मास्क, सामाजिक अंतराचे पालन करा
नागपूर (खबरबात)
नागपुरामध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृतांची संख्या लक्षात घेता वेगवेगळ्या पातळ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, स्वयंशिस्तीसह प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे तरच या भयंकर महामारीवर आपल्याला वेळेत यश मिळवता येईल असे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.
सध्यस्थितीत, कोरोनाचा प्रसार वाढताना दिसतो त्याचे महत्वाचे कारण म्हणजे नागरिक सामाजिक अंतर आणि मास्कचे पालन करताना दिसत नाही. बाजार, व्यापारी प्रतिष्ठाने, बँका, कार्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी याचे पालन होणे आवश्यक आहे. मला काही होत नाही या आविर्भावात बिनधास्त फिरत आहेत. पोलीस विभागाने तसेच जिल्हा प्रशासनाने अश्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई वाढवावी.
नागपुरातील ज्या हॉस्पिटल्समध्ये मध्यवर्ती ऑक्सिजन,आय.सी.यु.सुविधायुक्त बेड्स आहेत अश्या जास्तीत जास्त हॉस्पिटल्सना कोविड-१९ रुग्णांवर उपचार सुरु करून रुग्णांना उत्तमोत्तम सेवा द्यावी. अश्या हॉस्पिटल्सना आय.सी.एम.आर.च्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. मनपा प्रशासनाने याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कोविड रुग्ण वाढत असल्याने औषधांचा तुटवडा भासवून काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अश्या परिस्थितीत रुग्णांना हलक्या दर्जाचे पर्यायी औषध किंवा औषधांचा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या जीवाचा प्रश्न असल्याने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने तातडीने कठोर पाऊले उचलून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. नागरिकांनी ह्याबाबत नियंत्रण कक्षात ०७१२-२५६२६६८, २५४५४७३ वर तक्रार करावी असे डॉ. राऊत यांनी सांगितले.
कोविडमध्ये बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी पोस्ट कोविड पुनवर्सन केंद्र सुरु करावे जेणेकरून फुफ्फुस विषयक व्यायाम, आहार आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम राबविता येईल. कोविड-१९ साठी मान्यताप्राप्त काही खाजगी हॉस्पिटल्स हे रुग्णांकडून अवाजवी पैसे उकळत असल्याच्या तसेच रुग्णांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवणे , सुमारे २ ते ३ लक्ष रुपये अग्रिम घेतल्यानंतरच रुग्णांना भरती करून घेणे, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या हॉस्पिटल्सच्या चकरा माराव्या लागणे, रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास विलंब होणे, अश्याप्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. जिल्हा प्रशासनाने अश्या हॉस्पिटल्सवर कडक कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. सर्व हॉस्पिटल्सनी कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर उपचार करावे. याकरिता आवश्यकतेनुसार स्वतंत्र प्रवेश आणि स्वतंत्र मजला वापरावा जेणेकरून रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध होतील.