Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ११, २०२१

शाहू महाराजांची घसरगुंडी...???

शाहू महाराजांची घसरगुंडी...??? 




 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 

दि. ११ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3uGYCoN
राजर्षी शाहू महाराज...खरच खूपच उदारमतवादी, लोभस, भारदस्त, सुधारणावादी, खऱ्या अर्थाने जाणता राजा...कारण त्यांना प्रजेबद्दल जाण होती..आपल्या प्रजेचे हित कशात आहे हे त्यांनी चांगलेच हेरले होते..त्या मूळे त्या काळातच त्यांनी अनेक सुधारणावादी बाबींचा पाया रचला, शिक्षणाचा आग्रह धरला, अस्पृश्यतेचा तिटकारा केला...अश्या अनेक गोष्टी आहेत लिहिणाऱ्याची लेखणी संपेल, पण त्यांचे कार्य काय संपणार नाही...असा लोकप्रिय राजा..जीवापाड प्रेम बसावे असा नितीमत्त, वडील धारी,प्रेरणादायक,आपलासा वाटणारा शाहू राजा...छत्रपती शिवरायांचा, शहाजी राज्यांचा, आई जिजाऊचां, शंभू राज्यांचा खरा वारसा पुढे चालू ठेवणारे असे अत्यंत आदरणीय राजर्षी शाहू महाराज...शाहू महाराजांच्या आयुष्यात बऱ्याच घटना ह्या आजच्या काळानुरूप विवादास्पद अश्या स्वरूपाच्या घडल्यात..त्यात मग...वेदोक्त प्रकरण असेल..टिळकांशी झालेली वैचारिक लढत असेल..कुलकर्णी वतनाच्या खालसेच्या वेळी झालेली टीका असेल..तर त्यांच्या वयक्तिक आयुष्यात घडलेल्या काही घटना असतील..बऱ्याच गोष्टी आहेत..बऱ्याच बाबतीत शाहू महाराजां बद्दल समाजात अपसमज पसरले अथवा पसरवले गेलेत..
शाहू महाराजांची घसरगुंडी...???
सर्वात मोठा क्लेश दायक असा घाव म्हणजे छत्रपती राजर्षी शाहूंच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे..शिंतोडे नाही तर अख्खे शाहूंचे चारित्र्यच काही मंडळींनी चिखलात बरबटून काढण्याचा प्रयत्न केलाय.....  
निष्कलंकित असतांना शाहू महाराजां वर असे विनोद कशापायी ???मूळ मुद्दा मराठ्यांच्या महापुरूषां बद्दलच असे विनोद का रचले जातात आणि ते अगदी चवीने का चर्चिले जातात ??? शंभू राज्यां बद्दलही तेच..शिवरायां बद्दलही तेच..मा जिजाऊन बद्दलही तेच...शहाजी राज्यांबद्दलही तेच..असे का??? असा काय गुन्हा केला होता मराठ्यांच्या ह्या महापुरुषांनी ???       
शाहू महाराजां बद्दल आज ठिकठिकाणी "शाहू महाराजांची घसरगुंडी" ह्या शब्द प्रयोगाने काही विकृत कंबरे खालचे विनोद सगळी कडे कुजबुजले जातात...त्या त्या प्रदेशानुसार, व्यक्ती नुसार त्या विकृत विनोदाचे स्वरूप वेगवेगळे आहेत..पण एकूण सगळ्यात शाहू महाराजांची बदनामीच....शाहूंचे जातीय वंशज - म्हणजे मराठा मूले देखील हे विनोद चवीने चघळत असतात...काय हे दुर्दैव..त्या राज्याचे...त्यांचे म्हटल्या पेक्षा त्यांचे वंशज म्हणवून घेणाऱ्या सर्वच मराठा, बहुजन लोकांचे..आपल्याच आई बापाची इज्जत स्वतःच्याच हाताने वेशीवर टांगल्या सारखे आहे हे सगळे... १) १९०१ च्या सुमारास, जेव्हा वेदोक्त प्रकरणाचा भडका उडाला असतांना कोल्हापुरातील "जिरगे" नावाच्या एका सधन कुटुंबातील रूपवान मुलीची आपल्या राजवाड्यात 'अब्रू लुटल्या' चा आरोप केला गेला.