Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०१०

सात दिवसांपूर्वी दिला होता धोक्‍याचा इशारा

कोळसा खाण आग
देवनाथ गंडाटे /


माजरी, (जि. चंद्रपूर) - माजरी वेकोलिच्या बंद असलेल्या कोळसा खाण क्र. तीनबाबत सात दिवसांपूर्वीच वेकोलिच्या "टेलिमॉनिटरिंग सिस्टीम' ने धोक्‍याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, वेकोलिने याकडे दुर्लक्ष केले आणि खाणीत आग लागली. गत चोवीस तासांपासून कोळसा खाण धगधगत आहे.



ही आग विझविण्यासाठी खाणीत गेलेले 12 कामगार प्राणवायूंचा पुरवठा थांबल्याने गुदमरले. मात्र, त्यांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, याप्रकरणात दोषी असल्याच्या कारणावरून वेकोलिच्या सहा बड्या अधिकाऱ्याना निलंबित करण्यात आले. आग आटोक्‍यात आणण्याचा एक भाग म्हणून खाणीचे प्रवेशद्वार सील ठोकून बंद करण्यात आले आहे.



निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांत माजरी क्षेत्राचे सुरक्षा अधिकारी एस. व्ही. पाम्पट्टीवार, व्हेंटिलेशन अधिकारी डी. एम. माथीरकर, अंडर मॅनेजर श्रीराम जी. सिंह, ओव्हरमॅन के. एस. अधिकारी, सिनिअर ओव्हरमॅन आर. पी. सिंह, असिस्टंट फोरमन के. के. खिडतकर, महाप्रबंधक (सुरक्षा) सी. एस. सिंह यांचा समावेश आहे. यापैकी महाप्रबंधक सिंह यांच्या जागेवर मुख्य प्रबंधक ए. के. मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



भद्रावतीपासून 12 किलोमीटर अंतरावर माजरी वेकालि क्षेत्र आहे. याअंतर्गत पाच खुल्या कोळसा खाणी आहेत. यात माजरी, ढोरवासा, तेलवासा, कुनाडा क्रमांक एक आणि दोन, तर भूमिगत कोळसा खाणीत नागलोन आणि क्रमांक एक, दोन आणि तीन या खाणी आहेत. या खाणींमधून रोज सहा हजार टन कोळशाचे उत्खनन केले जाते. यात चार हजार कामगार कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपासून डेंझर झोनमधील क्रमांक एक आणि दोन या खाणी बंद करण्यात आल्या, तर सध्या धगधगत असलेल्या क्रमांक तीनमधील काही भाग सुरक्षेच्या कारणावरून उत्खननानंतर बंद केला गेला. तिथे रेती आणि पाणी टाकून पोकळी भरण्यात आली होती. मात्र, "रिफिलिंग'चे काम योग्य न झाल्यामुळे आग लागली असे वेकोलितील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.



सध्या माजरीवासीयांच्या जीवावर उठलेली ही आग वेकोलिने वेळीच लक्ष दिले असते तर लागलीच नसती. कारण भूमिगत कोळसा खाणीतील अंतर्गत हालचालींवर सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी "टेलिमॉनिटरिंग' व्यवस्था आहे. त्याद्वारे दैनंदिन घडामोडींची नोंद घेतली जाते. याची नोंदही रोजच्या रोज घेतली जाते. याची जबाबदार "ओव्हरमॅन'ची असते. सध्या येथे तीन "ओव्हरमॅन' कार्यरत आहे. 23 जानेवारी रोजी दुर्गंधीयुक्त वायूचा वास येत असल्याची माहिती वेकोलिच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.



