जास्त उत्पन्न मनपाला मिळणार आहे.



शहिद कुटुंबातील महिलांसाठी सन्मानाची ‘ मी जिजाऊ’ योजना
शहरातील शहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘मी जिजाऊ’ ही सन्मानजनक योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शहरातील शहिद जवानांच्या कुटुंबियांना कार्ड प्रदान करण्यात येणार आहे. या कार्डवर शहिद कुटुंबातील पत्नी, आई, बहिण यापैकी कुणाही एकाला मोफत प्रवास सेवा दिली जाणार आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.