नागपूर मेट्रो सफर - खुशियो का सफर
• नागपूर : १२ नागपूर मेट्रो सध्या नागरिकांमध्ये अत्यंत चर्चेचा विषय ठरतो आहे. दोनच दिवसाआधी शाळा सुरु झाल्या आणि युनिफॉर्म घातलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी मेट्रो स्थानकांवर आणि मेट्रो ट्रेनमध्ये दिसू लागली. शहरात मोठ्या पुलावरून मेट्रो धावतांना पाहून खूप आनंद होतो आणि प्रत्येक लहान मुलांना त्यात बसावेसे वाटणे साहजिक आहे. ज्या पालकांना आपल्या मुलांना हि सफर घडवता येते ती नशीबवान आहेत परंतु असे सगळ्यांनाच शक्य होत नाही. अश्याच गरीब किंवा निराधार मुलांना मेट्रो सफर म्हणजेच खुशियो का सफर 'माँ' स्वयंसेवी संस्थेच्या चमूने घडवून आणला.
बुधवारी जीवन आश्रय निवासी संस्थेची २० लहान मुले आणि तिथेच राहत असलेले २० ज्येष्ठ नागरिक या सफरीत सामील झाले, याशिवाय शासकीय मुलांचे बालगृह येथील २० मुले देखील या सहलीत सामील होते. माँ संस्थेच्या २५ सदस्यांनी या सहलीचे संपूर्ण नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळले. सीताबर्डी स्थानकावरून सुरु झालेली हि सफर लोकमान्य नगर स्थानकावर संपवून पुढे या मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. पुढे त्यांना नागपुरातील काही विशेष स्थळे देखील दाखवण्यात आली. मेट्रोने यापूर्वी कधीच प्रवास न केलेल्या या मुलांच्या चेहेऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद वाखाणण्यासारखा होता. नागपूर मेट्रोच्या स्थानकावरून हा प्रवास होत असतांना मेट्रोने प्रवास करण्यासंबंधीचे सगळे नियम या मुलांना समजावण्यात आले. तिकीट काढण्यापासून प्रवेश आणि नंतर बाहेर पडेपर्यंत करावयाचे सगळे सोपस्कार मुलांनी स्वतः केल्याने हि सहल म्हणजे या मुलांकरिता आणि ज्येष्ठ नागरिकांकरिता ज्ञानार्जनाचही एक माध्यम ठरले.
'माँ' हि कुठलीही नोंदणी नसलेली, कोणतेही अनुदान नसलेली स्वयंसेवी संस्था आहे जी महाविद्यालयीन तरुण मुलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावर विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करीत असते. ही संस्था गेली २१ वर्ष सामाजिक कार्यात कार्यरत असून २५० पेक्षा जास्त तरुण विविध पद्धतीने या संस्थेशी जुळून अनेक सामाजिक कार्यक्रमात, उपक्रमात, मोहिमेत सहभागी होत असतात. गरीब, अनाथ आणि निराधार लहान मुलांच्या आयुष्यात थोडा आनंद यावा म्हणून मेट्रोत सफर घडवून आणण्याचा या संस्थेचा हा तिसरा कार्यक्रम होता.