नागपूर/प्रतिनिधी:
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माणाच्या मुद्यावर १२ विदर्भवादी संघटनांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या विदर्भ निर्माण महासंघाच्या सातही उमेदवारांचे लोकसभा निवडणुकीत दारूण पतन झाले आहे. महामंचदेखील त्यात भूईसपाट झाला असून विदर्भवादी उमेदवारांना एकूण मतदानाच्या एक टक्काही मत प्राप्त करता आलेले नाहीत. त्यामुळे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला मतपेटीतून मतदारांनी नाकारले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांनी एकत्रित येऊन महामंच स्थापन केला होता. त्यात विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिक सोशॅलिस्ट पार्टी, आरपीआय खोब्रागडे, लोकजागर पार्टी, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष यासारख्या विदर्भवादी राजकीय संघटना आणि नॅशनल फेडरेशन ऑफ न्यू स्टेट ही संघटनेचा समावेश होता.
या महामंचाच्यावतीने नागपुरातून बीआरएसपीचे डॉ. सुरेश माने, भंडारा-गोंदिया मतदारसंघातून येथून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे देविदास लांजेवार, चंद्रपूर येथून बीआरएसपीचे दशरथ मडावी, वर्धा येथून लोकजागर पार्टीचे प्रा. ज्ञानेश्वर वाकूडकर, रामटेक येथून चंद्रभान रामटेके, अमरावती येथून जनसुराज्य पार्टीचे नरेंद्र कठाणे आणि अकोला येथून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गजानन हरणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या उमेदवारांचा अॅड. वामनराव चटप, राम नेवले, माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यासारख्या नेत्यांनी प्रचारही केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत विदर्भवादी उमेदवारांचा सपशेल पराभव झाला असून सर्व उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झालेले आहे. त्या उमेदवारांना एकत्रितपणे १३ हजार ९१० मते मिळाली आहेत. काही वर्षांपूर्वी जनमंचने वेगळ्या विदर्भ राज्यासाठी जनमत चाचणी घेतली होती. त्यात चाचणीच्याही एक टक्का मते सार्वत्रिक निवडणुकीत विदर्भवादी संघटनांच्या उमेदवारांना मिळालेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वेगळ्या विदर्भाचा मुद्दाच नव्हता, अथवा मतदारांना त्या मुद्यावर मतदार करावे, असे वाटलेच नाही.
मतदार संघ - उमेदवार -मते मतटक्का
नागपूर सुरेश माने ३४१२ ०.२९
भंडारा-गोंदिया देविदास लांजेवार १५४९ ०.१२
चंद्रपूर दशरथ मडावी ३१०३ ०.२५
वर्धा प्रा. ज्ञानेश वाकुडकर ११३५ ०.११
रामटेक चंद्रभान रामटेके १७७९ ०.१५
अमरावती नरेंद्र कठाणे १६५४ ०.१५
अकोला गजानन हरणे १७२८ ०११