चंद्रपूर /खबरबात:
चंद्रपूर शहरातील खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून अवाढव्य बील वसूल केल्याच्या तक्रारी मनपाला प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे मंगळवारी महापालिकेचे उपायुक्त विशाल वाघ यांच्या नेतृत्त्वातील पथकाने डॉ. मानवटकर, डॉ. झाडे हॉस्पीटलला आकस्मिक भेट देऊन तपासणी केली.
यावेळी दोन्ही रुग्णालयांनी रुग्णांना दिलेली बिले सादर केली नाही. त्यामुळे वाघ यांनी दोन्ही रुग्णालयाच्या संचालकांना चांगलेच धारेवर धरले. उपायुक्त विशाल वाघ यांच्या नेतृत्त्वात मुख्य लेखाधिकारी. कंदेवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोसावी, मनपा आरोग्य अधिकारी आविष्कार खंडारे यांचे पथक डॉ. मानवटकर, डॉ. झाडे रुग्णालयात आकस्मिक दाखल झाले.
मनपाचे पथक दाखल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. यावेळी या पथकातील सदस्यांकडून रुग्णालयाने ठरवून दिलेल्या नियमावलीची पूर्तता होते किंवा नाही, याची पाहणी केली. परंतु, दोन्ही रुग्णालयांकडून एकाही नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले.
शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेव्यतिरिक्त बिल रकमेत तफावत आढळल्यास किंवा रुग्णांकडून अवाजवी रक्कम घेतल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाणार आहे.