चंद्रपूर दि 16 फेब्रुवारी :- देशासह राज्यात 17 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान रस्तासुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षते खाली दुसरी बैठक ही, जिल्हा नियोजन सभागृह, चंद्रपूर येथे आज संपन्न झाली.
खासदार बाळू धानोरकर यांनी सामान्य नागरीकांसाठी रस्ते सुरक्षा अभिायानाची सध्या असलेली गरज याबाबत मार्गदर्शन करीत असतांना ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यु होतो, त्यामुळे कुटुंबातील त्याचा विपरीत परिणाम होऊन त्यांना मानसिक ताणाबरोबरच गरीबीच्या आजाराखाली जीवन व्यतीत करावे लागते. या अपघाताचे ग्रामीण भागातील प्रमाणाबाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय तसेच जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रासह देशातील इतर चार राज्यात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वक्षणात अपघातातील मृत्युचे प्रमाण हे 75 टक्के असल्याचे समोर आले आहे. यामुळे भारतातील ग्रामीण भागात दारिद्र्याचे व उपासमारीचे प्रमाण गंभीररित्या वाढल्याचे ही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभऱ्यात जगासह भारतात कोवीड-19 या आजारांने थैमान घातले आहे. परंतु या महामारीमुळे मृत्यु झालेल्याची संख्या पाहाता रस्ते अपघातात मृत्युचे प्रमाण जास्त आहे. सुमारे एका वर्षात भारतात दिड लाख नागरिकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवा कायदा आमलात आणला असून याची अमंलबजावणी राज्यात सुध्दा करण्यात यावी. जेणे करून केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकाराच्या मदतीने अधिकाअधिक कुंटुंब उध्दवस्त होण्यापासून वाचेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या बैठकीस जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे,अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी तसेच व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी व वाहन वितरक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी चंद्रपूर जिल्हाअंतर्गत येणाऱ्या सर्व महामार्ग व इतर रस्त्यांवर गावाचे दिशा दर्शक फलक लावण्यात यावे तसेच प्रत्येक किलोमीटर अंतरावर अंतराचे गोटे लावण्यात यावे. दुचाकी स्टंट मुळे होणारे अपघातावर अंकुश ठेवण्यासाठी 15 दिवसात कृती आराखडा तयार करून उपाययोजना व अंमलबजावणी करणाचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले. सोबतच वाहतुक पोलिसांनी केवळ चालान करून फक्त महसूल गोळा करण्याच्या उद्देश न ठेवता नागरीकांना वाहतुक शिस्तीचे धडे देखील विशेष लक्ष देण्याचे त्यांनी सांगीतले.
चंद्रपूर-वणी-अर्णी लोकसभाक्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांनी ग्रामीण भागात जनावारांच्या अवागमना मुळे वाहतुकीस होणारा अळथळा दुर करण्यासाठी तसेच यामुळे होणाऱ्या अपघातास आळा घालण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनास दिले.
थ्री व्हिलर्स व माल वाहतुकदारांचे टेल लॅम्प, रिफ्लेक्टर्स साठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात यावी. यासाठी स्थानिक सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. चंद्रपूर शहरातील गांधी चौक ते जेटपूरा गेट या भागातील वाहतूक कोंडी मुळे नागरीक अतिशय त्रस्त असून रस्ते लगत असलेल्या दुकानांसमोरील आडवी पार्कींग वाहने यामुळे रस्त्याचा 60 टक्के भाग व्यापला जातो. तसेच चंद्रपूर शहरातील सपना टॉकीज परिसरातून जड वाहतूकीद्वारे रेल्वेच्या मालाची वाहतूक करण्यात येते त्यामुळे वाहतूक कोडी निर्मान होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायम स्वरूपी उपाययोजना करण्यासाठी विशेष लक्ष देऊन वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यात यावी. असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी शहरातील विविध होर्डीग वर फ्लेक्स लावणे, पत्रके वाटप करणे सोबतच शाळा तसेच महाविद्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करुण जनजागृती करणे, जिल्हयातील पत्रकारांना हेल्मेट चे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. अपघात झालेल्या व्यक्तींना त्वरीत उपचार मिळण्याकरीता राज्य शासना मार्फत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजने बाबत सामान्य नागरीकांमध्ये सुरू असलेल्या जनजागृती बाबत माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी यावेळी दिली.