नागपूर/ख़बरबात:
पूर्व विदर्भात मागील आठवड्यात आलेल्या पुरामुळे महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ९ कोटी २३ लाख रुपयांचे नुकसान झाले असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन वीज यंत्रणा दुरुस्त केल्याने प्रभावित झालेल्या सुमारे १ लाख ३८ हजार ग्राहकांपैकी १ लाख २३ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ सुरु करण्यात आला आहे. पुराचे पाणी कायम असलेल्या नागपूर ग्रामीण मंडल तसेच गडचिरोली मंडल अंतर्गत दुर्गम भागात असलेल्या सुमारे १५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरु करण्यात महावितरणला अडचणी येत आहे. वीज यंत्रणेची सर्वाधिक हानी भंडारा, नागपूर आणि गडचिरोली मंडल अंतर्गत झाली असून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी पुरस्थितीचा आढावा घेऊन दिलेल्या निर्देशानुसार पूर बाधित ग्राहकांचा वीज पुरवठा तत्काळ सूरु करण्यात येत आहे.
विदर्भांतील नागपूर ग्रामीण ,भंडारा, ब्रम्हपुरी आणि गडचिरोली या भागात २९ ऑगस्टला आलेल्या पुरामुळे वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . महावितरणचे सर्वाधिक ३ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान भंडारा मंडलात झाले असून गडचिरोली मंडलात महावितरणच्या यंत्रणेचे सुमारे ३ कोटी २७ लाख रुपयांचे नुकसान झाले तर नागपूर ग्रामीण मंडलामध्ये नुकसानीचा आकडा २ कोटी ६८ लाख एवढा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात महावितरणच्या मालमत्तेचे १५ लाखाचे तर अमरावती परिमंलात ३ लाख ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यात बाधित रोहित्रांची संख्या ४ हजार ३३४ आहे. संपूर्ण विदर्भात पुरामुळे ६२५ गावे बाधित झाले होती.वीज पुरवठा प्रभावित झालेल्या ग्राहकांची सर्वाधिक संख्या गडचिरोली मंडलात असून तेथे सुमारे ८९ हजार ग्राहक प्रभावित झाले होते. भंडारा मंडलात २८ हजार तर नागपूर ग्रामीण मंडलात २० हजार ग्राहक प्रभावित झाले होते.
नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी ३१ ऑगस्टला सर्वाधिक हानी झालेल्या मौदा माथणी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाचा आढावा घेतला व तातडीने वीज पुरवठा सुरु करण्याचे आदेश दिले होते.
चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे,गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर आणि अमरावती परिमंडलाच्या मुख्य अभियंता सूचिता गुजर पूरपरिस्थितील वीज यंत्रणेच्या दुरुस्ती कामांवर लक्ष ठेवून असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करीत यंत्रणा दुरुस्त करण्यास सुरुवात केली त्यामुळे ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश मिळाले. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि ज्या भागात पुराचे पाणी अद्याप साचून आहे अशा भागात वीज पुरवठा अद्याप सुरु करण्यात आला नसून तेथे लवकरात लवकर वीज पुरवठा सुरु करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे.