चंद्रपूर/प्रतिनिधी:
फोटो:देवानंद साखरकर |
चंद्रपूर शहरात "देवी महाकाली" यात्रेस 11 एप्रिलपासून सुरवात होत आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेची राज्यभरातील भाविक आतूरतेने वाट पाहत असतात. अखेर प्रतीक्षा संपून ही यात्रा 11 एप्रिलला सुरू होत असल्याने राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे काही दिवस आधीपासून चंद्रपुरात दाखल होणे सुरू असते. भरउन्हात भाविक विविध वाहनांद्वारे महाकाली मंदिरात दाखल होतात.
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रशासन या कामात व्यस्त आहे. असे असले तरी प्रशासनाने या यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे तसेच या यात्रेकडे व भाविकांच्या सुविधांकडे लक्ष ठेवून आहे. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या उत्सवा दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे या काळामध्ये चंद्रपुरातील वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
यात्रेमध्ये येणाऱ्या प्रवाशांना, भाविक, यात्रेकरू यांना जाण्याकरिता एकेरी मार्ग आहे या कारणाने यात्रे दरम्यान वाहनांची कोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. यामध्ये बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्या-येण्यास किंवा घरी परतण्यास भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड मार्गाचा वापर करावा. निर्धारीत कालावधीमध्ये अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरिता बंद करण्यात आल्याने इतर वाहनधारकांनी बायपास रस्त्याचा उपयोग करावा.
चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव मार्गे जटपूरा गेटकडे येणारी दुचाकी, चारचाकी व इतर वाहने ही जटपूरा गेट बाहेर विरुध्द दिशेने न जाता सरळ मौलाना आझाद चौकातून, आझाद बगिचाच्या बाजुने लिंक रोडने जयंत टॉकीज चौकातून वळण घेऊन महात्मा गांधी मार्गाने जटपूरा गेट मधून बाहेर जातील, अशी वाहतूक रचना प्रशासनाने केली आहे.