“एक गाव एक दिवस”
चंद्रपूर (खबरबात)
थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्री मोहिमेतील एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमातून चंद्रपूर जिल्ह्यात मोहिमेच्या सुरुवातीलाच १३२८ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली.
यात वीज देयकाशी निगडित ११०० तर तांत्रिक,देखभाल दुरुस्ती संदर्भातील ४८ तक्रारींचा समावेश होता. महावितरण कडे आलेल्या जवळपास सर्व सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. शिल्लक तक्रारीचा निपटारा करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. चंद्रपूर विभागात वीज देयकाशी निगडित १४८ , बल्लारशा विभागात २१३ तर वरोरा विभागात १०५३ तक्रारी प्राप्त झाल्यावर त्याचा निपटारा करण्यात आला. वरोरा विभागात काही तक्रारीचा निपटारा करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. वरोरा शहर उपविभागात वीज देयकाच्या ३९५तक्रारी प्राप्त झाल्या. चंद्रपूर जिल्ह्यात मीटर नादुरुस्त किंवा खराब मीटरच्या एकूण ७९ तक्रारी प्राप्त झाल्यावर ७१ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विदर्भातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानंतर ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.
२२ जुलै पासून चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दहा दिवसात जिल्ह्यातील ६५ गांवाना भेटी देऊन झाल्या आहेत. महावितरणच्या शाखा कार्यालय, उपविभाग कार्यालय, विभागीय कार्यालयातील २७८ अधिकारी- कर्मचारी यात सहभागी झाले आहेत.
महावितरणकडून चंद्रपूर विभागातील मरवा,पडम्पर,आडगाव,टेकाडी ,चिचाळा,भादूर्णी, मारोडा, हिरापूर, व्याहाड भुज, बल्लारशा विभागातील विसापूर, कोठारी, गौरी, मानोली,हिरापूर, आर्वी,विठ्ठलवाडा, टेमरा, भिशी,शेडगाव येथे थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी ही त्रिसुत्री मोहिमेनुसार कामाचे नियोजन करण्यात आले आहे. यात रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्याी झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. महावितरणच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गावात येऊन गावकऱ्यांसोबत येऊन चर्चा करतात, तेथील समस्यांचे निराकरण करतात. याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या मोहिमेच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात करण्याच्या सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.