महा विकास आघाडीतील घटक पक्षांचे धरणे आंदोलन
संजीव बडोले/प्रतिनिधी
नवेगावबांध दि.8 डिसेंबर:-
मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन शेतीविषयक विधेयके पारित केले. याला विरोध करण्यासाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्या कायद्यांना विरोध करण्यासाठी, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, आजच्या देशव्यापी भारत बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी येथील टी पॉईंट चौक व आझाद चौकात अर्जुनी मोरगाव तालुका किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. देवाजी कापगते यांच्या नेतृत्वात नवेगावबांध बंद व धरणे आंदोलन करण्यात आले. आज बंद दरम्यान गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. नवेगावबांध येथे हे बंद शंभर टक्के यशस्वी झाले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे जगदीश मोहबंशी, अमृतलाल टांक, ऋषी पुस्तोडे, संतोष नरुले गुरुजी, नरेश जयस्वाल, जगदीश पवार, मोटा भाई पटेल, वसीम शेख, विशाखाताई साखरे, कमल जयस्वाल, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शैलेश जयस्वाल, मुकेश चाफेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर तरोने, किशोर झुररमुरे, बंटी गुप्ता, कुंडल खंडाईत, माधव डोंगरवार कमलेश शाहू राजेश शाहू, सुरेश मोहतुरे, दौलत वालदे व महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत बंद च्या दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखली जावी. कुठेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या नेतृत्वातील पोलीस ताफा परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. बंद दरम्यान गावात सर्वत्र शांतता व सुव्यवस्था होती. धरणे आंदोलन शांततेत पार पडले.