मनसर नजीकच्या आमडी पेट्रोल पंपावर केली 76 हजाराची चोरी
डॉलर एक्सेंजचा करीत होते बहाना
पोलिसांना तपासात भाषेचा अडथळा
आरोपीस 18 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश
रामटेक/तालुका प्रतिनिधी-
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर मनसर नजीक आमडी येथील भारत पेट्रोलियम च्या पेट्रोल पंपावर विदेशी पर्यटक असल्याचे सांगणाऱ्या तीन इराणी नागरिकांनी डॉलर एक्सचेंज करण्याचा बहाणा करीत आपल्या देशात सर्वात मोठी नोट कोणती आहे ?याची चौकशी केली. शंभर नोटांच्या दोन हजार रुपयांच्या बंडलमधून त्यांनी हातचलाखीने 38 नोटा काढून घेतल्या त्याची किंमत 76 हजार रुपये आहे.ही रक्कम घेऊन त्यांनी हायवेने देवलापारच्या दिशेने पोबारा केला. देवलापार पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना जवळच्या निमटोला मार्गावर ताब्यात घेतले.सदर घटना दिनांक 15 एप्रिल 2019 रोजी दुपारी 2 ते 2.30 च्या दरम्यान घडली.रामटेक पोलिसांनी उपयुक्त प्रकरणात आरोपी विरुद्ध भादंवि 379 व 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी वाहिद ची दिनांक 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळवली आहे.आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. यासंबंधी सविस्तर घटना अशी आहे की,सोमवार दिनांक 15 एप्रिल 2019रोजी दुपारी 2.00 ते 2.30दरम्यान एका काळ्या रंगाच्या होंडा सिटी कार क्रमांक 4254 मधून दोन पुरुष व एक महिला असे तिघेजण पेट्रोल पंपावर आले एकाने त्यांना आम्ही इराणी पर्यटक असून या भागात फिरायला आलो आहोत असे सांगितले.परंतु आपल्याकडील भारतीय करेन्सी मधील पैसे संपले आहेत आपल्याकडे अमेरिकन डॉलर असून त्याचे रुपयांमध्ये एक्सचेंज करायचे आहे असे सांगितले.पेट्रोल पंपाचे रोखपाल प्रभाकर दादाराव बावणे यांनी येथे करन्सी बदलविण्यात येत नाही यासाठी आपल्याला नागपूरला जावे लागेल असे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत पेट्रोल पंपावरील अन्य कर्मचारी हेमराज केळझरकर,आकाश धुर्वे,योगेश बगमारे,आकाश बसोले,प्रमोद कुमरे व महेंद्र ऊईके आदी उपस्थित होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमधील वाहिद हुसेन जादेह वय 25 त्याची पत्नी मोजगान रजा पोहंगे वय 25 आणि एक विधि संघर्ष बालक असे तिघेजण सर्व राहणार ताजरिश,जिल्हा- तेहरान,देश ईराण येथील आहेत. यातील विधिसंघर्षग्रस्त बालक आणि मोजगान यांनी कर्मचाऱ्यांना शिताफीने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने केबिनच्या बाहेर काढले आणि वाहिदने रोखपाल प्रभाकर बावने यांस भारतीय चलनातील सर्वात मोठी नोट कोणती ते दाखवा?आणखी अशा नोटा आहेत का? असे विचारले यावरून त्याने त्याला शंभर नोटांचे दोन हजारांच्या नोटांचे बंडल दाखविले त्याने त्यावरील वर्ष पाहतो या बहाण्याने ते हातात घेतले व परत केले. लगेच तिघेही जण आपल्या कारने निघून गेले.बावने यांनी नोटा मोजल्या असता त्यांना 38 नोटा कमी आढळल्या. त्यामुळे 76 हजार रुपयांची हेराफेरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. लगेच कॅशियर व स्टाफने देवलापार कडे गेलेल्या कारचा पाठलाग केला परंतु कार गुंगारा देऊन आतल्या रस्त्यावर घुसली. पेट्रोलिंग वर असलेल्या हायवे पोलीस व देवलापार पोलिसांना ही माहिती देण्यात आली. बऱ्याच वेळानंतर देवलापार पोलिसांनी देवलापार जवळच्या निमटोला या अंतर्गत रस्त्यावर आरोपींना ताब्यात घेतले.कार वरचा मागील पुढील नंबर जुळत नाही. प्रकरण रामटेक पोलिसांच्या हद्दीतील असल्यामुळे तपास रामटेक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला.तीन जणांपैकी महिलेची शासकीय महिला वसतिगृहात नागपूर येथे रवानगी करण्यात आली. विशेष असे की ती गरोदर आहे विधिसंघर्षग्रस्त बालक हा महिलेचा भाऊ असून या प्रकरणातील आरोपीचा साळा आहे.त्याला बालन्यायालय नागपुरला पाठविण्यात आले. आणि मुख्य आरोपी वाहिद यास रामटेकच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी वाघ यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सरकटे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करीत आहे.रामटेक पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास बातमीचे संकलन करण्याकरिता केलेल्या वृत्तपत्र प्रतिनिधींना रामटेकचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी माहिती दिली नाही उलट असभ्यपणे बोलले.रामटेक पोलीस स्टेशन मध्ये आरोपींना सन्मानाची व माहिती घेण्यासाठी आलेल्या पत्रकारांना असभ्य वागणूक देण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे सदर घटनेचा रामटेक तालुका पत्रकार संघाने निषेध नोंदवला आहे.