Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून ०५, २०२२

अंतर 34 किमी, मग 75 चे उद्दिष्ठ कसे; जाणून घ्या

राष्ट्रीय महामार्गाचे ५१ तास; 17845 रानिंग मीटर रस्त्यांचे काम पूर्ण




लोणी ते मुर्तीजापूर 75 किमी कसे?




अनेकांना एकच प्रश्न पडला आहे, की अकोला महामार्गावरील लोणी ते मुर्तीजापूर अवघ्या 34 किमीचे अंतर असताना 75 किमीचा वर्ल्ड रेकॉर्ड कसा बनत आहे ? , नियमानुसार चौपदीकरणाचा मार्ग हा एकुण 18 मीटर रुंदीचा असतो. या मार्गाची एक बाजु ही साधारणत: 9 मीटरची रुंदीची असते, या 9 मीटरचे दोन भाग म्हणजे दुपदरी, अशा प्रमाणे 4.5 मी. अधिक 4.5 मी.याप्रमाणे या मार्गाच्या निर्माण कार्याची लेंन मोजल्या जाते. या दोन लेनचे काम हे डबलने मोजल्या जाते. जे एकुण 75 किमीचे होत आहे. या कामावर कायमस्वरुपी ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे लक्ष ठेवून आहेत. इतकेच नाहीतर गिनीज बुकची 12 लोकांची अत्यंत प्रशिक्षीत व जानकार टीमही याचे मोजमाप करित आहे. अमेरिकेच्या अॅक्युवेदर या संस्थेकडून हवामानाची माहिती काढल्यानंतरच 3 ते 7 जून कामाचे दिवस निवडले गेले आहे.

राष्ट्रीय महामार्ग-6 वर लोणी ते मुर्तीजापूर पर्यंत एकूण 5 दिवसात 75 किलोमीटरचा महामार्ग पुर्ण करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळविण्याचे ध्येय घेऊन राजपथ इंफ्राकॉनची 750 लोकांची टीम हळूहळू आपल्या लक्षपुर्तीकडे जात आहे. माना गावाच्या 1 किलोमीटर अगोदर असलेल्या तीन पुलांमुळे निर्माण झालेली गुंतागुतीची प्रक्रीया शनिवार (4जून) रोजी पुर्ण करण्यात आली. यावेळी तब्बल दिड तासाहून अधिक काळ या मार्गावर वाहतुक खोळंबली होती. परंतू हा टप्पा पुर्ण करुन लगेच वाहतुक नियमीत करण्यात आली. 5 जून रोजी 2 days, 3 तासाचा (एकूण ५१ तास) कालावधी उलटून गेला तेव्हा 17845 रानिंग मीटर म्हणजेच दोन लेन मिळून 35 किमीचे काम निर्विघ्नपणे पार पडले होते.

व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम म्हणाले की, कोरोना काळात कंपनीचे 1200 व इतर असे 1700 कर्मचा:यांच्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न माझ्यासमोर उद्भवला होता. मोठ्याप्रमाणात नकारात्मकता निर्माण झालेली होती. परंतू खचून न जाता, सर्वांना 100 टक्के वेतन दिले. कोरोना काळातच कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी येथे 30 किलोमीटरच्या मार्गाचे अत्यंत कमी वेळात काम संपवुन आम्ही लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याहून मोठा विक्रम महामार्गाच्याबाबतीत करावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही लोणी ते मुर्तीजापूर या मार्गावर विश्वविक्रम करण्याचे ठरविले आणि कामाला लागलो. हा विक्रम केला जात असताना मार्गाच्या गुणवत्तेसोबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. येथून 15 वर्ष या मार्गाला काही होणार नाही, याची हमीसुध्दा जगदीश कदम यांनी यावेळी घेतली. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अनेक गोष्टी शिकून आज मी या ठिकाणी पोहचलो असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या ‘वॉर रुमला’ जावळी हे नाव दिल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.