3 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना होता येणार सहभागी
कोरोना जनजागृती संदर्भात स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
चंद्रपूर(खबरबात):
कोरोना संसर्गाच्या काळात शाळांना सुट्टी असल्याने मुलांनाही घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. मित्र-मैत्रिणींमध्ये धमाल करणाऱ्या मुलांना आता चार भिंतीच्या आतच खेळ खेळावे लागत आहे. सारखा तोच तो अभ्यास अथवा तेच ते खेळ असताना मुलांच्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग त्यांच्या आवडत्या पद्धतीने करण्यासाठी तसेच मुलांमधील अंगभूत कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत मुलांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा येत्या 1 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. स्पर्धेचा कालावधी 10 ऑक्टोंबर पर्यंत असून निबंध व चित्र या कालावधीत पाठवावेत.
अशी असणार स्पर्धा :
कोरोना संसर्गाच्या काळात स्वतःची व इतरांची काळजी घेण्याविषयी चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृतीपर व कोरोनाला हरविण्याचा संदेश देणारे चित्र रेखाटावे. तसेच निबंध लेखन स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे, नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क चा नियमित व योग्य वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे तसेच निर्जंतुकीकरणाचा योग्य वापर करणे याबाबत महत्त्व पटवून देणे या विषयावर 100 ते 200 शब्दात निबंध असावा.
या स्पर्धेमध्ये 3 ते 6 वर्ष, 7 ते 12 वर्ष, 13 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांकरिता ही निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. मुलांनी घरातच राहून चित्र काढावयाचे असून निबंध लिहायचा आहे. चित्र व निबंध जिल्हा प्रशासनाच्या 9356774681 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावेत.चित्र व निबंधासोबत स्पर्धकाचे संपूर्ण नाव, वय, पत्ता व संपर्क क्रमाक असणे गरजेचे आहे.
उत्कृष्ट चित्र व निबंधाला परितोषिक तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे