Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल २७, २०२३

हत्तीच्या कळपाने करूझरी येथे केले धान पिकांचे नुकसान

अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्तीचे पुनरागमन
राष्ट्रीय उद्यानातील मलकाझरी येथे सध्या वास्तव्य.








संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध:- दि.२७ एप्रिल.
मौजा करुझरी येथील अनिल आचले व इतर सात शेतकऱ्यांच्या शेतात हत्तीच्या कळपाने आज दि.२७ एप्रिल रोज गुरुवारला सकाळी ६.०० वाजे दरम्यान शेतपिकाची नुकसान केली असून, त्यांच्या अस्तीत्वाचे निशान दिसुन आले आहे. याची वनविभागाने पुष्टी केली असून सदर नुकसानीचा पंचनामा केला आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकांचे नुकसान करून, हा हत्तींचा कळप त्यानंतर मलकाझरी कॅम्प मार्गे परत नवेगाव राष्ट्रीय उद्यानात परत गेल्याचे पुरावे दिसुन आले आहे. आज दुपारचे लोकेशन नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे मलकाझरी बीटातील कंपार्टमेंट नंबर ७१२ मध्ये आढळून आले आहे. सदर घटनेची पुष्टी करून, कळपामध्ये अंदाजे १४ ते १५ हत्ती असण्याची शक्यता आहे. असा अंदाज नवेगावबांधचे सहाय्यक वनसंरक्षक दादा राऊत यांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे गेल्या वर्षी या रानटी हत्तीच्या कळपाने धान पिकाचे फार मोठे नुकसान केले होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावून गेले आहेत. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या हत्तींच्या कळपावर देखरेख ठेवून असून परिसरात शेतकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी २८ सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात धूमाकुळ घातलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात पुनरागमन केले आहे. बुधवार, २६ एप्रिल रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पळसगाव ते सर्रेगाव परिसरात सायंकाळी एका गुराख्याला हत्तींचा कळप दिसला आहे. पडताळणी केली असता जिल्ह्यातील सीमेवर कळपाचे लोकेशन दिसून आले. हत्तींचा कळप नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाकडे जाण्याची शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात आली आहे. वनविभागाने या मार्गावरील भसबोडन गावात अलर्ट जारी केला आहे.
मागील वर्षी सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला होता. नवेगावबांध वन परिक्षेत्रांतर्गत कवठा जंगल परिसरात रानटी हत्तींनी बस्तान मांडले होते.बोळदे, कावठा,डोंगरगाव, इंजोरी,अरततोंडी,बोरटोला, सिरेगाव बांध या गावात हत्तीच्या कळपाने अक्षरशः धान व उसाचे पिकांचा चुराडा करून नुकसान केले होते.नंतर या मार्गे हा हत्तीचा कळप भंडारा जिल्ह्यात दाखल झाला होता. हे येथे उल्लेखनीय आहे. याच कालावधीत ३ ऑक्टोबर २०२२ ला हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तिडका येथील एका आदिवासी शेतकऱ्याला ठार केले होते. जवळपास १५ दिवस या परिसरात धुमाकूळ घातल्यानंतर, १२ ऑक्टोंबर च्या रात्री नागनडोह येथील आदिवासींच्या वस्तीवर हल्ला करून त्यांच्या घराची व इतर जीवनोपयोगी साहित्याची नासधूस केली होती. त्यामुळे गावातील भयभीत आदिवासी जीव मुठीत घेऊन,गाव सोडून पळाले होते. हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने वळला होता. भंडारा जिल्ह्याचा प्रवास करून पुन्हा छत्तीसगड मध्यप्रदेश च्या सीमेवरून त्यानंतर रानटी हत्ती दूर निघून गेले होते.२१ एप्रिल रोजी या हत्तींचे लोकेशन गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील पुराडा वनपरिक्षेत्र, रामगड बीटमध्ये दिसून आले होते. बुधवारी सायंकाळी हत्तींच्या कळपाने जिल्ह्याची सीमा ओलांडली असून, सध्या हे हत्ती जिल्ह्यातील पळसगाव व सर्रेगाव शिवारात असल्याची माहिती आहे. सावधगिरी म्हणून वनविभागाने नवेगाव बांध उद्यान आणि भसबोडन गावात अलर्ट जारी केला आहे. रानटी हत्तींच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे.हत्तीच्या कळपाची हालचाल व धोका लक्षात घेऊन वनविभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पथकांसह सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती नवेगावबांधचे सहाय्यक वनसंरक्षक दादा राऊत यांनी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.