चंद्रपूर/प्रतिनिधी: भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून महाराष्टतील ७५ तालुक्यांमधील २ हजार ५०० गावे दुष्काळमुक्त करण्यात येईल, असा संकल्प भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी जाहीर केला. भारतीय जैन संघटनेच्या वतीने भद्रावती येथील ऐतिहासिक जैन मंदिरात शनिवारी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन, प्रकाशचंद सुराणा, हस्तीमन बंब आदी मान्यवर उपस्थित होते. मागील ३२ वर्षांपासून भारतीय जैन संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या लोकाभिमुख उपक्रमांची माहिती देऊन शांतीलाल मुथा म्हणाले, राष्ट्रीय आपत्ती, मुलींचे कमी होणारे प्रमाण, कौटुंबिक समस्या, सामूहिक विवाह, वधू-वर संमेलन, अनाथ मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब, शैक्षणिक कार्य तसेच श्रमदानासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. यातून विधायक कार्याची तेजस्वी परंपरा निर्माण झाली, असेही त्यांनी सांगितले. ‘समय है बदलाव का, समय के साथ बदल’ या विषयावर अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा झाली. माजी खासदार पुगलिया म्हणाले, खरा धर्म मानवता हाच असून आचरणात आणून आदर्श निर्माण केले पाहिजे. भारतीय जैन संघटनेकडून सुरू असलेल्या कार्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी भाषणात केले. शिवाय, शेतकरी आत्महत्यांकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संचालन संजय सिंगी, तर प्रास्ताविक अमर गांधी यांनी केले. अधिवेशनात भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष पारस ओस्वाल, गौतम संचेती, रजनीश जैन, निर्मल बरडीया, महेंद्र सुराणा, प्रतापचंद कोठारी, प्रशांत खजांची, सुधीर बाठीया तसेच राज्यातील पदाधिकारी व प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
दहा लाख विद्यार्थ्यांना ‘मूल्यवर्धित’ शिक्षणाचे धडे
महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी एप्रिल आणि मे २०१८ या दोन महिन्यांत ७५ तालुक्यांतील २ हजार ५०० गावांत एकाच वेळी जेसीबी व पोकलेनद्वारे जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. यासाठी १०० जेसीबी व पोकलेन मशीन भारतीय जैन संघटनेतर्फे खरेदी येणार आहेत. याच वर्षी ७५ तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या १०७ तालुक्यांतील शिक्षक आणि १० लाख विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित शिक्षणाचे धडे भारतीय जैन संघटनेच्या वतीने दिले जात आहे, अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी अधिवेशनादरम्यान दिली.