नागपूर मेट्रो वेलकम ऑफर
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर मेट्रो रेल्वेची ट्रायल रन नुकतीच झाली असून, १९ किलोमीटरचा मार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. अधिकाधिक नागपूरकरांनी मेट्रोने प्रवास करावा, यासाठी मेट्रोने वेलकम ऑफर देऊ केली असून, खापरी ते सीताबर्डी हा १३ किलोमीटरचा प्रवास अवघ्या २० आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर हा साडेपाच किमीचा प्रवास अवघ्या १० रुपयांत करता येणार आहे.
खापरी ते सीताबर्डी आणि लोकमान्य नगर ते सुभाष नगर या १९ किलोमीटरच्या मार्गावर मार्चच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो धावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मेट्रो मार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचेही बोलले जात आहे.
खापरी ते सिताबर्डी पर्यंत एकूण १३ कि.मी.साठी ३४ रुपये आणि लोकमान्य नगर ते सुभाष नगर दरम्यान ५.५ कि.मी.साठी २३ रुपये प्रवासी दर निर्धारित करण्यात आले आहेत. मात्र, सुरुवातीच्या एक महिन्यासाठी वेलकम ऑफर देऊ केली जात असल्याने खापरी ते सीताबर्डीपर्यंत निर्धारित प्रवासी दरात १४ रुपयांची आणि लोकमान्य नगर ते सुभाष नगर दरम्यान लागणाऱ्या प्रवासी दरात १३ रुपयांची बचत होणार आहे. खापरी ते सीताबर्डीपर्यंत मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना केवळ २० रुपये द्यावे लागतील. तसेच लोकमान्य नगर ते सुभाष नगर दरम्यान मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना १० रुपये तिकीट दर मोजावा लागणार असल्याचे 'महामेट्रो'कडून सांगण्यात आले.
सवलतीचे दर असेः
खापरी ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशन : १० रुपये
एयरपोर्ट ते सिताबर्डी इंटरचेंज : १० रुपये
खापरी ते सिताबर्डी इंटरचेंज : २० रुपये