Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १९, २०२२

किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा @chhatrapatiShivaji Maharaj




शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी गड-किल्ल्यांचा विकास*
*–उपमुख्यमंत्री अजित पवार

जुन्नर /आनंद कांबळे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.




किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करणारे युगपुरुष होते. त्यांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन केलं. महाराजांसारख्या युगापुरुषाने महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. ४०० वर्षानंतरही शिवाजी महाराजांविषयी नव्या पिढीच्या मनात आदर आणि अभिमान कायम आहे. महाराजांच्या नावाने प्रत्येक पिढीला शौर्याची आणि जनकल्याणाची प्रेरणा दिली आहे.

छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाची भूमिका असून यासाठी पुरातत्व, पर्यावरण, वन विभाग आदी विभागांच्या माध्यमातून जुन्या बांधकाम रचनेला धक्का न लावता या वारसास्थळांचे जतन करण्यात येईल. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवनेरी किल्ले संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून किल्ल्याच्या परिसरात विकास कामे सुरू आहेत. किल्ले रायगड संवर्धनासाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिला असून अनेक विकासकामे तेथे सुरू आहेत.


शिवजयंती ही मराठी माणसांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे किल्ल्यावर काही बंधनात जयंती साजरी करावी लागली. कोरोनाचे सावट कमी झाल्यावर सर्व निर्बंध खुले करण्याबाबत विचार केला जाईल.

शिवाजी महाराजांनी जुन्नर येथील हापूस आंबा जपला. या आंब्याचे जतन करण्याचे काम सुमारे साडेतीनशे वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी केले. त्याला भौगोलिक मानांकन (जी.आय.) मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेल्या २७ लाख रुपयांच्या निधीतून प्रयत्न केले जातील.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही कायमच राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र घटनात्मक तरतुदीमुळे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेता येणार नाही ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी प्रधानमंत्री महोदयांचीही भेट घेऊन कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत विनंती केली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्माच्या, पंथाच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं, त्यांचा तो वारसा सर्वांना सोबत घेवून पुढे जायचं आहे. कोणतेही राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे.

प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी उपमुख्यमंत्र्यांनी वाहीली.

भारतीय डाक विभागाने केलेल्या 'जुन्नर रत्न' या पोस्टकार्ड संचाचे प्रकाशनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. १५ सचित्र पोस्ट कार्डाच्या या संचात येथील किल्ले, जैवविविधता, पर्यटन स्थळे, मंदिरे आदींचा समावेश आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांची संकल्पना यामागे होती.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार स्व. अनिल अवचट यांना जाहीर झाला होता तो त्यांची कन्या मुक्ता पुणतांबेकर यांनी स्वीकारला. तसेच शिवनेर भूषण पुरस्कार प्रा. विनायक खोत यांना प्रदान करण्यात आला.




कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, माजी जि.प. अध्यक्ष देवराम लांडे, मराठा सेवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डुबे, यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.