आमदार प्रतिभा धानोरकर यांची सभागृहात टीका
चंद्रपूर : विदर्भातील प्रश्न मार्गी लागावे, यासाठी नागपूर करारानुसार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असते. या अधिवेशनाच्या माध्यमातून जर विदर्भाचे प्रश्न सुटत नसतील तर हे नागपूर हिवाळी अधिवेशन कोणत्या कामाचे? त्यापेक्षा हे अधिवेशन मुंबईतच घ्या, अशी उपरोधिक टीका भद्रावती वरोरा मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत केली. सभागृहात बोलताना त्यांनी बजेटमध्ये मंजूर झालेल्या कामांना दिलेली स्थगिती तातडीने उठवून विकासकामांना प्राधान्य देण्याची मागणी सरकारकडे केली.
प्रश्न सुटत नसतील तर नागपूर हिवाळी अधिवेशन कोणत्या कामाचे ?
विदर्भातील चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्ती ने विपुल आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत. वीज निर्मिती होऊ लागली. मात्र दुसरीकडे या जिल्ह्यातील नागरिकांना प्रदूषणासारखी समस्या भोगावे लागत आहे. असे असतानाही वीज निर्मिती जिल्ह्यात नागरिकांना विजेच्या दरात कोणतीही सवलत मिळत नाही. मतदारसंघात ताडोबा सारखा जगप्रसिद्ध अभयारण्य आहे. वाघांच्या संगोपनासाठी येथे मोठे प्रयत्न होतात. दुसरीकडे या जिल्ह्यातील नागरिकांना वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडावे लागत आहे. पर्यटनाच्या माध्यमातून गोळा होणारा महसूल हा मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी उपयोगात आला पाहिजे, अशी आग्रही मागणी देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.