मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आघाडी सरकार कटिबद्ध आहे असे अनेकदा सांगितले आहे. मात्र सत्तेत येऊन वर्ष झाले तरी या सरकारने धनगर आरक्षणासाठी केंद्राला दोन ओळीची शिफारसही केलेली नाही ही धनगर समाजाची फसवणूक आहे. आघाडी सरकारने तातडीने केंद्राला धनगर आरक्षणासाठी शिफारस न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात श्री. हाके यांनी म्हटले आहे की, धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या शिफारशीची आवश्यकता असून शिफारशीनंतरच केंद्रातील आदिवासी विभाग व आदिवासी आयोग धनगर आरक्षणाचा प्रस्ताव संसदे समोर मंजुरीसाठी ठेवेल. जो पर्यंत राज्य सरकारची शिफारस असणार नाही तोपर्यंत केंद्र काहीही करू शकणार नाही. असे केंद्रीय विकास राज्यमंत्री रेणुका सिंह-सरुता यांनी दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १९७९ साली शिफारस केली होती. परंतु १९८१ साली महाराष्ट्र सरकारने शिफारस मागे घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार धनगर समाजाला आरक्षण देऊ शकणार नाही असेही रेणुका सिंह-सरुता यांनी सांगितल्याचे श्री. हाके यांनी नमूद केले.
धनगर समाजाच्या विविध संघटनांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती केल्यावरून रामदास आठवले यांनी आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले होते. संसदीय कामकाजामुळे अर्जुन मुंडा यांनी आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह-सरुता यांना बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले होते.
धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुग गिळून गप्प आहेत. याबाबत धनगर समाजात तीव्र असंतोष आहे. केंद्र सरकाच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारला तातडीने शिफारस केली नाही तर धनगर समाजाच्या वतीने राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय दिल्ली येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला असेही श्री. हाके यांनी पत्रकात म्हटले आहे.
नवीन संसदेच्या आवारात अहिल्यादेवींचा पुतळा उभारावा
या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दिल्लीत भव्य स्मारक उभारावे, नव्या संसद भवनाच्या आवारात अहिल्यादेवींचा पुतळा उभारावा, धनगर समाजाच्या मुलांसाठी दिल्लीत वसतिगृह उभारावे याही मागण्यांबाबत चर्चा झाली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धनगर समाजाच्या मागण्यांसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांची लवकरच भेट घालून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस खा.डॉ.विकास महात्मे, आ. राजेश पवार, रामराव वडकुते, बापूसाहेब शिंदे, व्यंकट मोकले, यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली येथील धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.