Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १०, २०१२

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग

Tags: abmss, preparation, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - येत्या तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहा परिसंवाद, दोन कविसंमेलन, कथाकथन, मुलाखत आदी कार्यक्रमांची रूपरेषा आखल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी पत्रपरिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव आणि चंद्रपूर महानगराच्या पंचशताब्दी वर्षानिमित्त आयोजित 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन तीन फेब्रुवारी रोजी दुपारी चारला होईल. समारंभाला अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, पूर्वाध्यक्ष उत्तम कांबळे राहतील. उद्‌घाटन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. महिपसिंग उपस्थित राहणार आहेत. समारंभाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री संजय देवतळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार उपस्थित राहतील. संमेलनात एकूण सहा परिसंवाद होतील. यात "नक्षलवाद, लोप पावत चाललेली आदिवासी संस्कृती आणि मराठी साहित्य', "आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी साहित्य व्यवहार', "आजचे प्रश्‍न आणि प्रबोधनकारी संत साहित्य', "समकालीन कृषी उद्योग आणि पर्यावरण यांचे चित्र आजच्या मराठी साहित्यात पुरेसे प्रतिबंधित होत नाही', "मराठीच्या दुरवस्थेला प्रसारमाध्यमेसुद्धा कारणीभूत आहेत काय?', "मराठीचे संवर्धन यापुढे बोलीभाषाच करतील' आदी विषयांचा समावेश आहे. याशिवाय दोन कविसंमेलन आणि कथाकथन होईल. पाच फेब्रुवारी रोजी कविवर्य फ. मु. शिंदे यांची मुलाखत आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार होईल. पाच फेब्रुवारीला सायंकाळी सहाला समारोप आणि खुले अधिवेशन होईल. यावेळी अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री संजय देवतळे, स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची उपस्थिती राहणार आहे.



जय्यत तयारी
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी आणि सर्वोदय शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित मराठी साहित्य संमेलनासाठी येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात जय्यत तयारी केली जात आहे. एकूण 50 हजार स्क्वेअर फुटाच्या प्रांगणात भव्य शामियाना तयार करण्यात येत आहे. पाच हजार प्रेक्षक बसतील, इतकी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. सोमवारी (ता. नऊ) समितीतील प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर मुख्य संमेलन स्थळाच्या व्यासपीठाचे भूमिपूजन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उषा तांबे, महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे व गुरुनाथ दळवी, विदर्भ साहित्य मंडळाचे अध्यक्ष म्हैसळकर, स्वागताध्यक्ष शांताराम पोटदुखे यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.