ह्या प्रकरणाचा महाराजांच्या हितशत्रूंनी इतका गवगवा केला की , त्या मुलीच्या पित्यास आत्महत्या करावी लागली. त्या मूळे तर हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनून त्याचा नेमका फायदा उठवला गेला. त्या संबंधी शत्रूंकडून अतिरंजित कथा हेतुपुरस्कर पसरवल्या गेल्या. महाराजांचे चरित्र हनन करण्याचे एक जहरी हत्यारच त्यांच्या हाती आले. आरोप इतका गंभीर होता कि, शेवटी इंग्रज सरकारला ह्या प्रकरणाची चौकशी करावी लागली आणि या चौकशीत सरकारला हा , आरोप निराधार असल्याचे आढळून आले '
हे प्रकरण जेव्हा घडले असे सांगण्यात आले तेव्हा महाराज हे राजवाड्या वर न्हवतेच, ते कोल्हापूरच्या बाहेर असणाऱ्या सोनतळी (राजपुतवाडी ) कॅम्पवर होते. पण शत्रूंना त्याचे सोयरे-सूतक न्हवते. महाराजांचे राजवाड्यातील वास्तव्य गृहीत धरूनच त्यांनी त्या कथेचे षडयंत्र रचले होते - 📖(संदर्भ १) राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - संपादक जयसिंग राव पवार. पान क्रमांक २४२ , मूळ संदर्भ - 
२) राजर्षी शाहू: राजा व माणूस - कृ.गो.सूर्यवंशी, पहिली आवृत्ती, पुणे, १९८४.,पृ.३५९-३६० ; 
३)📖 शाहू छत्रपती आणि लोकमान्य - य.दि.फडके, पुणे १९८२, पृ.१४९; 
४)📖 Shahu Chhatrapati; A Royal Revolutionary - Dhananjay Keer, Bombay, 1976.page.162.
२) यानंतर शाहू महाराजांच्या शत्रूंनी त्यांच्या वर १९०६ मध्ये दुसरा हल्ला केला. वेदोक्त प्रकरणात कोल्हापूरच्या ब्रह्मवृन्दांची झालेली अवमानास्पद हार, ब्राह्मण दहशदवाद्यांनी सुरु केलेल्या दहशदवादी कारवाया व त्या निपटून काढण्या साठी महाराजांनी अमलात आणलेली कठोर उपाय योजना अशी संमिश्र सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी या हल्ल्याच्या मागे होती. १९०६ च्या मध्ये वर महाराजांच्या कोल्हापुरातील शत्रूंनी 'शाहू महाराजांनी तीन स्त्रियांना जबरीने भ्रष्ट केले आहे ' अशा आरोपाच्या चौकशीची मागणी करणारी पत्रे मुंबई सरकार कडे पाठविली. त्यापैकी काही निनावी होती तर काही बनावट नावा खाली पाठविली होती. तसेच एक अर्जवजा पत्र कोल्हापुरातील ब्राह्मण-स्त्रियांच्या नावांनी कलकत्त्यास व्हाईसरायची पत्नी लेडी मिंटो यांना धाडले गेले होते.

हा सगळा उद्योग म्हणजे हिंदुस्थानातील एक संस्थानिक आपल्या संस्थानातील स्त्रियांची अब्रू धोक्यात आणत असून आता सार्वभौम सरकारनेच कठोर पावले उचलून (म्हणजे शाहू महाराजास पदच्युत करून) त्याचा बंदोबस्त करावा, म्हणून लेडी मिंटो यांची स्त्रीसुलभ सहानभूती मिळवण्याचा कुटील डाव होता, हे उघड होते. मुंबई सरकारच न्हवे तर व्हाईसरायच्या दरबार पर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने इंग्रज सरकारने त्याची दाखल घेऊन चौकशीची चक्रे सुरु केली. कोल्हापुरातील इंग्रज राजनैतिक प्रतिनिधी कर्नल फेरीस यांना चौकशीचे आदेश दिले गेले, कर्नल फेरीस यांनी शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांचा या आरोपावर खुलासा मागितला. या भेटी नंतर महाराजांनी त्यांना आपला लेखी खुलासा करणारे पत्र पाठविले.
शाहू महाराजांची सत्यावर श्रद्धा होती; म्हणून तीन स्त्रियांना भ्रष्ट केलेल्या आरोपाच्या जाहीर चौकशीस सामोरे जाण्याचे नैतिक धैर्य त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाले होते. महाराजां विरुद्ध आरोप करणारी पत्रे निनावी असल्याने जाहीर चौकशी करण्याचे इंग्रज सरकारलाही धारिष्ट्य झाले नाही. पण कोल्हापुरातील त्यांच्या राजनैतिक प्रतिनिधीस मात्र गुप्त चौकशी करून वर अहवाल पाठविण्यास सांगितले गेले.त्या प्रमाणे चौकशी झाली..व त्या चौकशी नंतर महाराजांचे चारित्र्य स्वच्छ असल्याचा व ते कधीच गैरव्यभिचारी जीवन न जगल्याचा अभिप्राय देणारा अहवाल प्रथम मुंबई सरकारकडे, तेथून व्हाईसराय कडे व त्यांच्या कडून इंग्लंड मधील भारतमंत्र्याकडे पाठविला गेला. सर्व भौम सरकारने तो ग्राह्य मानून पुढची चौकशी केली नाही.
३) दरम्यानच्या काळात टिळकांच्या पुढाकाराने कोल्हापुरात लोकप्रतिनिधी सभा अस्तित्वात आलेली होती. या सभेत बहुसंख्य ब्राह्मण असून प्रो. विजापूरकर, राशिंगकर, अळतेकर, अभ्यंकर, गोखले अशी मंडळी नेतेपदी होती. ऑक्टोबर १९०६ मध्ये या सभेची पहिली व शेवटची बैठक झाली. या बैठकीत एका नेत्याने उद्गार काढले कि, "कोल्हापुरातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला आपल्या वित्ताचे, जीविताचे किंवा नैसर्गिक हक्कांचे कसे संरक्षण होईल याची रात्र-दिवस काळजी पडली आहे " (📖संदर्भ - राजर्षी शाहू समरक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.१७६ .) अशाच स्वरूपाचा प्रचार ब्राह्मणी वृत्तपत्रांतून होऊ लागला. शाहू महाराजांना महाराष्ट्रात बदनाम करण्याची हि पद्धतशीर मोहीम राबवली जात होती.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,शाहू चरित्रकार धनंजय कीरांनी म्हटले आहे , " ब्राह्मणी वर्तमान पत्रांनी , कोल्हापुरातील प्रत्येक पुरुष व स्त्री हि चिंताग्रस्त झालेली आहेत ह्या घोषणेचा प्रचार आणि प्रसार केला. कोल्हापुरातील ब्राह्मण व ब्राह्मणेतर स्त्रिया भयग्रस्त झाल्या होत्या, हे त्यांचे म्हणणे दुष्ट पणाचे व धादांत खोटे होते. ब्राह्मणेतर वर्ग ह्या शाहू विरोधी दुष्ट व चरीत्रहननाच्या चळवळी पासून अलिप्त राहिला होता. खरोखरच हि उघड उघड ब्राह्मणी चळवळ होती आणि त्या चळवळीचे लक्ष्य कोल्हापूर आणि कागल हेच होते. " (📖संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.१७६-१७७ )
४) १९१८ साली कोल्हापूर संस्थानातील कुलकर्ण्यांची वतने महाराजांनी खालसा केल्यावर तर टिळक पक्षीय व ब्राह्मणी वृत्तपत्रे यांच्या अंगाचा तिळपापड झाला. ब्रह्म वृन्दास तर महाराज म्हणजे आपले हाड वैरी वाटू लागले. त्यांच्या निषेध- सभांतून आणि वृत्तपत्रातून महाराज व त्यांच्या कुटुंबावर विखारी हल्ले होऊ लागले. खोट्या नाट्या कथा , कंड्या व अफवा अशा काही खुबीने अविरतपणे प्रसारित केल्या गेल्या कि , कोल्हापुरात कोणाचेही जीवित व अब्रू सुरक्षित नाही, असे महाराष्ट्रातील लोकांना वाटावे.
