संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१९ फेब्रुवारी:-
शिवराज्यात लोकांना राज्य आपले वाटायचे, आपले राज्य हे रयतेचे राज्य आहे. असे शिवाजी राजे मानत होते. म्हणून रयत राजाची काळजी घ्यायचे, आणि शिवाजी महाराज आपल्या लेकरा प्रमाणे रयतेची काळजी वहायचे. आदर्श राजा कसा असावा? हे पाकिस्तानातील शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाते. शिवाजीराजे चारित्र्यसंपन्न होते.याची ग्वाही प्रत्यक्षात त्यांचे शत्रू औरंगजेब व शाहिस्तेखान यांनी दिली आहे. आजच्या काळात शिवचरित्र आत्मसात करण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात व आचरणात ठेवण्याची गरज आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध समाजसेविका डॉ.सविता बेदरकर यांनी केले आहे.
त्या मराठी बाणा मित्रपरिवार नवेगाव बांध च्या वतीने आज दिनांक १९ फेब्रुवारी रोज शनिवार ला सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित ३९२ व्या शिवजन्मोत्सव उत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अ. का. कापगते हे होते. तर अतिथी म्हणून ग्रामपंचायत सरपंच अनिरुद्ध शहारे,उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे, विजयाताई कापगते, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल, उद्योगपती नितीन पुगलिया, सुनील तरोने,कमल जायस्वाल,माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, शारदा नाकाडे, शितल राऊत, सामाजिक कार्यकर्ते नवल चांडक, एकनाथ बोरकर, महादेव बोरकर, अण्णा डोंगरवार, खुशाल काशिवार, हेमचंद लाडे, परेश उजवणे,रूपलता कापगते यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कापगते व उपस्थित अतिथींनी त्यांना अभिवादन केले.शिव ध्वजारोहण डॉ.कापगते यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.
शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून मराठी बाणा मित्र परिवाराच्या वतीने जिल्ह्यातील सुप्रसिद्ध समाजसेविका डॉ.सविता बेदरकर यांचे जिल्ह्यातील अनाथ बालकांसाठी अनाथालयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे व मराठा बाणा मित्र परिवाराच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. कोरोना काळात स्वतः च्या आरोग्ची पर्वा न करता रुग्णांनाची अहोरात्र सेवा करणारे येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र टंडन यांचा, त्याचप्रमाणे कोरोना काळात पायी प्रवास करणाऱ्या उपाशी प्रवाशांना आपल्या आरोग्याची काळजी बाजूला ठेवून, अन्न खाऊ घालणाऱ्या माधव चचाने यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच गावात प्रत्येकाच्या कामाला धावून जाणारा राजकुमार कुंभरे यांचाही सत्कार या वेळी करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गाहणे व पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे यांचाही सत्कार यावेळी अतिथींच्या हस्ते करण्यात आला.
प्रा. शिवरकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. कापगते यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाला स्थानिक महिला, पुरुष ,आबालवृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन हरिश्चंद्र लाडे गुरुजी यांनी केले. शिवजन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी मराठी बाणा मित्र परिवाराचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.