Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर ०५, २०२०

येत्या १ मे पर्यंत शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मे पर्यंत मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


          

 नागपूर, दि. 5 :   मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज अमरावती जिल्ह्यातील शिवणी (रसुलपूर) येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले,

आज प्रथमच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो. या प्रकल्पाचे अप्रतिम काम चालू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असं काम आपण केलेलं असेल.

आपण हे काम गतीने करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात असं वाटलं होतं की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडंसं हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचं काम मंदावलेलं नाही. मला खात्री आहे, येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकू. या मार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललं आहे, सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत आहोत. येत्या १ मे पर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या १ मे पर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू.

 

 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे

नागपूर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची ते अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने ते लगेच अमरावतीकडे रवाना झाले.

       तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री विशेष विमानाने नागपूर येथे आले होते. या ठिकाणावरून अमरावतीकडे हेलिकॉप्टरने रवाना झालेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी रसुलापूर हेलिपॅडवरून ते मौजे देऊळगव्हाण येथे पोहोचणार आहेत. याठिकाणी उतरून ते समृद्धी महामार्गाची पाहणी करतील. 

      त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवाडीकडे प्रयाण करतील. दोन वाजता गोळवाडी हेलिपॅड येथे आगमन व समृद्धी महामार्गाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद तेथून ते विमानाने मुंबईला प्रयाण करतील.

     आज सकाळी साडेदहा वाजता नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासह अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर व अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी देखील नांदगाव खंडेश्वरकडे प्रयाण केले.

       विमानतळावरील त्यांच्या स्वागतासाठी यावेळी खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अप्पर पोलीस आयुक्त दिलीप झळके, सुनील फुलारी, उपायुक्त नरुल हसन, बसवराज तेली, जिल्हा पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) राकेश ओला, वरिष्ठ विमानतळ अधिकारी आबीद रूही, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर उपस्थित होते.

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.