Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ३०, २०१८

चंद्रपूरच्या सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण

विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 सन्मित्र सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलांनी शाळेची भिंत ओलांडून पळून जात फोनवरुन पालकांना ही माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने थोडी शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण शाळेने दिले आहे.
चंद्रपूर येथील सन्मित्र सैनिकी शाळेतील घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शाळेतील इयत्ता नववीच्या मोहीत उज्वलकर आणि जगजितसिंग भट्टी यांनी शाळेची भिंत ओलांडून पळ काढला. शाळेतील सैनिकी शिस्तीचे कमांडंट सुरिंदर राणा यांनी आपल्याला आणि बहुतांश विद्यार्थ्यांना अनावश्यक मारहाण केली, असा आरोप या मुलांनी केला आहे. या मुलांनी पळून गेल्यावर महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलातून पालकांशी संपर्क साधला. यांनतर ही घटना उजेडात आली. 
या मुलांना घेऊन पालक थेट चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले. कमांडंट राणा मुलांना सिगरेट आणण्यासाठी दबाव आणत होते. त्यातूनच ही मारहाण झाली आहे. इयत्ता नववीची एक प्रश्नपत्रिका फुटल्याचा या विद्यार्थ्यांवर केलेला आरोप, हे अन्य कारण असल्याचे मुलांचे म्हणणे आहे. या मुलांना झाडाला बांधून दंडुक्याने मारहाण करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी त्याचे वळ देखील दाखवले.
सन्मित्र सैनिकी शाळेच्या कमांडंटचे हे कृत्य अमानूष आहे. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून, या व्यक्तीविरोधात गुन्हे दखल करून कारवाई करावी. तसेच सन्मित्र सैनिकी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी संतप्त पालकांनी यावेळी केली आहे. 
सन्मित्र सैनिकी शाळेशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी हे २ विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले होते. यांच्याजवळ सिगरेट असल्याची माहिती पालकांनी फोनवरून व्यवस्थापनाला दिली होती. त्यानंतर घेतलेल्या झडतीत त्यांच्या पेटीत सिगरेट - तंबाखू- खर्रा आढळला होता. त्यानंतर त्यांच्यावर सैनिकी शाळेच्या शिस्तीनुसार थोडी शिक्षा करण्यात आली. मात्र, त्यात कुठलाही अमानुषपणा नव्हता, असे प्राचार्यांनी सांगितले. आम्ही या घटनेची चौकशी करत असून, पोलिसांना देखील सहकार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
चंद्रपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नावाजलेली शाळा म्हणून सन्मित्र सैनिकी शाळेची ओळख आहे. अशा शाळेसंदर्भात मारहाण आणि विद्यार्थी पलायनाचे प्रकरण पुढे आल्याने घटनेतील सत्यता पुढे यावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.