ब्रम्हपुरी राजकीय क्षेत्रात खळबळ
विनोद चौधरी शहर प्रतिनिधी:
आज तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अशातच ब्रम्हपुरी काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने काँग्रेस गोटासह तालुक्यांच्या राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्या मनमानी कारभारामुळे राजीनामा दिल्याचे खापर पत्रातून नानाजी तुपट यांनी फोडले आहे.
होऊ घातलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक यावेळी चुरशीची ठरणार आहे . काँग्रेस मधील नाराज उमेदवारांनी विरोधी पक्ष भाजपाचा हात धरल्यामुळे काँग्रेस गोटात उमेदवारीवरून कलह निर्माण असल्याचे जाहीर झाले आहे. तिसऱ्या आघाडीनेही या निवडणूक रिंगणात उडी मारली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक लढतीचे चित्र हे भाजप विरुद्ध काँग्रेस या दोन गटात चुरशीचे होणार असल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेस गोठ्यातील इच्छुक उमेदवारांना काँग्रेसमधून उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक उमेदवारांनी भाजपाचा हात धरल्याने काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याचे दिसून आले दिसून आले. गटबाजीमुळे कार्यकर्ता वर्ग नाराज असल्याचे दिसून येत आहे. अशातच मतदानाच्या तोंडावर काँग्रेस पक्षाचे ब्रह्मपुरी तालुका किसान सेलचे अध्यक्ष नानाजी तुपट यांनी तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्या मनमानी कारभारामुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र तडकाफडकी तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांच्याकडे दिल्याने खळबळ निर्माण झाली आहे. याचा नेमका फटका कुणाला बसणार हे निवडणुकीनंतरच कळणार आहे. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेकडे तालुक्यात लक्ष लागले आहे.