गरीब रुग्णाला तीस हजारांच्या
सवलतीने झाला आभाळाएवढा आनंद !
...................................
कळंबोली/ प्रतिनिधी
मनाला येईल तशी बिल आकारणी सुरू असलेल्या कळंबोलीतील सत्यम हॉस्पिटलला सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी कायद्याने धडा शिकवताच हवेत भरकटलेले त्यांचे विमान धाडकन जमिनीवर आपटले. एकही रुपया जास्त घेतला नाही त्यामुळे कमी करण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हणता म्हणता स्वतःहून चक्क तीस हजारांची सवलत दिली. तेव्हा दुपारपासून घरी जाण्यापासून रोखण्यात आलेल्या पेशंटने कडू यांना भरभरून आशीर्वादही दिले.
कर्जत येथील कडाव विभागातील एका कोविड रुग्णावर कळंबोलीतील सत्यम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याचे हॉस्पिटलने 87 हजार आणि औषधांचे 85 हजार इतके बिल आकारले होते. ते सरकारी बिल मार्गदर्शन प्रणालीपेक्षा जास्त होते. परंतु हॉस्पिटल प्रशासन रुग्णाशी अतिशय उद्धट आणि दादागिरी करून पैसे भरण्यास तगादा लावत होते.
इतक्यात त्यांना कामोठे येथील रुपाली मोरे यांनी सुशांत जाधव यांना सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्याशी संपर्क साधायला सांगितले.
कडू यांनी डॉ. विनय यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सुरुवातीला बिल योग्य आहे. सर्वांना सवलत दिली तर कसे चालेल असे पालपूद लावले. तरीही बघतो असे म्हणत रोखपाल दीपक यांना फोन दिला. त्यांनी एखद्या भाईसारखे उद्धट बोलून चहापेक्षा किटली गरम असल्याचे दाखवून दिले.
कुठेही जा, एक छदामही कमी करणार नाही असे बजावले. त्यानंतर कडू यांनी डॉ. बिंदू यांना विनंती केली. त्यांनीही हात झटकत हे बिल महापालिकेकडून मंजूर करून घेतले आहे, अशी लोणकढी लावली.
त्यानंतर मात्र कडू यांनी सत्यम हॉस्पिटलला धडा शिकवायचे ठरवले आणि अर्ध्या तासात हॉस्पिटलच्या मालकांनी त्या गरीब रुग्णाला स्वतःहून चक्क तीस हजार रूपये कमी केले. वीस हजार जास्त घेतले होते, तितके तरी कमी करा अशी विनंती कडू यांनी केली होती. पण मग्रूर प्रशासन ऐकायला तयार नव्हते. चक्रे फिरताच हा चमत्कार घडला.
हॉस्पिटल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बिलाच्या रकमेत सूट मिळवून घेताच गरीब रुग्णांसह सुशांत जाधव यांनी कडू यांचा दरारा अनुभवला. त्यांना ती सवलत आभाळाएवढी मोठी ठरली. त्यांनी मनोमन कडू यांना आशीर्वाद दिले.