शिवसेनेच्या शिंदे गटाने विदर्भात पाय रोवण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून, लवकरच येत्या नवरात्रात मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) स्वतः विदर्भ दौऱ्यावर येणार आहे. येत्या काळात चंद्रपूर येथील महापालिकेच्या (CCMC) निवडणुका होणार आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चंद्रपूर ( Chandrapur) जिल्ह्यात सहसंपर्क प्रमुख बंडूभाऊ हजारे, तर जिल्हाप्रमुख म्हणून नितीन मते याना नियुक्ती देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप सोबत यूती करून लढण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री स्वतः विदर्भाचा दौरा करणार आहेत. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात एकनाथ शिंदे मेळावा घेणार आहेत. चंद्रपुरात मोठी जाहीर सभा होईल. शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे विरोधात पहिलं आंदोलन करीत एकनाथ शिंदे यांची प्रतिमा जाळणारे माजी नगरसेवक बंडू हजारे यांची शिवसेना सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली, तर जिल्हाप्रमुख म्हणून नितीन मते काम पाहतील. शिंदे गटातील शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दोन्ही पदाधिकारी यांचे नियुक्तीपत्र जाहीर केले. दोघांच्या नियुक्तीने आता ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळेल. उर्वरित पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती केली जाईल. विदर्भात शिंदे गट सक्रिय होणार आहे, यासाठी पदाधिकारी कामाला लागल्याचं सांगितले जात आहे.
chief-minister-eknath-shinde-Chandrapur-district-wise-list-of-shinde-group-office-bearers-in-vidarbha-released