"टेलिमॉनिटरिंग'नेही धोक्‍याची सूचना दिली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सात दिवसांपर्यंत भूगर्भात आग धगधगत होती. त्याची तीव्रता आणि माहिती वेकोलिला जाणवली नाही. मात्र, 31 जानेवारी रोजी पहाटे सलग तीन स्फोट झाले आणि भूगर्भातील आग पृष्ठभूमीवर आली. टोकाचा उद्रेक, शर्थीचे प्रयत्न करूनही ही आग आटोक्‍यात येऊ शकली नाही. उलट विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर निघू लागल्याने गंभीर स्वरूप निर्माण झाले होते. ही आग विझविण्यासाठी रविवारी रात्री (ता.31) 11 वाजताच्या सुमारास शून्य लेवलमध्ये 12 कामगार कार्यरत होते. खाणीत ऑक्‍सिजन (प्राणवायू) पुरविण्यासाठी बसविण्यात आलेल्या पंख्याचा बेल्ट तुटला. त्यामुळे आतमध्ये प्रायूवायुचा पुरवठा बंद होऊन विषारी वायू निर्माण झाला. यात 12 कामगार गुदमरले. यात सचिन कामटकर (वय 26), अशोक उईके (वय 23), बबलू पोयाम (वय 27), रमेश जीवतोडे (वय 41), श्रीनिवास माशरला (वय 27), संजयकुमार कबरेती (वय 30), सुरेंद्रकुमार दीक्षित (वय 56), राजेश यादव (वय 34), अहमद अली सिद्दीकी (वय 42), बंशी बिंद (वय 57), रमेश लिमोडे आणि अन्य एकाचा समावेश आहे. त्यांना तातडीने बाहेर काढून माजरी वेकोलिच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. ही घटना घडल्यानंतर क्रमांक तीनमधील आगीच्या तीव्रतेमुळे शेजारच्या नागलोन खाणीत स्फोट झाला. तेथील एक भिंतही कोसळली. त्यामुळे ही बंद करण्यात आली. या घटनेसंदर्भात टेलिमॉनिटरिंग सिस्टीमने 23 जानेवारी रोजी धोक्‍याची सूचना दिली होती. मात्र, खाण सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याकडे गंभीरतेने घेतले नाही. तेव्हाच दक्षता पथक बोलावून उपाययोजना केली असती तर ही घटना घडली नसती, असे कोळसा खाण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना उपक्षेत्रिय प्रबंधक गिरी यांनी सांगितले की, ही घटना अचानक घडली असून,

आग विझविण्याचे कार्य सुरू आहे. मानवाला कोणताही धोका होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.



-आगीची कारणे

भूमिगत कोळसा खाणीमध्ये आग लागल्याच्या घटना नेहमीच होत असतात. एका विशिष्ट खोलीतील कोळसा उत्खनन झाल्यानंतर पोकळी भरण्यासाठी रेती आणि पाणी टाकण्यात येते. मात्र, ही खोली नीट न भरल्यास खाण खचण्याची भीती असते. कोळसा उत्खनन झालेल्या भागात कॉर्बन मोनाक्‍साईड वायू असतो. तिथे जमिनीच्या पोकळ भागातून नैसर्गिक ऑक्‍सिजन गेल्यास आग लागते. त्यामुळे या घटनेत रेतीचा भरणा नीट न झाल्याने भूगर्भात सहा महिन्यांपूर्वीच ज्वालाग्राही निर्माण झाला असावा, असा अंदाज आहे. ज्या भागात चार टक्के कार्बनमोनाक्‍साईड आणि 11 टक्के ऑक्‍सिजन एकत्र येते, तिथे आगीचा भडका होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.



-सुरक्षा व्यवस्था

भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खाणींमध्ये टेलिमॉनिटरिंग सिस्टम बसविण्यात येते. त्याद्वारे संगणकावर वेळोवेळी सूचना देऊन, ओव्हरमॅनच्या माध्यमातून त्याची नोंद घेण्यात येते. धोक्‍याची शक्‍यता असल्यास दक्षता घेण्यात येते. या घटनेत कार्बनमोनाक्‍साईड आणि ऑक्‍सिजनची टक्केवारी वाढल्याची सूचना टेलिमॉनिटरिंगने दिली होती. मात्र, याकडे प्रशासनाने दिरंगाई करीत दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.



-उपाययोजना

कोळसा खाणीतील आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने पाण्याचे फवारे मारले. मात्र, ही आग ज्वालाग्राही आणि विषारी वायू पसरविणारी असल्याने त्याचा फारसा परिणाम झाला नाही. नागपूर आणि ताडाली येथील खाण बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आग आणि वायूवर नियंत्रण मिळविण्यासाठी खाणीला सील केले.



- भविष्यातील धोका

ज्वालाग्राही वायुमुळे पेटणाऱ्या कोळशाचा वायू वातावरणात पसरत असल्यामुळे श्‍वसन, त्वचारोग आणि डोळ्याचे आजार होऊ शकतात. दोन दिवसांपासून धूर मोठ्या प्रमाणात असल्याने संपूर्ण परिसर काळाकुट्ट झाला आहे. शेती आणि झाडांवरही विपरीत परिणाम दिसून आले. भूगर्भीय तज्ज्ञांच्या मते खाणीत आग सुरूच राहिल्यास स्फोट होऊ शकतो. याच भीतीपोटी परिसरातील नागरिकांना घर सोडण्यासाठी विनंती वेकोलि प्रशासन करीत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.