अकोला-अमरावती महामार्गावर बिटूमीनस कॉंक्रीटिकरणाचा 25 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करीत राजपथ इन्फ्राकाॅन कंपनीने एक मैल गाठला आहे. हा ऐतिहासिक टप्पा 6 जून रोजी दुपारी 12 वाजता पूर्ण झाला. राजपथचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसह 25 किलोमीटर पूर्ण झाल्याच्या टप्प्यावर आतशबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय शिवाजी जय भवानी च्या घोषणा देण्यात आल्या.
विशेष म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या दिवशी हा विक्रम यशस्वी झाल्याने राजपथच्या सर्व सेवकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला.
यापूर्वी राजपथ इन्फ्राकॉनने सांगली- सातारा दरम्यान पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान २४ तासात तयार करत विक्रम स्थापित केला होता. जागतिक स्तरावर सार्वजनिककार्य प्राधिकरण- अश्गुल यांनी दोहा (कतार) येथे यापूर्वी विश्वविक्रम नोंदविला होता. यात त्यांनी सुमारे 242 तास म्हणजेच 10 दिवसांच्या नॉनस्टॉप बांधकाम करून २५ किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला. हाच विक्रम राजपथ इन्फ्राकॉनने ३ दिवस ५ तासात यशस्वीरीत्या पूर्ण केला. मागील ३ जून रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांपासून लोणी येथून प्रारंभ झाला. ही आव्हानात्मक कामगिरी ७ जून रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. रस्ते बांधकाम क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी पहिली भारतीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनेल, असा विश्वास आहे.