५) १९२० च्या सुरवातीस मुंबई सरकारने कुलकर्ण्याचा अर्ज फेटाळून लावल्याने कुलकर्णी मंडळी संतापून गेली होती. या पार्श्वभूमीवर मे १९२० मध्ये संकेश्वर येथे कुलकर्ण्यांची दुसरी परिषद भरली असता बेळगावच्या दत्तोपंत बेळवी या टिळक पक्षीय पुढाऱ्याने पुढील आशयाचे उद्गार काढले :"कोल्हापुरात कोणाचीही बायको सुरक्षित नाही, कोणाचेही जीवित व मालमत्ता सुरक्षित नाही !" (📖संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; जुन्या आठवणी - वा.रा. कोठारी, पुणे १९७३, पृ.६९. )
बेळवीनच्या या असभ्य वक्तव्याचा निषेध महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर लोकांनी ठिकठिकाणी निषेध सभा भरवून केला. ब्राह्मणेतर वृत्तपत्रांनी टिळक पक्षीयाच्या बेजबाबदार हल्ल्यावर प्रतिहल्ले चढविले . एवढेच न्हवे तर मुंबईच्या 'इंदू प्रकाश' सारख्या नेमस्तवादी वृत्तपत्रानेही आपला निषेध नोंदवत असता म्हटले, " बेळवीनच्या ह्या कुत्सित्त भाषणा मूळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला अत्यंत दुख व संताप येईल. आज पर्यंत पुष्कळांनी कोल्हापूरची निंदा केली, पण बेळवी इतका अविचारी हल्ला कोणीही केला नाही. बेळवी यांनी दरबारावर उडविलेले निंदा प्रचुर शिंतोडे हे ऐकीव माहितीवर आधारलेले आहेत. आणि अयोग्यच न्हवे तर दुष्टपणाने प्रेरित झालेले आहेत. त्यांनी सत्याचा अपलाप केला आहे. असे कोल्हापूर दरबारावर आरोप करून त्यांनी आपल्या स्वतःसच काळीमा लावला आहे. (📖संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४६ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.४३९.)
त्या वेळेस शाहूंनी राजनितीक प्रतिनिधी वूडहाऊन यांना आपल्या पत्रा द्वारे प्रतिक्रिया कळविली , "मागास वर्गीयांची उन्नती करणे हा माझा उद्देश असल्या मूळे तसे करण्यात
त्यांनी ब्राह्मणांचे अरेरावी जू जुगारून देऊन त्यांच्या मानसिक गुलामगिरीतून आणि सत्तेपासून मुक्त व्हावे हे माझे म्हणणे रास्त आहे. त्या मूळे माझ्यावर सुड उगविण्यासाठी आणि माझा लोकांनी खून करावा ह्या उद्देशाने दुष्ट पणाने माझ्यावर ब्राह्मण चळवळे हल्ला चढवत आहेत. माझ्या विरुद्ध लोकांच्या मनात द्वेष आणि संस्थानात अराजक निर्माण करण्याच्या हेतूने बेफाम भाषेत लिहित व बोलत आहेत "
(📖संदर्भ - संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४७ ; राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.४४०.)
६) शाहू महाराज्यांच्या चरित्राच्या बदनामीचे पर्व त्यांच्या मृत्यूनंतरही थांबले नाही. बदनामीच्या कथा तिखटमीठ लावून त्यांच्या शत्रूंनी समाजात पसरवतच ठेवल्या. या मध्ये टिळक पक्षीय मंडळी पुढे होती.
(📖संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४७)
अश्या प्रकारे शाहू महाराजां वर अनेक प्रकारचे वैचारिक दहशदवादाचे हल्ले त्या वेळेसच्या ब्राह्मणांनी केले होते...आरोप करूनही शाहू महाराज्यांचे स्वच्छ निर्मळ असे चरित्र काही कलंकित होतांना दिसत नसल्या कारणाने मृत्यू नंतरही तो प्रचार ह्या मंडळींनी चालूच ठेवला...व त्याचेच पर्यवसन आजच्या काळात "शाहू महाराजांच्या घसर गुंडी" च्या नावाने केले जाणारे विकृत विनोद होत..
तत्कालीन राजे महाराज्यां मध्ये बहु पत्नीत्व आणि पत्नी सोडून 'अंगवस्त्रे' ठेवण्याची रीत पूर्वापार पासून चालू होती त्या मूळे शाहू महाराजां वरील ह्या असल्या विकृत विनोदांना नंतरच्या काळात बरेच खत पाणी मिळाले...मराठा बहुजन लोकही काही अभ्यास न करताच राजे लोकांचा रंगेल मिजाज असायचाच अश्या अल्पज्ञानी आणि संकुचित अभ्यासाच्या दृष्टीकोनातून ह्या विकृत विनोदा वर संशयास्पद वातावरण साहजिकच निर्माण होऊ लागले ...त्या मूळे शाहू महाराजांच्या वयक्तिक खाजगी आयुष्य बद्दल थोडी माहिती घेणे क्रमप्राप्त ठरेल...
डॉ.य.दि.फडके प्रभृती चरित्रकारांनी आपल्या ग्रंथात महाराजांच्या काम जीवना विषयी चर्चा केलेली आहे आणि त्या सर्वांनीच त्या विषयावर वास्तव बोधी दृष्टी कोण मांडलेला आहे."तारुण्याच्या ऐन उंबरठ्या वर , वयाच्या अठराव्या वर्षी, राजवाड्यात शाहू महाराजांच्या १२ वर्षे वयाच्या राणीच्या 'गर्भादान विधी ' ची तयारी सुरु झाल्याची वार्ता गुरु फ्रेजर यांना समजताच त्यांनी आपल्या शिष्याला सावधानतेचा इशारा दिला आणि उभयंतांच्या भावी आयुष्याच्या भल्यासाठी व सुदृढ संततीसाठी त्यांनी राणीचे 'रास्त वय' होईपर्यंत तिच्याशी शय्यासोबत करू नये, असे बंधन घातल्याचा उल्लेख मागे येऊन गेलाच आहे. महाराजांनी हे बंधन पाळून आत्मसंयमनाचे प्रत्यंतर आणून दिले होते. विशेष म्हणजे त्या काळी त्यांच्या या आत्मसंयमनाचे व स्वयं-नकाराचे (सेल्फ - denial ) कौतुक संस्थानाच्या 'कौन्सिल ऑफ administration ' ने खास ठराव करून केले होते " (📖संदर्भ - राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - पान क्रमांक-२४८; राजर्षी शाहू: राजा व माणूस - कृ.गो.सूर्यवंशी, पहिली आवृत्ती, पुणे, १९८४.पृ.११३-११४ )
                      पुढे यथावकाश राज दांपत्यास चार अपत्ये झाली. बाळंतपणी अगोदरच नाजूक असलेल्या राणीसाहेबांची प्रकृती अधिकच नाजूक बनली. महाराजांना त्यांच्या पासून आवश्यक शरीर सुख मिळेनासे झाले. जवळच्या मंडळींच्या लक्षात हि गोष्ट येताच त्यांनी महाराजांना दुसऱ्या विवाहाचा आग्रह केला. पण अशा विवाहाने हेवेदावे व मत्सर उत्पन्न होऊन कुटुंब स्वस्थ कसे बिघडते, याची पूर्ण कल्पना त्यांना असल्याने तो आग्रह त्यांनी मानला नाही. फ्यामिली डॉक्टर टेंगशे यांनीही राणीसाहेबाच्या प्रकृती स्वास्थासाठी महाराजांनी एखाद्या उपस्त्रीचा स्वीकार करावा म्हणून सुचना केली. राजपरीवारात या विषयाची चर्चा चालू असतानाच कोण तरी चांगल्या कुळाची गरीब घरातील एक कोवळ्या वयाची रूपवती मुलगी त्यांच्या समोर उपस्त्री म्हणून उभी केली. तिच्या वया कडे पाहून महाराजांचे मन द्रवले आणि तिचा स्वीकार न करता तिचे आपल्या एका तरुण अधिकाऱ्याशी लग्न लावून दिले (📖संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती - एक समाज क्रांती कारक राजा - धनंजय कीर, पहिली आवृत्ती, मुंबई १९७९ पृ.१७३ )
                      पुढे आपल्या शरीर धर्माची गरज म्हणून महाराजांनी नर्तकी अथवा गायकी कुळातील प्रौढ स्त्रियांची उपस्त्री अथवा 'अंगवस्त्र' म्हणून निवड केली. महाराजांच्या आयुष्यात अशा ५/६ स्त्रिया एकामागून एक प्रमाणे येऊन गेल्याचे त्यांचे चरित्रकार सांगतात. महाराजांच्या खाजगी जीवनाचा त्रोटक वृतांत नजरे खालून घातला तर कोणालाही महाराजां वर विषय लंपटत्वाचा आरोप करता येणार नाही. ज्या काळात हिंदी संस्थानिक शेकडो सुंदर सुंदर स्त्रियांचे जनानखाणे बाळगत होते; सरदार-दरखदारच न्हावे तर गावच्या देशमुख- पाटीला पर्यंत पर्यंतचे लोक लग्नाच्या २-४ बायका आणि आपल्या (आर्थिक) कुवती अनुसार अनेक अंगवस्त्रे बाळगत होते ( आणि असे कारणे प्रतिष्ठेचे मानले जात होते) त्या काळात शाहू महाराजांसारख्या संस्थानिकाने एकपत्नीत्वाचे पालन करून निसर्ग धर्मा साठी एखाद दुसऱ्या स्त्रीचा सहवास केला, तर त्या काळी ती नैतिक अधहपतनचि गोष्ट मानली जाण्याचे कारण न्हवते . पण शत्रूंनी या गोष्टीचा राईचा पर्वत केला, आणि बदनामीच्या अनेक कथा रचल्या.
प्रसिद्ध संशोधक व विचारवंत डॉ.य.दि.फडके यांनी महाराजांच्या चरित्रातील या विषयावर भाष्य केले आहे ते म्हणतात, " खरे म्हणजे एकापेक्षा अधिक स्त्रिया कडून शरीर सुख घेतल्या मूळे केवळ एखाद्याच्या मोठे पणाला उणेपणा येतो किंवा त्याचे कर्तुत्व डागाळते हा रूढ समाज मुळात चुकीचा आहे. इतिहास घडविणारे महापुरुषही अखेर हाडामासाची जिती जागती माणसेच असतात. प्रत्येक महान व्यक्ती साधू पुरुष असावी किंवा तिला विषय वासनेचे वावडे असावे हि अपेक्षा धरणे मुळातच चुकीचे आहे याचे भान अनेकांना राहत नाही. अशा परिस्थितीत भारतातील सत्ताधीशांच्या व अन्य कारणा मूळे लोकांना वंद्य वाटणाऱ्या व्यक्तींच्या लैंगिक जीवना विषयी खोटया नाट्या पण सुरस कथा त्यांचे शत्रू सांगत फिरतात. सर्व सामान्य माणसास वंद्य वाटणारी व्यक्ती लोकांच्या मनातून उतरावी यासाठी तिचे चरित्र हनन करण्याची चाल विरोधक नेहमीच खेळतात "
(संदर्भ - शाहू छत्रपती आणि लोकमान्य - या.दि.फडके , पुणे, १९८२.पृ.१५०-१५१)

अश्या प्रकारे इतिहासाचा सखोल मागोवा घेतल्या नंतर आज जे शाहू राज्यां बद्दल विकृत विनोद शाहू महाराजांची घसरगुंडी च्या स्वरूपातून कुजबुजले जातात..त्या मागे नेमका कोणाचा व कसा हाथ आहे ते स्पष्ट झाल्या वाचून राहत नाही...ह्याचा अर्थ आत्ता ब्राह्मण समाजा बद्दल पेटून उठणे अथवा आत्ता ह्याचा बदला घेणे असा होत नाही..अथवा तसे काही करूही नये...हि एक प्रवृत्ती आहे आणि अश्या प्रवृत्तीचे माणसे हि त्यांच्या स्वकर्मानेच शिक्षा उपभोगतात...त्या मूळे बदल्याच्या भावनेने भडकून न जाता.. शांत चित्ताने ह्या सर्वावर विचार करावा.. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या आजू बाजूला जर कोणी अशी कुजबुज करत असतील तर त्या लोकांना ठणकावून सांगावे.


त्या मूळे मित्रांनो वाचा...गैर समज दूर करून घ्या..आणि समाजात पसरत चाललेल्या चुकीच्या इतिहासाला आळा घाला.
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498 ☜♡☞
➰ माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव  ➰
______________________________


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.