Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ३०, २०२०

नागपुरात ‘आपली बस’च्या माध्यमातून १२ बस करणार प्रत्येक झोनमध्ये कोविड तपासणी

महापौर आणि आयुक्तांच्या हस्ते १२ बसेसचे लोकार्पण 
नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘आपली बस’मध्ये परिवर्तन
नागपूर(खबरबात):
 नागपूर शहरातील जास्तीत - जास्त नागरिकांची कोव्हिड चाचणी व्हावी यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरात सहजतेने चाचणीची सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. त्याकरिता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये फिरत्या कोव्हिड चाचणी केंद्राची सुविधा करण्यात आली आहे. 
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपाच्या ‘आपली बसचे’ ढाच्यामध्ये किरकोळ परिवर्तन करून त्या बसेस ‘फिरते कोव्हिड चाचणी केंद्र’ म्हणून तयार करण्यात आल्या आहेत. अशा १२ बसेस सध्या सज्ज असून त्याचे महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता.३०) हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले-तेली, मनपा अतिरिक्त आयुक्त सर्वश्री जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाने, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, सहायक आरोग्य अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे, डॉ.विजय जोशी, डॉ.सागर नायडू, डॉ.शुभम मनगटे, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, अरुण पिपरूडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, आज शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र धोका कमी झाला नाही. त्यामुळे चाचणीची संख्या वाढविणे आवश्यक आहे. अनेक लोक काही आजार, वृद्धापकाळ किंवा अन्य कारणाने चाचणी केंद्रावर चाचणीसाठी जाउ शकत नाही अशांसाठी या कोव्हिड चाचणी बसेस फायदेशीर ठरणार आहेत. नागपूर शहरातील कोणत्याही व्यक्तीने कोरोनाची लक्षणे लपवू नये, त्यांची वेळीच चाचणी होउन उपचार सुरू व्हावेत यादृष्टीने हा पुढाकार घेण्यात आला आहे. 
राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू असून त्यात एखाद्याला लक्षणे आढळल्यास त्यांची त्वरीत चाचणी करण्यास या बसेस महत्वाची भूमिका बजावणार आहेत. शहरातील दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक बस उपलब्ध असून स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने चाचणी केली जाणार आहे. शहर बसचा उपयोग कोव्हिड चाचणी केंद्रासाठी करणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावेळी प्रत्येक नागरिकांनी लक्षणे न लपवता तातडीने चाचणी करण्याचे आवाहन केले. आजघडीला नागपूर शहरात ५५ कोव्हिड चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. हे सर्व चाचणी केंद्र आणि शहरातील इतर खाजगी लॅबमधून दररोज सुमारे ६ हजार चाचण्या केल्या जात आहेत. राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत आता शहरातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ परिसरातच कोव्हिडची चाचणी करता यावी यासाठी या कोव्हिड चाचणी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 
नागपूर महानगरपालिकेद्वारे यापूर्वी एका रुग्णवाहिकेमध्ये फिरते चाचणी केंद्र तयार करण्यात आले होते त्यानंतर प्रभावती ओझा स्मृती फिरते कोव्हिड चाचणी केंद्र रामकिशन ओझा यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे. मनपाकडे आधी हे दोन फिरते चाचणी केंद्र उपलब्ध होते. आता परिवहन विभागाच्या सहकार्याने यामध्ये १२ केंद्रांची भर पडली आहे. अश्याप्रकारे शहरात एकूण १४ फिरते कोव्हिड चाचणी केंद्र नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यासाठी ‘आपली बस’ सेवेतील मिनी बसमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक झोनमध्ये एक बस उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांच्या सुविधेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
बसमधून एकावेळी दोघांची चाचणी 

‘आपली बस’मध्ये परिवर्तन करून तयार करण्यात आलेल्या कोव्हिड चाचणी केंद्रामधून एकावेळी दोन जणांची चाचणी केली जाणार आहे. यासाठी बसमध्ये दोन डॉक्टर, एक नर्स आणि एक स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बसमधून रुग्ण आणि डॉक्टरांचा प्रत्यक्ष संपर्क न येता चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बसमध्ये मुख्यत: आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.